–समीक्षक: पुरुदत्त रत्नाकर —
कादंबरी: राजाधिराज श्रीकृष्णदेवराय
लेखक: व्यंकटेश देवनपल्ली
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
प्रथम आवृत्ती: 1 नोव्हेंबर 2021
दे माय धरणी ठाया, म्लेंछांची गडद छाया | आले कृष्णदेवराया, यवन निग्रहणाया ||
गड विकट जिंकले, स्वराज्य सुराज्य केले | कला साहित्य रक्षिले, महाकाव्य निर्मियेले ||
रायांवर जी बेतली, सरस सुरस झाली | कादंबरी ती वाचली, लेखक देवनपल्ली ||
श्री. व्यंकटेश देवनपल्ली यांची ‘राजाधिराज श्रीकृष्णदेवराय’ ही कादंबरी नुकतीच वाचून झाली. हे चरित्र नाही. यात सत्य आहे आणि त्याला डाग लागू न देणारी कल्पनेची जोड आहे. प्रास्ताविक तर इतिहास, भाषा आदि शाखांच्या विद्यार्थ्यांवर इतिहास, ऐतिहासिक लिखाण याचा कसा विचार करावा याचे संस्कार आहेत, त्याची दृष्टी दिली आहे.
तरूण युवराज कृष्णदेवरायांचे डोळे काढण्याची शिक्षा त्यांना फर्मावलेली असते तिथपासून आपला रायांबरोबर प्रवास सुरू होतो. पुढची जवळपास २१ वर्ष लेखक आपल्याला रायांबरोबर बेळगावपासून ओरिसापर्यंत विलक्षण गतीने फिरवत रहातात. रायाचा शब्दार्थ राजा. त्यांच्याबरोबर फिरतांना बिलकूल उसंत मिळत नाही. धाप लागते.
वीस मुख्य प्रकरणं आणि त्या प्रत्येकात उपकथानकं आहेत.
1) रायांच्या मोहिमा आणि लढाया, 2) काव्यमैफिली आणि शिल्पकारांशी संभाषणं
3) खाजगी आयुष्य तसंच 4) जनता, प्रशासन, परदेशी काल्पनिक व्यक्तिरेखांचे आपापासातले संवाद ही चार साधनं आलटून पालटून वापरली आहेत. यातून रायांच्या शासक, योद्धा, नेता, संपत्तीचा स्वामी, न्यायदाता, भक्त, शिष्य, धर्मरक्षक, साहित्यिक, आश्रयदाता, प्रियकर, पति, पिता, भाऊ, शत्रू, खेळाडू अशा भूमिका उलगडल्या जातात. ही प्रत्येक भूमिका रायांनी दमदारपणे वठवली होती आणि शेवटी ते ही अगतिक मानव या भूमिकेत आले हे जाणवतं. महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, श्रीकृष्णदेवराय त्या त्या काळात लाभले हे आपल्या नागरिकांचं नशीब आहे किंवा ‘यदा यदा ही धर्मस्य…’ ह्या वचनाची पूर्तता असावी.
राज्य आधीपासून अस्तित्वात होतं. सैन्य प्रबळ होतं. मंडलिक राजे, सरदार, वतनदार होते. कोषागारात अमाप संपत्ती होती. पण एकंदर व्यवस्था हळूहळू सैल होत चालली होता. काही सीमावर्ती प्रदेश आणि गडकोट परकी सुलतानांनी आणि कलिंगच्या भारतीय सम्राटाने बळकावलेले होते. हे सगळं निस्तरायचं आणि सुलतानांचा बंदोबस्त करायचा हे उद्दिष्टं अनुभवी मंत्र्यांकडून जाणून घेऊन रायांनी कार्यभार स्वीकारला आणि सगळी उद्दिष्टं पूर्ण केली. त्यावर त्यांनी सीमाविस्तार, सांस्कृतिक भरभराट आणि आंतरिक शांतता असा कळस चढवला. हा इतिहास फारच चित्तथरारक, रंजकपणे मांडला आहे.
आज बऱ्याचदा आपण जनतेच्या प्रत्येक बऱ्यावाईट फलप्राप्तिसाठी सर्वोच्च नेत्याला दोषी ठरवतो. पण तो नेता त्याच्या सल्लागार आणि कार्यकारी मंडळाच्या पाठिंब्याशिवाय कर्तृत्व गाजवू शकत नाही. जनमानस, विश्वासू कर्मचाऱ्यांचे अहवाल यामुळे अद्वितीय नेत्याची सारासार विचारशक्तिही क्षीण होते, कच खाते. काही वेळेला स्वतःचं मत डावलून निर्णय घेतांना या नेत्याला उद्विग्नता येते. याचा उल्लेख त्रोटक पण ठसठशीतपणे या कादंबरीत येतो.
राया स्वतः बाजीरावांप्रमाणे अजेय होते. पण ते पेशवे नसून राजे असल्याने त्यांच्या सरदार, महामंत्र्यांनी स्वतंत्र काढलेल्या मोहिमांमधे त्यांचा पराजय झाला. तेव्हा राया स्वतः त्या सीमावर्ती भागात जाऊन वचपा काढायचे. या पार्श्वभूमीवर, दीडशे वर्षांनंतर स्वतः औरंगजेबाला पार दिल्लीहून शिवाजी महाराजांविरूद्ध रणभूमीत यावं लागलं यात महाराजांची थोरवी समजते. नौदल आणि जलदूर्ग उभारणं ह्यातून शिवाजीराजांची दूरदृष्टी हे कथानक वाचून प्रखरतेने जाणवते.
स्वतः उच्च प्रतीचे साहित्यिक, कलासक्त असलेले संस्कृतिरक्षक राजाधिराज श्रीकृष्णदेवराय भारतीयांना लाभले हे केवळ भाग्य. आज दक्षिणेतली संस्कृती, मंदिरं, कला तौलनिकदृष्ट्याही वरचढ आहेत हे कोणी नाकारू शकत नाही.
रायांच्या यशात कौटुंबिक कलहांच्या नगण्यतेचा वाटा अमूल्य आहे. दोन पट्टराण्या असतांनाही हे घडलं, यातून त्या राण्याही रायांच्या तोलामोलाच्या होत्या हे लक्षात येतं. कथानकात या पट्टराण्यांच्याही आधी येणारा संगादेवींचा उल्लेख आणि राया व त्यांचं लग्नाआधीपासूनचं असलेलं प्रेम, राज्याभिषेकानंतर पुनर्मिलन, विवाह आणि संगनमताने सत्वर ताटातूट यामुळं कथानकाची पट्टनायिका मात्र राणी संगीच ठरते.
सर्व ऐतिहासिक निष्कर्ष लेखक स्वतः तशी विधानं परत परत लिहून ठसवत नाही, तर हे पुस्तक वाचून ते आपसूक निघतात. हे या लेखनाचं वैशिष्ट्य आणि गूण आहे.
पूज्य बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राची माझी अनेक पारायणं झाली आहेत. ते लिखाण अप्रतिम आहे यात शंकाच नाही. देवनपल्लींचं पुस्तक मी आधी वरवर चाळलं तेव्हा याचं संवाद स्वरूप लगेचच वेगळं जाणवलं. केवळ संवादांमधून त्या प्रतिमा, इतिहास कळेल का अशी शंका आली. पण ती पूर्णपणे फोल आहे. ही कादंबरी लक्ष खिळवून ठेवते. जणू आपण तिथे आहोत असं वाटतं.
या पद्धतीत लिहितांना एक धोका असतो. लेखक स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. स्वतःची मतं, कल, कौटुंबिक-सामाजिक-वैचारिक पार्श्वभूमी असते. त्याची स्वतःची अनुमानं, निष्कर्श असतात. अभ्यास करतांना ते अधिक पक्के गोंदले जातात. ते या ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या तोंडी घालण्याचा लेखकाला मोह होणं स्वाभाविक असू शकतं किंवा अनवधानाने ते येऊ शकतात. लेखकासाठी तो काळ आणि सांप्रतकाल यामधली शेकडो वर्ष हा भूतकाळच असतो पण कथासूत्राचा तो भविष्यकाळ ठरतो. मूळ कथानक जितकं जूनं तितकं मधल्या सगळ्या काळाचं सावट येतं. ते या कादंबरीत आलेलं नाही. नायक आणि कालावधी याच्याशी एकनिष्ठता टिकवून ठेवणं यात लेखकाचं कसब, मेहनत आणि उदात्त हेतू दिसतो.
काही ठिकाणी भूतकाळाचा संदर्भ, रायांच्या वर्तमानातल्या कृती किंवा निर्णयांचं समर्थन आणि थोडंसं भविष्याबद्दल किंवा भविष्यात आढावा घेतांना लक्षात येतील अशा बाबी, भाष्य आलं आहे. पण ते कटाक्षाने काल्पनिक पात्रांच्या तोंडी दिलं आहे. कोणती पात्रं काल्पनिक आहेत ते सुरुवातीलाच प्रस्तावित असल्यामुळे कादंबरीची ‘ऐतिहासिक सत्यता’ अबाधित रहाते. एखादा शंकेखोर समीक्षक म्हणेल की या व्यक्तिरेखा काल्पनिक नाहीतच.. यातले ब्रह्मानंद म्हणजे लेखक देवनपल्ली, रंगय्या म्हणजे तो शंकेखोर समीक्षक आणि दिएगो म्हणजे पोर्तुगीज नोंदी किंवा व्यंकटेशजींचे मार्गदर्शक आहेत म्हणून ..! पण यातलं कोणी रायांचं समकालीन नाही हे शंकासूरालाही मान्य करावं लागेल. मूळची तेलुगु असलेली मराठी व्यक्ती आणि एम ए व एल एल बी संगमाला शोभणारी युक्ती लेखनातून लख्ख झळकते.
हल्लीच्या प्रकाशित पुस्तकांमधे वाक्यरचना, व्याकरण सदोष असतं. या पुस्तकाच्या मुद्रक, प्रकाशकांनी जवळजवळ पूर्ण निर्दोष छपाई केली आहे. याबद्दल संपूर्ण चमूचं अभिनंदन. मी दोनदा ऑनलाईन ऑर्डर करूनही पुस्तक न पाठवता काॅटिनेंटलने शुल्क परत केलं आणि कारणही कळवलं नाही. हे अगम्य आहे. ऐतिहासिक पुस्तकाला छायाचित्रांची जोड आहे. पण ती एकगठ्ठा देण्याऐवजी विविध प्रकरणांमधून विखुरली जायला हवी होती.
बाबासाहेबांच्या शिवचरित्रात अनेक मुख्य प्रसंग चित्रांकित केलेले आहेत. मी शालेय वयापासून कित्येकदा अफजलखान वधासारखी चित्रं पहाण्यासाठी म्हणून केवळ ते पुस्तक उघडतो आणि मग काही उतारे वाचले जातात. चित्रं ठसतात. ती हवी होती.
तसंच प्रकरणांना फक्त अंकित न करता शीर्षकंही दिली असती, अनुक्रमणिका असती तर जास्त बरं झालं असतं का? असं वाटून जातं. पण नक्की निष्कर्ष काढता येत नाही. या तांत्रिक बाबी आहेत. निष्णात वाचकाला कदाचित याचं महत्त्व वाटणार नाही.
लक्ष्मीनारायण बोल्ली आणि सदाशिव आठवले यांनी या आधी श्रीकृष्णदेवरायांना मराठीत आणलं आहे. तसंच सरकारी गॅझेट दस्तऐवजांमधे रायांची माहिती मराठीतही उपलब्ध आहे. पण मी त्या साहित्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. शाळेतल्या इतिहासाच्या धड्यांमधे हरिहर, बुक्का, कृष्णदेवराय हे उल्लेख होते. परंतु कालपरत्वे स्मृती धूसर झाल्या होत्या. आता व्यंकटेश देवनपल्ली आणि काॅटिनेंटल प्रकाशन व महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या अध्यक्षा सौ. माणिक पटवर्धन यांच्यामार्फत रायाच माझ्यापर्यंत पोहोचले. रायांनी राज्य वाढवलं, साहित्याला आश्रय दिला. साहित्यही त्यांना मनामनात जिवंत ठेवतं आहे, अनेक भाषांमधे त्यांची किर्ती वाढवतं आहे.
चला तर.. श्रीमान महाराजाधिराज, कन्नडराजारमारमण, आंध्रभोज, सार्वभौम श्रीकृष्णदेव की जय …….अशी हाळी देत या कादंबरीची पारायणं करू या!
