रोहिणी निरंजनी — वंदना बोकील कुलकर्णी —-

भावसमृद्ध, ज्ञानवंत, श्रेष्ठ गुरु, संगीत रचनाकार, लेखिका, नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा विद्यापीठातील चर्चेत समावेश करणाऱ्या ,कला माध्यमांची साधना करणाऱ्या विचारवंत व दूरदृष्टीच्या संस्थाचालक अशा बहूआयामी, विविधरंगी परिपूर्ण कलाकार ‘ रोहिणी भाटे ’ यांच्या कला जीवनाचा वेधकपट म्हणजे रोहिणी निरंजनी!
प्रा. गणेश सदाशिव भाटे आणि सौ.लीलाबाई भाटे या सुविद्य, कलाप्रेमी आणि पुरोगामी विचारांच्या दांपत्याचे शेंडेफळ म्हणजे सुनंदा उर्फ रोहिणी भाटे. रोहिणी भाटे यांना सहा भावंडे. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या वडिलांचे जवळचे मित्र बॅरिस्टर जयकर यांनी सर्वार्थाने व मनापासून निभावली.
पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर हे अत्यंत विद्वान, व्यासंगी, कलाप्रेमी आणि भाषाप्रभू होते. त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा आणि पितृवत छत्रछायेचा मोठा प्रभाव भाटे मुलांवर नि:संशय पडला. रोहिणी ताईंच्या मातोश्री लीलाबाई स्वतः अत्यंत खंबीर वृत्तीच्या होत्या. आपल्या पतीच्या विचारांचा आणि मतांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणिमुलांना शिस्तीत,तत्त्वनिष्ठेने आणि उदार मनाने वाढवले.
१९४१ मधे रोहिणी ताई मॅट्रिक झाल्या.१९४२ साली कन्नड नृत्य शिक्षक श्री.रंगा विठ्ठल यांचेकडे कथकली, मणिपुरी, भरतनाट्यम याचे शिक्षण घेऊ लागल्या व नंतर १९४३ मधे रंगा विठ्ठल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या .१९४४ साली सनतकुमारचा जन्म झाल्यानंतर त्या रंगा विठ्ठल यांच्याकडे परत न जाता माहेरीच राहिल्या.१९४६ नंतर रंगा विठ्ठल म्हैसूरला निघून गेले व पुढील आयुष्यात अमेरिकेत स्थायिक झाले.नंतर नोव्हेंबर २००२ मधे अमेरिकेतच त्यांचा मृत्यू झाला.
१९४६ च्या सुट्टीत बंगलोरला बहीण उषाताईंकडे गेल्या असताना कथकाचार्य श्री.सोहनलाल यांच्याकडे त्यांनी कथक नृत्य शैलीचे शिक्षण घेतले. घरंदाज मुलींनी नृत्य शिकणं गैर मानलं जायचं, असा तो काळ. घरून त्यांच्या नृत्य शिक्षणाला मान्यता होती, प्रोत्साहनही होतं पण नृत्यकला ही ‘कला’ म्हणून ‘ व्यवसाय ‘ म्हणून किंवा वृत्ती म्हणून स्वीकारणं म्हणजे नक्की काय हे तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं.घरून सहा महिन्यांचा अवधी अनुभव घेण्यासाठी दिला होता त्यामुळे घरच्यांच्या संमतीने पण स्वतःच्या निश्चयाच्या बळावर रोहिणी ताईंनी नृत्यक्षेत्रात पाऊल टाकलं तो दिवस होता १० जुलै १९४७!
स्वतःच्या नृत्यप्रेमाविषयी त्यांनी म्हटलं आहे,’ नुपुरांच्या किंचित रुणझुण नादानंही जिच्या अंगावर रोमांच उभे रहा, तबल्यावर साधा बोल जरी वाजू लागला तरी स्वतःच्या पावलांना ताब्यात ठेवणे जिला जड वाटायचे, समोर चालू असलेले कोणतेही नृत्य पाहताना स्वतःच्या अंगागातून जागी होणारी नृत्याची उर्मी जिला लपवणे कठीण जात होते ,वाद्य वृंदांच्या संगीतामधून उमटणा-या सादेला जिच्याकडून आपोआप लयबद्ध प्रतिसाद मिळू लागे अशा रोहिणीताईंनी नर्तकी होण्याचं आणि नृत्यवर्ग चालवण्याचं ठरवलं आणि ‘ नृत्यभारती ‘ ची स्थापना झाली! खऱ्या अर्थाने कथक नृत्यशैलीचा अभ्यास लखनौला सुरू झाला; यावेळी रोहिणीताईंचं वय होतं २८! म्हणजे ज्या वयात आज एखादी नर्तकी व्यवस्थित तालीम घेऊन तयार होते त्या वयात त्यांनी खऱ्या तालमीचा श्री गणेशा केला!
मोहन रावजीकडे मिळालेली जयपूर घराण्याची तर लच्छू महाराजांकडे लखनऊ घराण्याची तालीम रोहिणीताईंना स्वतःची कथक नृत्यशैली घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. केशवराव भोळे यांच्याकडे संगीताच्या तालीम घेताना, नृत्य साधना म्हणजे नुसता नृत्याच्या तंत्राचा, शारीरिक स्तरावरचा अभ्यास नव्हे,तर नृत्य या विषयाच्या संदर्भातले वाचन करणे, वाचनात येणाऱ्या गोष्टींचं मनन करणे, त्यांचा पडताळा घेणे, विचारवंतांच्या सहवासात राहणे, त्यांचे वाद संवाद, चर्चा ऐकणे, चर्चेत भाग घेणे हे सर्व शिकायला मिळाले. तर वसंतराव देशपांडे यांच्या कडून उत्स्फूर्तता, कमालीचं तयार गाणं आणि सखोल अभ्यास यांचे संस्कार लाभल्याचे त्या सांगतात.अगदी लहानपणापासून रोहिणीताईंना ‘ शब्द ‘ हे माध्यम प्रिय होतं आणि त्यांची साहित्याची समजही सखोल होती. त्यामुळे ज्या कविता किंवा इतर रचना नृत्यासाठी निवडत त्या अभिजात असत. त्यांना अनुरूप असं संगीत आणि नेटके बसवलेले कार्यक्रम हे हळूहळू लोकांना आवडू लागले.
नृत्यभारती मध्ये अगदी प्रारंभापासून रोहिणीताईंनी स्वतःचा अभ्यासक्रम तयार केला होता. नृत्याच्या अध्यापनामुळे तयार झालेली अनुभवसिद्ध मतं , अविरत सुरू असलेला व्यासंग आणि चिंतन यांचा परिपाक म्हणजे त्यांनी तयार केलेला हा अभ्यासक्रम.
‘ प्रवेशिका ‘,’ परिचय ‘,’ संवेदन ‘,’ आस्वादन ’ आणि ‘ प्रबोधन ‘अशी या अभ्यासक्रमातील टप्प्यांची नावे त्यांच्या समग्र अध्यापनदृष्टीची प्रचिती देतात. गुरु म्हणून रोहिणीताई अत्यंत सहृदय आणि दिलदार होत्या.१९६७-६८ पासून नृत्यभारतीने ‘ गुरुपौर्णिमा ‘ साजरी करायला सुरुवात केली .तिथेही रोहिणीताईंनी एका अभिनव उपक्रमाला हात घातला. त्या स्वतः एक नवीन रचना करून ती गुरुदक्षिणा म्हणून गुरुचरणी अर्पण करीत आणि हीच सवय त्यांनी आपल्या शिष्यांनाही लावली, हीच गुरुदक्षिणा. वस्तुरूपात नव्हे तर नवनिर्मितीच्या रूपात!
१९७० पासून पं.सुरेश तळवलकर नृत्यभारतीमधे तबला साथ करायला येऊ लागले आणि शास्त्रीय संगीतातील लय- तालाचं अनोखं आणि अफाट विश्व खुलं झालं. ज्ञान संपादन करणे, ते वाढवून मुक्त हस्ताने दान करणे आणि देताना पुन्हा स्वतः समृद्ध होणे असा हा अखंड चाललेला ज्ञानयज्ञ होता. त्यामुळे “जाणिजे यज्ञ कर्म” हे नृत्यभारतीचे बोधवाक्य औचित्यपूर्ण वाटते.
रोहिणीताईंना सतत नाविन्याचा ध्यास होता त्यामुळे त्यांच्या संरचनांचा पट विस्तृत व कमालीचा वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे अनवट, अजोड असं काम त्यातून उभं राहिलं. ‘ उषि:सूक्त ‘ ,’ उद्गागार ‘,’ पावस ‘,’ ‘ मौन ‘,’ सुरज के खिलाफ ‘, ‘ ऋतू ‘,’ कठपुतली ‘, ‘ तन्मात्र ’, ‘समय ‘,’ उडान ‘अशा कितीतरी संरचना घडल्या. ‘तूला शिकवीन चांगलाच धडा’ भक्ती बर्वे यांचं गाजलेलं स्वगत रोहिणीताईंनी बसवलं होतं. परीक्षक म्हणून अनेक वर्षे त्या दिल्ली, जयपूर, लखनऊ, खैरागड,बनारस इत्यादी ठिकाणी जात असत. रोहिणीताईंचे स्वतःचं खाजगी ग्रंथालय अतिशय समृद्ध होतं त्यावर त्यांच्या चोखंदळ स्वभावाची छाप आहे. त्यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, ब्रज आणि इंग्रजी अशा भाषांमधील निवडक मौल्यवान ग्रंथ आहेत.
कोणत्याही कलावंत घराण्याचं नाव पाठीमागे नसताना, कोणत्याही सरकारी संस्थेचे किंवा मोठ्या फंडिंग एजन्सी चे पाठबळ नसताना नृत्यभारती ही संस्था उभी करून हजारो विद्यार्थिनी नृत्यशिक्षण घेऊन तयार केल्या. भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये विद्यापीठात त्यांनी आपल्या नृत्याची व नृत्य विचारांची पताका फडकवली. कधी नर्तकी म्हणून तर कधी नृत्यकला विचार मांडणारी विदुषी म्हणून कधी परीक्षक म्हणून तर कधी आपल्या शिष्यांबरोबर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणारी नृत्य गुरु म्हणून! श्रेयस आणि प्रेयस एकच असल्याची दुर्मिळ गती त्यांना साधली होती म्हणूनच अहंभाव, स्पर्धा आणि कलाक्षेत्रातील राजकारण यापासून त्या कमलपत्रासारख्या अलिप्त राहू शकल्या आणि कलावंत म्हणून ” Par Excellence ” हा दर्जा गाठू शकल्या. सदैव नम्र राहू शकल्या!
अखेरच्या काळात सर्व मनशक्ती जागृत होत्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या चिंतनात केवळ नृत्य होतं.
साधक म्हणून कशाचा शोध होता तर सत्वाचा आणि स्वत्वाचा, आपल्या अंतस्थ उर्मीचा! कला साधनेमुळे निरंजन व्यक्तिमत्त्व प्राप्त झालेल्या रोहिणीताईंना उद्देशून; ‘ संस्कृत कवींनी म्हटल्याप्रमाणे स्थिरद्युती ज्योती – स्थिर शांत येणारी ज्योत असावी, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं ’ जेष्ठ नृत्य समीक्षक डॉक्टर सुनील कोठारी यांनी काढलेले हे उद्गार म्हणूनच तंतोतंत पटणारे आहेत. १० ऑक्टोबर २००८ ला उत्तर रात्री साडेतीनच्या सुमारास रोहिणीताई पंचतत्वात विलीन झाल्या. रोहिणीताईंच्या जन्मदिनी १४ नोव्हेंबर या दिवशी त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या शिष्या शमाताईंनी ‘ अखंड घुंगरू नाद ’ हा उपक्रम चालू केला. नृत्य हाच श्वास असलेल्या रोहिणीताईंना त्यांच्या जन्मदिनी बारा तास अविरत घुंगरूंचा नाद नाही तर झंकार अर्पण करायचा अशी ही कल्पना! सकाळी नऊ ते रात्री नऊ घुंगरांचा अखंड ‘ नादब्रम्हाची ‘ श्रद्धांजली!
–वैशाली तोरवी
