भुई आवळा

भुई आवळा …..

Phyllanthus Amarus, असे वैज्ञानिक नाव असलेली भुई आवळा ही वनस्पती– भुई आवळी, भूमी आवळा, बहुपात्री, जंगली आम्ली, भुईभरा, कांतारा, हजार दाना, बारमाही, भूधात्री, बहुफला, ह्या नावाने उत्तर व मध्य भारतात, संस्कृतमध्ये भूम्यामलकी, तर दक्षिण भारतातील भाषांमध्ये तामलकी, किरूनेल्ली, नीलावेल्ली किरूतानल्ली, अशा विविध नावाने ओळखली जाते.  ह्या वनस्पतीचे औषधीगुण कमालीचे परिणामकारक आहेत. मुळं, दांड्या, पानं, फुलं व फळं या सर्वांचा म्हणजे पंचांगाचा, अनेक आजारांवर उपयोग होतो. 

बारमाही उगवणारी भुई आवळा ही वनस्पती भारताच्या समशीतोष्ण भागात मुबलक प्रमाणात आढळते. पण विषम परिस्थितीतही टिकते. जिथे सावली असेल व जमिनीत आर्द्रता असेल तिथे भुई आवळा उगवतो. अमेरिका, आफ्रिका, चीन, दक्षिणपूर्व आशिया व भारताच्या ट्राॅपिकल क्षेत्रात ही वनस्पती आढळते. ह्या वनस्पतीची शेती पण करतात.

 भुई आवळीचे नर्सरीत बीजारोपण करून नंतर प्रत्यारोपण करतात. कोरडी माती व वाळू मिसळून कुंडी भरतात व बी पेरतात. आर्द्रता मात्र टिकवून ठेवावी लागते. उत्तर भारताच्या मैदानी क्षेत्रात एप्रिल-मे महिन्यात भुई आवळा जास्त अंकुरित होतो. मार्च ते ऑक्टोबर पर्यंत  केव्हाही रोपण करता येते. बीज अंकुरित झाल्यावर तीस-चाळीस दिवसातच हे रोप, चांगल्या तयार केलेल्या जमिनीत प्रत्यारोपित करतात. त्यामुळे जास्त प्रमाणात व चांगली फळे येतात. मुख्यतः सेंद्रिय खत, गांडूळखत किंवा हरित खत  टाकतात. रासायनिक खत टाकले तर गुणवत्तेत फरक पडतो. ऐंशी ते नव्वद दिवसानंतर कटाई करतात.  कारण ह्या वेळेस फायलेनथीन हे सक्रिय द्रव पानात जास्त प्रमाणात असते. ह्या द्रव पदार्थाची आरोग्यविषयक गुणवत्ता खूप चांगली असते. 

भुई आवळयाचे रोप साधारणतः दहा ते साठ सें.मी. ऊंच असते. ह्याची पाने लंबगोल आयाताकृती व एका समोर एक  अशी दोन उभ्या रांगांमध्ये असतात. फुलं, पानांच्या मागे येतात.  त्यांचा रंग पिवळट हिरवा किंवा पिवळट पांढरा असतो. फळेही पानांच्या मागे असतात. ही पानं व फळं अगदी मोठ्या आवळ्यासारखी दिसतात. फळांची चव मोठ्या आवळ्यासारखीच असते. 

निसर्गाचे जीवसृष्टीला असे वरदान आहे की प्रत्येक ऋतूतील आजारावर वनौषधी उपलब्ध आहेत. आपल्या पूर्वजांनी असल्या हजारो वनस्पतींची माहिती, गुणधर्म व वेगवेगळ्या आजारांवरील त्यांचे उपयोग आयुर्वेदात लिहून ठेवले आहेत. ह्या छोट्या मोठ्या वनस्पतींची माहिती व उपयुक्तता जाणून घेण्याकडे आता बराच कल आहे. खरंतर अशा सर्वच वनस्पतींच्या संवर्धनाची आवश्यकता आता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांना लक्षात येत आहे.प्राचीन ग्रंथात उपलब्ध माहितीच्या आधारावर अनेकविध वनस्पतींवर आता बरेच संशोधन सुरू आहे. 

वर्षा ऋतूत भुई आवळा सर्वत्र दिसतो. पावसाळा संपल्यानंतर ही वनस्पती मरते. म्हणून कार्तिक महिन्यातच भुई आवळ्याचे रोप तोडून सावलीत वाळवतात. नंतर त्याचे चूर्ण करतात. आजकाल आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात भुई आवळ्याचे चूर्ण मिळते. 

आयुर्वेदात भुई आवळ्याचे अनेक औषधीगुण सांगितले आहेत. ताजी हिरवी पानं व ताजी फळं, मुळं काड्या वा दांड्या जशा अनेक आजारांवर उपयोगी आहेत तसे ह्या वनस्पतीचे वाळवून केलेले चूर्णही तितकेच गुणकारी आहे. 

बहुतेक आपणा सर्वांना कावीळ ह्या आजारावर भुई आवळा हा रामबाण उपाय आहे हे माहीत आहे, परंतु ह्या छोट्याशा वीतभर उंचीच्या वनस्पतीचे इतर अनेक आजारांवरही लाभकारी परीणाम दिसून येतात. ह्या वनस्पतीत पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ह्या वनस्पतीचा ज्या अनेक आजारांवर उपयोग होतो तो असा…..

१] काविळीवर परिणामकारी ठरणारी आहे ही वनस्पती. फांदीसह पाने बारीक वाटून, एक पेला दुधात उकळतात. थंड झाल्यानंतर सकाळी घेतात.  असे सहा दिवस अनुशापोटी घेतल्यास काविळीत आराम पडतो. Hepatitis B वर उपयुक्त अशी ही एक दिव्य औषधी आहे. 

२] भुई आवळ्याच्या पंचांगाचा काढा जलोदरावर उपयुक्त ठरतो. 

३] आईचे दूध वाढवण्यास आवळीच्या रोपाची मुळं दुधात उकळून देतात. 

४] रक्त प्रदर कमी होण्यास मुळ्यांचे चूर्ण तांदळाच्या पाण्यासोबत देतात. तसेच मासिक पाळीसंबंधीत अनेक विकारांवर उपयोगात आणतात. भुई आवळ्याच्या चूर्णाने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.  

५] पाने व मुळ्या भाताच्या पेजेत शिजवून तयार केलेले पोटीस शरीरावर कुठे जलसंचयी सूज असेल तर त्यावर लावतात. व्रणांवरही वापरतात हे पोटीस. 

६] आतड्यांच्या आजारांवर भुई आवळा उपयुक्त ठरतो. तसेच भुई आवळ्याची भाजी, काढा, चूर्ण किंवा ताज्या पानांचा रस पोटातील वातावर उपयुक्त आहे. 

७] भुई आवळ्याच्या रसाने किंवा काढ्याने पित्त ( ॲसिडिटी) कमी होण्यास मदत होते. 

८] भुई आवळ्याचा रस काढून त्याने घाव धुतला की तो लवकर सुकतो. 

९] भुई आवळ्याची पाने चावून चावून खाल्ली तर तोंडातील फोडं बरी होतात. तसेच हिरड्या व दांत मजबूत होतात. 

१०] देठासकट पाने वाटून त्यात मीठ मिसळून खाजेवर लावतात. सोरायसीसवर पानाचा रस उपयुक्त ठरतो. 

११] भुई आवळ्याच्या काढ्याने यकृतावरची सूज कमी होते. तसेच यकृत वृद्धी किंवा प्लीहा वृद्धी कमी होण्यास भुई आवळ्याचे सेवन योग्य ठरते.

१२] भुई आवळयाचे रोप मुळासकट उपटून सावलीत वाळवतात व त्याचे चूर्ण अनेक आजारांवरील उपचार पद्धतीत उपयोगात आणतात. 

१३] भुई आवळा शरीरातील विषारी द्रव बाहेर फेकतो. 

१४] भुई आवळा रक्त शोधक आहे. त्याच्या सेवनाने रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

१५] भुई आवळ्याचा रस, काढा किंवा चूर्ण घेणे किंवा पाने चावून चावून खाणे अस्थमा, सततचा खोकला, उचक्या येणे ह्यावर उपयुक्त ठरते. 

१६] मधुमेहावर भुई आवळ्याचे चूर्ण व काळी मिरी पावडर एकत्र घेतल्यास फायदा होतो. तसेच हा रस व तुळशीचा रस एकत्र करूनही घेतात. 

१७] ज्वर, विषमज्वर ह्यावरही हे चूर्ण उपयोगी आहे.

१८] ह्याच्या सेवनाने त्वचा चांगली राहते. 

१९] रक्तदाब वृद्धी झाली असल्यास, चक्कर येत असतील तर भुई आवळ्याची भाजी नियमित खावी म्हणतात. 

२०] भुई आवळ्याचे वाटण ताकात घालून सेवन करतात. त्याने तरतरी येते. 

२१] पाच सहा ग्राम पाने रोज काही दिवस उपाशी पोटी खाल्ली तर भूक लागते. पचनशक्ती वाढते. 

२२] यकृतासंबंधीचे आजार भुई आवळ्याच्या चूर्णाने बरे होतात. 

२३] भुई आवळ्याचा फ्रॅक्चरवरही फायदा होतो. 

२४] डोळ्यांच्या विकारांवर भुई आवळा उपयुक्त ठरतो.

२५] लघवीत जळजळ होत असेल तर आवळ्याच्या पानाचा रस किंवा  काढा देतात. इतर मुत्रविकारांवरही उदा. Kidney stone भुई आवळा परिणामकारक ठरतो. पाश्चात्य देशात भुई आवळ्याला stone breaker म्हणतात. 

भुई आवळ्यात Hepato protective Elements असतात. 

तसेच भुई आवळ्यात Anti-cancerus, Anti-viral तत्व प्रचूर मात्रेत असतात. 

बहुतेक आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करत असताना काही पथ्ये पाळावी लागतात. तसेच भुई आवळ्याचे सेवन करतानाही आंबट, तेलकट, मसाल्याचे तसेच तिखट पदार्थ व थंड पदार्थ वर्ज्य करावेत. ऊसाचा रस, उकडलेले पदार्थ, दूध ह्याचा आहारात समावेश करतात.  

नागपूरला ‘ग्रामायण’ ही संस्था व महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांची व त्यांच्या औषधी गुणधर्माची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. ‘ग्रामायण’ संस्थेच्या डाॅक्टर शारदा वैद्य ह्या रानभाज्या प्रत्यक्ष दाखवून ओळख करून देतात व त्या रानभाज्यांचे आरोग्यविषयक फायदे समजवून सांगतात. त्यात  करटुल, तरोटा, खापरखुटी, आघाडा, अंबाडी, भुई आवळा अशा अनेकविध भाज्यांचा परिचय करुन देतात. तसेच त्यांचा नियमित आहारात वापर केल्यास आरोग्य संवर्धन कसे होते हे लक्षात आणून देतात.

भुई आवळ्याची भाजी पण करतात. कोवळ्या दांड्यासकट पाने तोडून व स्वच्छ धुवून चिरतात. नंतर तूर, मूग किंवा मसूर यापैकी कुठल्याही डाळीसोबत कुकर मध्ये शिजवतात. त्यावर आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा घालून फोडणी करतात. त्यात हळद, तिखट, मीठ, दाण्याचं कुट घालतात. डाळीसोबत शिजवलेली भाजी चांगली घोटून त्या फोडणीत टाकतात. किंवा 

कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद, तिखट व मीठ याची फोडणी करून  भुई आवळ्याची भाजी शिजवतात व नंतर त्यावर डाळीचे पीठ पेरून पुन्हा वाफवतात. भाजी आंबूस चांगली लागते. 

भुई आवळ्याचे वा अशा विविध वनौषधींचे अनेकानेक औषधीगुण माहीत असले तरी डाॅक्टरांच्या, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्यांचा वापर करणे योग्य ठरेल.  

सौ. विद्या चिडले. 

बेंगळुरू

२५|१२|२०२२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *