हेल्दी मन हेल्दी वूमन..

नुकताच महिला दिन झाला. त्यानिमित्ताने सगळीकडे महिलांशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम, महिलांचे सत्कार, आरोग्यविषयक माहिती, मुलाखती असे अनेक कार्यक्रम महिनाभर होत राहतील. या दिवशी घरातले सगळेच घरातल्या स्त्री साठी काही ना काही करतात, त्यांना शुभेच्छा देतात, कामाला सुट्टी देतात. थोडक्यात हा दिवस सगळेजण साजरा करतात. पण मग दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा आपला नेहमीचा दिनक्रम सुरू होतो.
आपण नेहमी बघतो की घरातल्या महिला या घर आणि त्यांचं काम सांभाळण्याबरोबरच घरातल्या प्रत्येक माणसाच्या तब्येतीची सुद्धा उत्तम काळजी घेत असतात. घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर त्यांनी तो न सांगताही घरातल्या बाईला अचूक कळतो. मग त्यांच्यासाठी शक्य असेल ते पदार्थ, औषधं असं सगळं काही स्त्रिया करत असतात.
पण जेवढी काळजी घरातली बाई इतर व्यक्तींची घेते तेवढीच ती स्वतःच्या तब्येतीची घेते का ? प्रत्येक स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. परंतु ती स्वतःच्या अरोग्याबाबतीत म्हणावी तितकी जागरूक असते का ?
अगदी किशोर वयापासून ते वृद्धापकाळापर्यंत महिलांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा या समस्यांबद्दल अजिबात माहिती नसणे किंवा चुकीची माहिती असणे यामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक संतुलन जपताना अडचणी येताना बघायला मिळतात.
स्त्रीच्या शरीरात प्रत्येक टप्प्यावर होत असलेले बदल, हार्मोन्स मध्ये होणारे बदल, तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीत होणारे बदल या सगळ्याशी जुळवून घेताना प्रत्येक स्त्रीला कुठल्या ना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
माझ्याकडे एक साधारण ३३-३४ वर्षांची एक महिला कौन्सिलिंग साठी आली होती. लग्न झालेली, २ वर्षांची मुलगी असलेली आणि नोकरी करणारी. पहिल्याच सेशन मध्ये खूप रडत होती. “माझी खूप चिडचिड होते आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मला खूप राग येतो, कोणी काही बोललं की लगेच रडायला येतं. माझ्या मुलीने काही ऐकलं नाही की मी लगेच तिच्यावर ओरडते. मी घरातली सगळी कामं करते, ऑफिस ला जाते. पण कोणीही मला समजून घेत नाही. रात्री झोप लागत नाही. धड ऑफिसचे काम होत नाही, घरात नीट लक्ष देता येत नाही. सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यासारखं वाटतं.” अशा समस्या घेऊन ती आली होती. या वयातल्या बऱ्याच बायकांच्या या समस्या असू शकतात.
दुसऱ्या अशाच एक काकू आल्या होत्या. साधारण ५५-६० वय असेल. दोन मुलं होती, दोघांचीही लग्न झाली होती आणि ते आपापल्या संसारात, नोकरीत व्यस्त होते. “मला खूप एकटं वाटतं. दिवसभर काय करायचं कळत नाही. माझे मिस्टर त्याचं वाचन, मित्र, चालायला जाणं यात मन रमवतात पण मला मात्र खूप उदास वाटतं. मुलं घरात होती तोपर्यंत वेळ जायचा. त्यांच्यासाठी डबा करा, खायला करा, त्यांची ये जा या सगळ्यात दिवस संपायचा. आता मात्र करायला काही नसतं. आहेत ती कामं सुद्धा करायला खूप वेळ लागतो. पूर्वी अर्ध्या तासात अख्खा स्वयंपाक व्हायचा आता वेळ लागतो. रिकामा वेळ असेल तेव्हा पूर्वीच्या गोष्टी आठवत राहतात. घरात झालेले वाद, कोणी काही बोललं होतं ते. त्यावेळी त्याचा त्रास नाही झाला एवढा आत्ता होतो आहे.” साधारण या वयातल्या स्त्रियांच्या अशा प्रकारच्या काही समस्या असू शकतात.
या दोघींच्या बाबतीत एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात झालेला बदल. पहिल्या स्त्रीच्या आयुष्यात तिचं बाळ, त्याबरोबर घर आणि नोकरी सांभाळणे.
आणि दुसरीच्या बाबतीत मुलांच्या जबाबदारीतून झालेली मोकळीक. या आणि अशा अनेक बदलांना सामोरं जाताना आपल्याला त्रास होऊ शकतो. परंतु यातला एक समान मुद्दा असा दिसून येतो की अगदी सुरवातीपासूनच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे दुसऱ्यांभोवती फिरत असतं. नवरा, मुलं, घरातले, नोकरी या सगळ्याला प्रत्येक स्त्री योग्य तो वेळ आणि प्राधान्य देत असते. पण या सगळ्यात कुठेतरी तिचे स्वतःला प्राधान्य मात्र दिलं जात नाही.
मी माझ्या आईला किंवा अनेक जणींना असं म्हणताना ऐकलं आहे की मला आजारी पडून चालायचं नाही. नाहीतर हे सगळं मग कोण करणार. सगळ्या बायका अगदी ताप, सर्दी झाल्यावर देखील घरातली सगळी कामं करत असतात. गरज असेल तेवढा देखील आराम करत नाहीत. त्याचप्रमाणे मनात होणारे बदल, भावना याकडे तर त्या दुर्लक्ष करतानाच अधिक दिसतात. एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आहे, चिडचिड होते आहे, उदास वाटतं आहे, झोप लागत नाही या गोष्टी स्त्रिया बोलून व्यक्त करतात मात्र त्यावर काही उपाय योजना करताना दिसत नाहीत.
स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःसाठी काहीतरी करणं या गोष्टीदेखील केल्या जात नाहीत. आणि मग त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वय वाढल्यावर त्याचा त्रास होऊ शकतो.
या महिला दिनाचं औचित्य साधून सगळ्या स्त्रियांनी या काही गोष्टी ठरवून केल्या पाहिजेत.
१. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे.
२. तुमच्या मध्ये होत असलेले शारीरिक आणि मानसिक बदल जर तुम्हाला त्रास देत आहेत असं वाटल्यास लगेच त्यावर उपाययोजना करणे.
३. स्वतःसाठी वेळ काढणे. तुमचे छंद, आवड यासाठी जाणीवपूर्ण वेळ काढणे. घरच्यांना तसे सांगणे.
४. एखादे वेळी एखादं काम जमत नसेल किंवा नीट जमलं नाही तर त्याचा त्रास करून न घेणे. आपण माणूस आहोत आणि त्यामुळे आपल्याकडूनही चुका होऊ शकतात हे स्वतःला सांगणे.
५. आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत आणि तसंच पुढे काय होणार हेदेखील आपल्या हातात नाहीये. त्यामुळे वर्तमानकाळात राहून त्याचा आनंद घेणे.
६. तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या का आहेत यापेक्षा त्या कशा दूर करता येतील यावर लक्ष देणे.
७. तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या, सकारात्मक गोष्टींची स्वतःला आठवण करून देणे.
एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्यायला हवी की सर्वांची काळजी घेण्याआधी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे, स्वतःसाठी जगणे हे एक व्यक्ती म्हणून सगळ्यात महत्वाचे आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला महत्व द्याल तेव्हाच इतर लोक तुम्हाला महत्व देतील. तर या महिला दिनानिमित्त फक्त आजच्या दिवशी नाही तर आजपासून रोज आपण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यायला सुरवात करूया. महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
– सिद्धी वैद्य.
Counseling Psychologist