–राजेन्द्र पडतुरे–
मानवजातीच्या कल्याणा संबंधी समर्थ रामदास स्वामींची सदोदित असलेली चिंता त्यांच्या साहित्यकृतीत व्यक्त होताना दिसते. श्रीमत दासबोध, करूणाष्टके, सुंदरकांड, युध्दकांड, आत्माराम, मनपंचक, जनस्वभावयोगी, सगुणध्यान, निर्गुणध्यान, षडरिपुनिरूपण, मनाचे श्लोक आदिंचा त्यांच्या काही साहित्यकृतींमध्ये उल्लेख करता येतील. समर्थ सर्व साधारण पणे आपल्या प्रिय शिष्यांमधून कल्याण स्वामींना आपल्या साहित्यिक कृतींचा श्रुतिलेख देत असत. समर्थांनी आपल्या जीवनकाळात प्रचंड साहित्यसंपदा निर्माण केली. अत्यंत स्पष्ट, कठोर, संघर्षवादी, आणि परखड भाषेत चपखल शब्दांची रचना आणि मराठी व्यतिरिक्त संस्कृत, हिंदी, उर्दू व अरेबिक भाषांचा प्रभाव त्यांच्या लिखाणावर दिसून येतो. वारकरी सम्प्रदायी संतांसारखा मवाळवाद त्यांच्या स्पष्ट लेखनशैलीत कोठेही आढळून येत नाही. समर्थ रामदासांनी देवी, गणपती, शंकराच्या आरत्या रचल्या. (या लेखात समर्थंच्या आरत्यां विषयी संदर्भासाठी प्रामुख्याने https://mr.wikipedia.org/s/9wd या वेबसाईटचा वापर केला गेला आहे.)
रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यां मध्ये विविधता आहे. आरती म्हणजे आर्तता, व्याकुळता, वेदना, तळमळ, दुःख व्यक्त करणे, आत्मनिवेदन करणे. आरतीत ईश्वराची मनोभावे प्रार्थना व ईश्वराला भवबंधनातून सोडविण्यासाठी याचना असते. जिवाशिवाचे ऐक्य साधणे, देवाची स्तुती, त्यांच्या रूपागुणाचे गान करणे, त्याचे लीलाचरित्र गाणे, भक्ताने पूर्णपणे शरणागती पत्करणे, असा भाव आरतीत असतो. समर्थांनी रामी रामदास किंवा दास रामाचा असा स्वतःचा उल्लेख केलेल्या एकूण ६१ आरत्या रचल्या आहेत. समर्थ रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे १६ आरत्या त्यांचे आराध्य दैवत श्रीरामावर रचल्या आहेत, यामध्ये त्यांच्याव्दारे रचलेल्या निरनिराळया स्वरूपात आणि निरनिराळया प्रसंगी म्हणावयाच्या! रामावर त्यांनी रचलेल्या काकडारती, धुपारती, शेजारती वगैरेचा समावेश होतो. या सर्व प्रकारच्या आरत्यांमध्ये समर्थांनी श्रीरामाच्या सगुण रूपाचे मनमोहक व सरस वर्णन केले आहे, समर्थ भक्तकैवारी राम म्हणून रामाची भरभरून स्तुती करतात. ते रामाला सदगुरू, परब्रहम म्हणून संबोधतात.
त्यांच्या आरत्यांमध्ये देवीच्या आरत्यांचाही समावेश होतो. नीती आणि भक्तीचा सहज सोपा मार्ग मनाचे श्लोक आणि दासबोधाव्दारे सामान्य जनतेला योग्य दिशा दाखविणाऱ्या समर्थ रामदासांनी श्री गणेश, श्री राम, हनुमान, खंडोबा, शंकर, भगवदगीता, ज्ञानेश्वर महाराज, या व्यतिरिक्त अन्य संतमहात्म्यावर आणि कृष्णा नदीवर ही आरत्या रचल्या आहेत. त्यांच्या या आरत्यांत परिपूर्ण भक्तिरस तर आहेच, पण शांतरस, वीररस आणि करूणरसही आहे. समर्थ रामदासांनी रचलेली गणपतीची आरती घराघरातून रोज व सणावारी आवर्जून म्हंटली जाते.
त्यांच्या साहित्य संपदेत सज्जनगडाच्या पायथ्यापाशी त्यांनी लावलेल्या बागेविषयी आणि तेथे लावायच्या लतावेलींविषयी केलेल्या पद्य रूपात सूचना त्यांच्या काव्यरचनेतच मोडतात. ही त्यांची वनस्पती शास्त्रातील दखल म्हणजे समर्थांच्या सौंदर्य दृष्टीचे एक उदाहरणच. सज्जनगडावरील आपल्या दोन वर्षाच्या वास्तव्यात समर्थांनी त्यांच्या महाग्रंथराज दासबोधाच्या निर्मितीस प्रारंभ केला होता. या ग्रंथराजाव्दारे समर्थांनी मानवजातीला उद्देशून मोलाचे मार्गदर्शन केले आहे.