–सौ. विद्या चिडले.
आज १५ ऑगस्ट २०२२, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झालीत. खरे तर संपूर्ण देशात अमृत महोत्सवाचा अभिनव सण साजरा होतोय असेच म्हणावे लागेल. सर्वत्र उत्साहाला उधाण आलेले असताना, बेंगळूरूमध्ये राहणारा मराठी माणूस व सोबतच महाराष्ट्र मंडळ मागे राहणे शक्यच नव्हते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळात ध्वजारोहण समारंभ फार उत्साहात साजरा झाला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माननीय डाॅक्टर श्री. हृषिकेश दामले,यांचे विचार ऐकण्याचा योग आला हे ही मोठे भाग्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्र मंडळाने त्यांना शाल,पगडी व भीष्म बक्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
तसेच पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून मंडळाने ‘कलादालन’ ह्या सदराखाली एक हस्तकला स्पर्धा आयोजित केली होती. त्या निमित्ताने, सुई दोरा, रंग आणि कुंचला, तसेच टाकाऊतून टिकाऊ कलाकृती करणे, अशा वेगवेगळ्या श्रेणीत मंडळातील सदस्यांना आपापले हस्तकौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. ह्या स्पर्धेचे परीक्षण श्री. कांताराज आणि श्रीमती ममता जैन ह्या दिग्गजांनी केले. ह्या मान्यवरांचाही मंडळाने यथोचित सत्कार केला.हा उपक्रम फारच लक्षणीय ठरला. दहा-बारा वर्षाच्या चिमुरड्यांनी आपले कौशल्य तर दाखवलेच पण सत्तरी उलटलेल्या सदस्यांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. पारितोषिक मिळणे न मिळणे हा मुद्दाच मुळी त्यांच्या उत्साहापुढे व सकारात्मक चित्तवृत्तीपुढे अगदी नगण्य ठरला.
शंभरी ओलांडलेल्या बेंगळूरू येथील महाराष्ट्र मंडळाने अनेकानेक उपक्रम आजवर राबविले आहेत. त्या रुढीला साजेसा असाच हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रमही मंडळात साजरा झाला त्याचे अप्रूप वाटले.