—शिल्पा धर्माधिकारी
सर्वप्रथम आमच्यासाठी बंगलोरमध्ये मराठी नाटक आणल्याबद्दल महाराष्ट्र मंडळचे खूप आभार.
“मी स्वरा आणि ते दोघे” खूप सुंदर नाटक आहे. अतिशय आगळी वेगळी संहिता आहे. “लिव्ह इन रिलेशनशीप” सारखा गहन आणि बोल्ड विषय अतिशय सहज, सोप्या पद्धतीने दाखवला आहे.
तरुण लेखक आदित्य मोडक आणि तरुण दिग्दर्शक नितीश पाटणकर ह्यांनी फक्त तरुणपिढीचे प्रतिनिधित्व न करता, दोन पिढ्यांच्या विचारधारेची योग्य सांगड घालून आणि संवादातून कौटुंबिक प्रश्न सोडवता येऊ शकतो हा विचार मांडायचा केलेला प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. खूप वेगवेगळे पैलू असणारे नाटक आहे. तसेच समाजाची भूमिका आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती असावी ह्याबद्दल विचार मांडणारे वाटले.
आई आणि मुलीचे सुदृढ नाते, तसेच प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र विचार आणि अस्तित्व असते असे मानणाऱ्या तरुण पिढीची विचारधारा मांडणारे वाटले. कुठल्याही नात्यात एकमेकांच्या विचारांचा आदर हा महत्वाचा हे मंजुषा (निवेदिता जोशी सराफ) आणि यशवंत (विजय पटवर्धन) ह्या दोघांच्या मैत्रीच्या भूमिकेतून जाणवले.
अतिशय सहज सोप्या भाषेत, अगदी आपल्या घरात घडत असल्यासारखे वाटावे इतक्या सहजतेने नाटक प्रस्तुत केले आहे. कुठेही नाटकावरची आणि विषयावरची पकड ढिली होत नाही.
निवेदिता जोशी सराफ हिने आईची भूमिका अतिशय सहजतेने साकारली आहे. साधा, सरळ, लाजरा बुजरा आणि वेंधळा यशवंत, विजय पटवर्धन यांनी छान उभा केला आहे. पुणेरी भूमिकेतील कपिल म्हणजे सुयश टिळकचा रंगमंचावरील अभिनय, वावर अतिशय सहज आणि मस्त. व्यक्तिगत प्रश्नांनी गोंधळलेली स्वरा, रश्मी अनपटने छान व्यक्त केली आहे.
विचार करायला लावणारे आणि वेगळा दृष्टीकोन देणारे असे हे नाटक प्रत्येकाने जरूर बघावे.