–रसिका राजीव हिंगे–
साहित्याचा अन प्रतिभेचा
सुंदरतेला साज आगळा
सनविवि येई बहरून मनी
निसर्गाचा सजला सोहळा
निसर्गाशी तादात्म्य पावत सगळ्यांची लेखणी अशी काही धावली आहे की आधी काय वाचू अशी परिस्थिती निर्माण झाली माझ्यासमोर. कुणाची लेखणी लिहिता लिहिता हिरवीगार झाली. तर कुठे वाऱ्यासवे शीळ वाजवत उंडारली. कुठे सागरात विहरली तर गिरीराजाला गवसणी घालायलासुद्धा वर चढली. गुहेतील गूढता आणि शांतता अनुभवत साधनामस्त झाली तर वर्षाराणी सोबत मनसोक्त भिजली. निसर्गाला साद घालत काय काय समोर घेऊन आली ते पहातांना दमछाक झाली. प्रतिभेचे सौंदर्य खुलवित स्वतः लेखणी धारण करणारे सौंदर्याने नटलेले विचार कागदावर उतरवितात तेव्हा खरेच केवढा खजिना गवसला आहे हे कळतं. पावसाळा, निसर्ग वेड लावणारे विषय सनविविने दिले तेव्हाच वाटले आता साहित्याचा सौंदर्याविष्कार पहायला मिळेल, वाचायला मिळेल.
विशेष म्हणजे पत्र लेखन कला लोप पावत चालली आहे या मोबाईलमुळे असे आपण सगळे म्हणतो. पण इथे तर काय पत्रांना बहर आलेला आहे. लालित्यपूर्ण, उपमा अलंकारांनी नटलेली पत्र पुन्हा तिथेच घेऊन गेली आपल्या बालपणात, जेव्हा संवाद साधण्यासाठी पत्र हेच माध्यम होतं.
सनविवीच्या टीमचे खरेच खूप कौतुक वाटते निसर्गाशी संवाद साधायला पत्रच घेऊन आली. साहित्य, प्रतिभा आणि कल्पकता पण या टीममध्ये भरलेली आहे. यांच्या e-सहवासात , आम्ही सगळे आहोत ही किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. असाच सहवास निरंतर लाभो आणि नवीनवी दालनं प्रत्येकासाठी खुली होवोत या सदिच्छासह.
