मराठी भाषा गौरव दिन स्पर्धा विजेते लेख

प्रथम क्रमांक – बदलू सारे थांबून क्षणभर  – सौ. अश्विनी वासुदेव भावे

              असं म्हणतात की थांबला तो संपला. पण कधीतरी थोड्या वेळासाठी थांबणे आवश्यक असते.  आयुष्याचा प्रवास सरळ नसतो, अनेक वळणे येतात. या प्रत्येक वळणावर थांबून विचार करणे गरजेचे असते. सुधीर मोघे यांच्या ‘जरा विसावू या वळणावर’ या ओळीला जोडून मी म्हणेन ‘बदलू सारे थांबून क्षणभर’. हे थांबणे भूतकाळात आपल्याकडून झालेल्या चुकांचा शोध घेऊन भविष्यकाळ कसा सुधारता येईल यासाठी असावे. जो चुकतो तो माणूस आणि झालेल्या चुका दुरुस्त करतो तो खरा माणूस. खरा माणूस बनायचे असेल तर क्षणभर थांबून आत्मचिंतन करणे गरजेचे असते.  कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी  कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोपं होतं आणि नाती जपली जातात. आज गरज आहे ती माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते जपण्याची.

              डॉ. तारा भवाळकर म्हणतात ‘प्रकृती टिकली, तरच आपण टिकणार आहोत. आपण प्रकृतीचाच एक भाग आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे वने टिकायला हवीत. झाडे टिकली, तरच आपली पुढची पिढी जगेल, हे समजायला हवं’. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक देवाला वेगवेगळी फुलं, पत्री लागतात, पूजेला शुद्ध पाणी, फळं, सणांना वेगवेगळ्या भाज्या लागतात अशी श्रद्धा पुढच्या पिढीच्या मनात रुजवत झाडं, वेली, विहिरी, नद्या सगळ्या निसर्गाचं जतन केलं आणि अप्रत्यक्षरित्या पर्यावरणाचं रक्षण केलं.  आपले पूर्वज अंधश्रद्धाळू होते असं म्हणताना शब्द ओठाबाहेर येण्यापूर्वी त्यांचा त्या मागचा उद्देश लक्षात घ्यायला हवा.  काळानुरूप पूर्वीप्रमाणे पूजाअर्चा करणे शक्य नसले तरी भविष्याच्या दृष्टीने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, शुद्ध हवा मिळवण्यासाठी, वृक्षतोड थांबवून, नवी झाडे लावून त्याचे जतन करायला हवे.   

              फक्त पर्यावरणाचे रक्षणच नाही तर जुन्या पिढीकडून कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. समुद्र कधीही ओलांडू नये असेही आपले पूर्वज सांगत. विमानाचा शोध लागला नसल्याने समुद्र म्हणजे बोटीने परदेशात जाण्याचे माध्यम होते. त्या अनुषंगानेही हे सांगणे असेल.  आजची तरुण पिढी भरपूर पैसा आणि  सुखाच्या लालसेने परदेशात जाते आहे. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या प्रतिज्ञेतील अभिमान कुठेतरी हरवत चालला आहे. आपल्या देशात आपण जे शिक्षण घेतो त्याचा  उपयोग इतर देशांना करून देताना तरुणाईने पुढच्या पिढीचा थोडा विचार करायला हवा. इथे आमच्या हुशारीला वाव मिळत नाही असे म्हणताना रमण रणदिवे यांच्या कवितेतील ‘मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती, तरीही झाड सारखे झडते का?’  या ओळी आठवायला हव्यात. इथेच राहून आपल्या देशाला जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर कसे नेता येईल याचा विचार करायला हवा. तसे झाल्यास एक ना एक दिवस आपल्या मनासारखे सारे घडेल, त्याबरोबरच पुढच्या पिढीला सुद्धा याची फळे नक्की मिळतील. 

              टाळी कधी एका हाताने वाजत नसते. त्यामुळे या  तरुणाईला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी इथेच त्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध करून द्यायला हव्यात.  आपल्या देशातही परदेशाप्रमाणे सुधारणा कशा करता येतील याचाही विचार व्हायला हवा. शेती  मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत,  वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस गांजला आहे, जिकडे तिकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे, अमली पदार्थांचा वाढता विळखा, देशावरील परदेशी आक्रमणांची टांगती तलवार या सगळ्या प्रश्नांवर उत्तरे शोधायला हवीत. गावखेड्यातील लोकांच्या रोजच्या जीवनातल्या गरजा कशा पूर्ण होतील, गावाचे शहरीकरण कसे होईल त्याकडे लक्ष द्यायला हवे.  असे सर्वच प्रश्न थांबून, विचार करून, पूर्वीच्या चुका टाळून, सोडवायला हवेत. असे  झाले तर तरुण मुले इथेच राहून प्रतिज्ञेतील ‘माझ्या देशाचा मला अभिमान आहे’ या ओळी आनंदाने म्हणतील आणि तोच वारसा पुढच्या पिढीला देतील.

              आजकाल प्रत्येकजण मोबाईलमध्ये इतका रममाण झाला आहे की त्यामुळे मानसिक आजार होऊ शकतो हे आपल्या लक्षात येत नाही. इतकंच काय पण आपल्या डोळ्यासमोर एखादी दुर्घटना घडताना दिसली तर मदतीला जाण्याऐवजी सगळे लोक त्याचा व्हिडिओ कसा चांगला येईल यासाठी धडपडताना दिसतात. अशा वेळी दुर्घटना बघत मोबाईल हातात धरण्यापेक्षा मदतीचा हात कसा पुढे करता येईल हे बघायला हवे. आपल्याला काय करायचे आहे ही वृत्ती सोडून द्यायला हवी. साध्या साध्या गोष्टींवरून लोक मारामारी करतात. तोडफोड करून देशाच्या संपत्तीचे पर्यायाने आपलेच  नुकसान करतात. रक्तपात घडवण्यापेक्षा रक्तदानाने एखाद्याचा जीव कसा  वाचवता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. महिला सुरक्षित राहायला हव्या असतील तर प्रत्येक पुरुषाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतून त्यांच्याकडे बघायला हवं. माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकायला हवं. 

              इंदिरा संत यांच्या ‘जळराशीची ओढ अनावर हवीच जर का तुला कळाया, हवेच व्हाया  तुजला  वाळू कणाकणाने तसे झिजाया’ या ओळीत म्हंटल्या प्रमाणे दुसऱ्याच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केली तरच समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या भवना आपल्याला समजतील. कॉलेजमध्ये आपल्या ज्युनिअर मित्रमैत्रिणींना रॅगिंग करणाऱ्यांनी, हुंड्यासाठी सुनांचा छळ करून त्यांना जाळणाऱ्या किंवा आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांनी असे करण्यापूर्वी त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केल्यास असे प्रकार नक्की थांबतील.  आपण कुठे चुकतो ते प्रत्येकाने शोधायला हवं. 

              काही चुका कधीही दुरूस्त करता येत नाहीत त्यामुळे त्या करण्यापूर्वीच थांबायला हवं. चूक घडू नये यासाठी स्वत:चा शोध घ्यायला हवा. प्रत्येकानेच थांबा, विचार करा आणि पुढे जा हे तत्व अंगी बाळगायला हवे. कोणतीही कृती करण्यापूर्वी सदसद्विवेकबुद्धिला स्मरून योग्य तो निर्णय घेतला तर आपल्याबरोबर इतरांचा सुद्धा भविष्यकाळ ऊज्वल होईल. अन्यथा ‘कधी संपली वाट कळलेच नाही, दुसरे वळण कधी लागले उमगलेच नाही’ असे होऊ शकते. ते टाळण्यासाठीच सांगावेसे वाटते ‘जरा विसावू या वळणावर’.

-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-

द्वितीय क्रमांक विभागून – जरा विसावू या वळणावर  -मानसी तांबेकर

              ‘धोकादायक वळण …थांबा’ असा इशारा दर्शविलेला असतानाही एका चालकाने भरधाव बस नेली… बसच्या अपघातात अनेक लोक मृत्युमुखी ‘ आज या बातमीने सर्व मीडियावर कब्जा केला होता. खूप भयानक अपघात झाला आणि चालकाच्या चुकीने अनेक निष्पाप बळी गेले.खरतर वळण म्हटलं की ब्रेक लावणं  किंवा थांबणं अपरिहार्य आहे पण जर तसे झाले नाही तर अपघात होणार किंवा मार्ग चुकणार हे नक्की. हे वाचलं आणि मनात सहज विचार आला – त्या चालकाला ‘विसावा’ घेणं जरुरी होतं का ? कारण आज तो ही त्याचं आयुष्य गमावून बसला होता.

कशास भाषा व्यर्थ  बोलता

एकविसाव्या शतकाची ,

एक ‘विसावा ‘ही न दिसावा

व्यथा आजच्या आयुष्याची ।

आज भौतिक सुखांची रेलचेल असतानाही ही ‘वेदना’ फार बोलकी आहे. कामाचा ताण, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि स्पर्धा यांमध्ये माणूस स्वतःला हरवून बसला आहे. कशी दंगल , कधी संप , कधी पूर तर कधी दुष्काळ या आणि अशा चिंतांनी जीवन ग्रासले आहे .‘काळजी’ हा ह्या काळाचा परवलीचा शब्द झाला आहे. यात भर घातली- ती सर्व विषयांना व्यापणाऱ्या, वामनाच्या पावलांची शक्ती असणाऱ्या  ‘सोशल मीडिया’ने.आपल्याला सतत बदलत्या जगाबरोबर बदलतं रहावे लागते. आणि त्यामुळे सोशल मीडियाचा ‘परिसस्पर्श’ झालेला नाही  असा मनुष्यप्राणी सापडणे कठीणच! मुळात ’सोशल मीडिया ‘हा माणसा-माणसाला बांधणारा सेतू;

पण हा सेतू बांधताना आपले मित्र किती,फॉलोअर्स किती याची अहमहमिका सुरु झाली.कुठेही गेलो तर ती जागा ,काहीही नवीन करायला गेलो तर ती गोष्ट; याचा मनमुराद आनंद उपभोगण्यापूर्वी ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याला प्राधान्य दिले जाऊ लागले. लाईक्स वरून, कंमेंट्स वरून माणसाच्या लोकप्रियतेची कसोटी लागली. आज घरा-घरातील नाती, आपलुकी ही मीडियावर जास्त रंगवली जात आहे. या मोहजालात आमची संवदेनशील मनं इतकी गुंतली आहेत की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही इथेच‘ऍक्टिव्ह’ आहोत. या मीडियाद्वारे ‘माणसे’ कनेक्ट करणं सोपं झालं आहे पण ‘मन’ कनेक्ट करणं मात्र अवघड . यात गुरफटलेल्या आयुष्यात कधी सोपे मार्ग आहेत, कधी चढ -उतार आहेत ;तर कधी Artificial Intelligence सारखी  अचानक येणारी,भयावह वाटणारी  वळणं ही आहेत. अनेकदा आपण याच्या इतके आहारी जातो की  त्या वळणांवर थांबून मागे वळून पाहायचंही विसरून जातो.  कारण ‘थांबणं’ म्हणजे ‘मागे पडणं ‘असं समीकरण बनलं आहे .  त्यामुळे पुढे जाण्याचा ताण, यशाच्या व्याख्या, स्पर्धा आणि अपेक्षांचे ओझे आपण सतत वाहत असतो . शरीर चालू असतं, पण मन मात्र थकलेले असते. अशाच क्षणी मन हळूच सांगते — ‘जरा विसावू या वळणावर.’

              हा विसावा म्हणजे आळस नव्हे, तर स्वतःला पुन्हा ओळखण्याची संधी असते.  या वळणावर श्वास सावरतो, विचार स्वच्छ होतात.,आपला खरा वेग आणि आपलं मन सापडतं. निसर्गही आपल्याला हेच शिकवतो -डोंगरही उंची गाठण्याआधी पायथ्याशी स्थिर उभा राहतो.डोंगरातून खळाळत वाहणारी नदी वळणावर थोडी संथ वाहते तर  समुद्राच्या लाटाही किनाऱ्यावर येऊन क्षणभर मागे सरकतात जणू पुन्हा बळ गोळा करण्यासाठी.

दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव ‘

              या दोन घडीच्या आयुष्यात कधी तरी थांबून मनाला, शरीराला आणि विचारांना विश्रांती देणे गरजेचे आहे. कारण श्वसन , भोजन आणि शयन या पलीकडेही माणसाला काही हवे आहे ते म्हणजे समाधान , मनःशांती !भरकटलेल्या आयुष्यात  हा विसावा एक ‘ज्योत’ बनून नवीन दिशा दाखवू शकतो  कारण  विसाव्याच्या क्षणी आपण मागे वळून पाहतो—आपला

आतापर्यंतचा प्रवास, घेतलेले निर्णय, केलेल्या चुका आणि मिळवलेले अनुभव. हे आत्मचिंतन आपल्याला योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवते. 

वळणावर थांबलं की कळतं — आपण कुठून आलो, कुठे जात आहोत  ,काय गमावलं, काय मिळवलं.. काही नाती सोबत असतात, काही आठवणींत उरलेली असतात. या सर्वांचा सारासार विचार करून समतोल साधला तर आयुष्य सुंदर होते.म्हणूनच, आयुष्याच्या प्रवासात थकल्यासारखं वाटलं, तर अपराधी वाटून घेऊ नका. पुढचा प्रवास अधिक सुंदर करण्यासाठी थांबा. स्वतःशी बोला. शांतपणे म्हणा-       

‘भले बुरे जे घडून गेले ,विसरून जाऊ सारे क्षणभर ,जरा विसावू या वळणावर’

-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-

द्वितीय क्रमांक विभागून – जरा विसावू या वळणावर  – ऐश्वर्या गोडबोले

“अभंग, ओवी, फटका, गवळण, धुंद पोवाडा धुंद लावणी,

मायमराठी भाषा अमुची, नक्षीदार भरजरी पैठणी,

ज्ञान-कला-भक्ती-विद्येचे,वैभव येथे सदा नाचते,

जे जे अनुपम अभिनव आहे,ते ते सारे येथे घडले !”

              माणूस हा समाजशील प्राणी आहे. संस्कृती हे प्रत्येक समाजाचे वैशिष्ट्य आहे. आणि याच संस्कृती वहनाचे “भाषा”हे प्रभावी माध्यम असून शिक्षणाच्या प्रक्रियेत सर्वाधिक महत्वाचा विचार आहे तो म्हणजे “भाषा.” 

शिक्षण प्रकिया पुढे घेऊन जात असताना विद्यार्थ्यांची भाषा किती समृद्ध आहे, यावरच त्याचे आकलन आणि गुणवत्ता अवलंबून असते.मात्र,वर्तमानात भाषा शिक्षणाचा विचार फारसा प्रभावीपणे व गंभीरपणे केला जात नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरंभापासूनच त्याच्या भविष्याची तयारी पालक करताना दिसतात. दुर्दैवाने, मातृभाषा हा कधीच आपल्या व्यवस्थेत महत्त्वपूर्ण विषय म्हणून शिकण्याचा विषय बनत नाही.

“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा!”

आज शालेय स्तरावरचा विचार केला तर मातृभाषा शिकवण्यासाठी कोणत्याही दर्जाचे शिक्षण चालते,असा समज पक्का झाला आहे. इंग्रजी सारखे विषय शिकवण्यासाठी मात्र उत्तम दर्जाचे शिक्षक हवेत असे म्हटले जाते. 

एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे.इतिहासातील योगदानावर मराठी समृद्ध झाली आहे. त्यामुळे,अभिजात दर्जा मिळाल्यावर हा दर्जा कायमस्वरूपी टिकण्याच्या दृष्टीने मराठी वाचणारी नवी पिढी घडवण्याची आवश्यकता आहे. ही पिढी घडली नाही तर ,मराठी साहित्य कोण वाचणार? साहित्य वाचले नाही तर ते लिहिणार कोण?असा हा सारा प्रवास एकमेकांत गुंतलेला आहे.त्यामुळे भाषिक अध्ययन अधिक गतिमान होण्याची गरज आहे.

लेखक संदीप वाकचौरे आपल्या ‘भाषा आणि शिक्षण’ या पुस्तकात खंत व्यक्त करतात की,“मराठी अभिजात झाली खरी,पण ती ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयास होताना दिसत नाही.” ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ही म्हणतात की, “भाषा मारता,देश ही मरे, संस्कृतीचाही दिवा विझे!”                 

“माय मराठी तुला मानतो सकळ जनांची आई,तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई,

संघर्षाचे शौर्य दिले तू,धैर्य दिले जगण्याचे,तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे,

तुझाच जयजयकार असावा सदैव अमुच्या ओठी!

              आपण मराठी माणसं एकीकडे मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करत आहोत,त्याचबरोबर दुसरीकडे   मात्र मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रवास होताना दिसत नाही. मराठी भाषा जीवनभाषा झाली तर तिचा प्रवास ज्ञानभाषेच्या दिशेने होईल. ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी माणसाचा संवाद महत्वाचा असतो. मराठी भाषेचा गौरव करण्याची भावना मनात असली तरी, आज मराठी भाषा बोलणे अनेकांना कमीपणाचे वाटू लागले आहे. दोन मराठी शिकलेली माणसं एकत्रित आली तरी मराठी बोलण्यापेक्षा इंग्रजी बोलणे पसंत केले जाते. आपलं मूल मराठी माध्यमात शिकते म्हणजे आपला सामाजिक दर्जा घसरला, असे जणू मानले जाते. मराठी बोलणे म्हणजे गावंढळ, आणि इंग्रजी बोलणे म्हणजे प्रतिष्ठित अशी धारणा दुर्दैवाने बनत चालली आहे. मराठी राजभाषा असलेल्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस शाळांची संख्या कमी होत आहे. ज्या शाळा अस्तित्वात आहेत, त्या मराठी शाळांत दिवसेंदिवस विद्यार्थी संख्येला उतरती कळा लागली आहे. भाषेसोबत संस्कृतीचाही प्रवास होत असतो. तो मार्गच थांबला तर, भाषा कशी टिकणार?  १८५७ मध्ये मोत्स्यवर्थन यांनी मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीच्या केलेल्या अभ्यासात मराठी भाषेत ६० हजार शब्दांची संपत्ती होती. मात्र काळाच्या ओघात  लोपवत जाणाऱ्या ग्रामीण संस्कृतीसोबत अनेक शब्द गमावले गेले.

भाषा ही नेहमीच माणसामाणसात संवादाचे काम करत असते. मात्र मूळ भाषेऐवजी जाणीवपूर्वक इतर भाषेतील शब्दांचे उपयोजन होत राहिले तर मूळ भाषेतील शब्दसंपत्ती आटत जाते.

आज भाषेचा विचार “गरज” म्हणून करायला हवा. क्रिकेट जेव्हा भारतात आले तेव्हा त्यासाठी लागणारे मराठी शब्द नव्हते मात्र, नवाकाळचे तत्कालीन संपादक कृ. क. खाडिलकर यांनी संबंधित खेळाचे वृत्त प्रकाशित करताना फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले शब्द वापरणे पसंत केले. जाणीवपूर्वक मराठी शब्दांची भर टाकत उपयोजन करण्याच्या भूमिकेमुळे भाषेत नवीन शब्दांची भर पडत गेली.

आज नव्या युगात,मराठी भाषेत पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.भाषेची गरज संपली की,भाषेचा प्रवास मृत्यूपंथाच्या दिशेने होतो. त्यामुळे माणसांची संवादाची भूक शमविण्याची शक्ती भाषेने कमवायला हवी.

“शाळा मराठी आमची, शाळा मराठी वं! जशी लेकरा माय धरतीया पोटी वं!”    

    अलीकडे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘क्रांतिज्योती मराठी विद्यालय’, सारखे चित्रपट ही मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्याचे मोलाचे कार्य करत आहेत.आज संपत चाललेल्या मराठी शाळा आणि मराठी भाषा संवर्धनाची गरज लक्षात घेता हा चित्रपट म्हणजे माणसाला झोपेतून जागं करण्याकरता असलेला मैलाचा दगडच ठरतोय असा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

थोडक्यात काय तर, परकीय भाषेच्या वाटा चालत असताना आपली भाषा मरणार नाही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.आपल्या भाषेची प्रतिष्ठा मनामनात रुजवण्याची गरज आहे.भाषा समृद्ध होत गेली तर ती ज्ञानभाषेची वाट चालण्यास सक्षम होत असते.त्यासाठी, श्रवण,भाषण,वाचन,लेखन ही भाषेची मुख्य चतु:सूत्री वृध्दिंगत करण्यावर भर दिला पाहिजे. वैयक्तिक, स्थानिक पातळीवर भाषाविषयक आग्रह धरताना सरकारी पातळीवरही प्रयत्न करण्याची गरज आहे. ’महावाचन उत्सव’, ‘रिड इंडिया सेलिब्रेशन’ सारख्या चळवळी यासाठी मोलाची मदत करतात. तोपर्यंत,आपण संयमाने आणि नेटाने प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

कारण,संयमाची मुळं, सकारात्मकतेचे खोड,विश्वासाच्या फांद्या,उत्साहाची पानं, सचोटीची फुलं असतील तरच समाधानाचे पक्षी असतात. तेव्हा याबाबतही,कायम अनुकूलच परिस्थिती असेल असे नाही मात्र,अनुकूल किंवा प्रतिकूल कुठल्याही स्थितीत आपण आपला खारीचा वाटा उचलूया,आणि लक्षात ठेवूया…

“कधी ऊन तर कधी सावली,कधी चांदणे तर कधी काहीली

गोड करुनिया घेतो सारे, लावूनीया प्रीतीची झालर

जरा विसावू या वळणावर,या वळणावर !!!”

-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-

 तृतीय विभागून  – दुरून सुंदर वाटणारे आयुष्य –  ध्रुव वैशाली महेश लवाटे

आयुष्याच्या प्रवासात चालताना आपली नजर नेहमी fक्षfतजाकडे असते. fतथे लांबवर fदसणारे fहरवेगार डोंगर, त्यावरील धुक्याची चादर आfण fतथली शांतता आपल्याला साद घालत असते. fनसगा चे हे रूप जसे आपल्याला भुरळ घालते, तसेच काहीसे मानवी आयुष्याचेही आहे. आपल्याला स्वतःच्या आयुष्यातील खडतर वाटांपेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यातील गुळगुळीत रस्ते जास्त आकfष त करतात. याच मानवी स्वभावाचे अचूक वण न आपल्या पूव जांनी एका साध्या पण अत्यंत अथ पूण म्हणीत करून ठेवले आहे ‘दुरून डोंगर साजरे.’

              ही म्हण म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ती मानवी असमाधानाचा आरसा आहे. आपण जेव्हा एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला काय fदसते? फक्त त्याचे यश, पैसा, मोठी गाडी आfण तो झगमगाट! एका क्षणाधा त आपल्या मनात fवचार येतो, “नशीबवान आहे हा माणूस! काय राजासारखे

              आयुष्य जगतोय!” पण त्या राजाच्या डोक्यावरचा मुकुट fकती जड आहे, हे फक्त त्यालाच ठाऊक असते. त्या यशाच्या fशखरावर पोहोचताना त्याचे पाय fकती रक्ताळले असतील, त्याने fकती रात्री उशाशी fचंता घेऊन काढल्या असतील, हे आपल्याला fदसत नाही. आपल्याला फक्त fफfनश लाईन fदसते, पण त्याआधीची दमवणारी मॅराथॉन fदसत नाही. डोंगर दुरून पाहताना जेवढा नयनरम्य वाटतो, तो चढताना लागणारी धाप आfण टोचणारे काटेकुटे हे फक्त चढणाऱ्यालाच समजतात.

              लहानपणीची आठवण काढली की या म्हणीचा प्रत्यय आणखी गडद होतो. शाळेत असताना पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन जाताना वाटायचे, “हे मोठे लोक fकती सुखी आहेत! त्यांना अभ्यास नाही, गृहपाठ नाही, फक्त मज्जाच मज्जा!” आपल्याला लवकर मोठे व्हायचे होते. पण आज, जेव्हा आपण खरोखर मोठे झालो आहोत, नोकरी-व्यवसायाच्या चक्रव्यूहात अडकलो आहोत, तेव्हा मन पुन्हा शाळेच्या त्या fदवसांकडे धाव घेते. आता वाटते, “तेच fदवस खरे सोन्याचे होते.” म्हणजेच, आपण ज्या वळणावर उभे असतो, fतथून पुढचे fकंवा मागचे वळणच आपल्याला जास्त सुंदर वाटते. वत मानातील सौंदया पेक्षा

              कल्पनेतील भfवष्य fकंवा आठवणीतील भूतकाळ आपल्याला नेहमीच साजरा वाटतो.

              नातेसंबंधांच्या बाबतीत तर ही म्हण म्हणजे एक मोठे मृगजळच ठरते. बाहेरून हातात हात घालून fफरणारी जोडपी fकंवा समाज माध्यमांवर परफेक्ट फॅfमली चे फोटो टाकणारे कुटुंब पाfहले की आपल्याला आपल्याच नात्यातील त्रुटी fदसू लागतात. आपल्याला वाटते, “यांच्यात fकती प्रेम आहे, आfण आमच्यात फक्त कटकटी!” पण वास्तव हेच असते की, ‘घरोघरी मातीच्याच चुली’ असतात. बंद दरवाजाच्या आड प्रत्येक घरात वाद असतात, मतभेद असतात आfण कधीकधी अबोलाही असतो.

              जगासमोर हसणारा चेहरा घेऊन वावरणाऱ्या माणसाच्या मनात कदाfचत एकटेपणाचे वादळ असू शकते. त्यामुळे दुसऱ्यांच्या नात्यांचे वरवरचे दश न घेऊन स्वतःच्या माणसांना कमी लेखणे, हा आपल्यावरच केलेला अन्याय नाही का?

              आजच्या या आधुfनक युगात तर आपण एका आभासी जगात जगत आहोत. इन्स्टाग्राम आfण फेसबुकवरचे ते fफल्टरलावलेले फोटो आfण आनंदाचे क्षण पाहून आपण स्वतःलाच कमी समजू  लागतो. दुसऱ्याच्या ताटातले वाढलेले तूप आपल्याला नेहमीच जास्त वाटते. कोणीतरी fफरायला गेलेले असते, कोणीतरी नवीन घर घेतलेले असते; हे पाहून मनात कुठेतरी एक अस्वस्थतेची पाल चुकचुकते. “माझेच आयुष्य इतके साधे का?” पण आपण हे fवसरतो की, समाजमाध्यमांवर लोक फक्त आपल्या आयुष्याचे ट्रेलर दाखवतात, पूण fसनेमा नाही. आfण fसनेमात जसे रटेकअसतात, तसे जीवनात नसतात. fतथे fदसणारे हसू अनेकदा ओठांवर आणलेले असते, ते मनातून आलेले असेलच असे नाही.

खरं तर, fनसगा ने प्रत्येकाला वेगळा डोंगर चढायला fदला आहे. दुसऱ्याचा डोंगर fहरवा fदसतो कारण आपण त्याच्या जवळ नाही आहोत. कदाfचत त्या व्यक्तीला आपला डोंगर जास्त सुंदर वाटत असेल! कस्तुरीमृगासारखे आपण सुख बाहेर शोधत धावत राहतो, पण अनेकदा ते आपल्याच जवळ असते. गरज असते ती फक्त आपली दृष्टी बदलण्याची. ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीमधून आपल्याला एक महत्त्वाचा धडा fमळतो. कोणत्याही गोष्टीचा fनष्कष घाईघाईने काढू नये. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात आfण प्रत्येक यशामागे मेहनतीची कहाणी असते. दुसऱ्यांच्या आयुष्याशी सतत तुलना केल्याने असमाधान वाढते. त्याऐवजी आपल्या आयुष्याचे वास्तव स्वीकारणे आfण त्यात आनंद शोधणे अfधक महत्त्वाचे आहे.

              शेवटी ही म्हण आपल्याला वास्तववादी आfण समजूतदार दृिष्टकोन देते. ती आपल्याला fशकवते की, बाह्य चमकधमक पाहून भुलू नये, तर प्रत्येक अनुभवाकडे समजून घेण्याच्या नजरेने पाहावे. जीवनाचा खरा आनंद हा इतरांच्या आयुष्यात नसून, आपल्या आयुष्याला अथ पूण बनवण्यात आहे.

-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-

तृतीय विभागून  – जरा विसावू ह्या वळणावर – सौ. राणी नंदकिशोर आहेर

              जीवन म्हणजे अखंड वाहणारी नदी आहे. तिचा प्रवाह कधी शांत, कधी खवळलेला असतो. कधी ती डोंगरदऱ्यांतून उड्या मारत पुढे जाते, तर कधी विस्तीर्ण मैदानात शांतपणे वाहत राहते. या प्रवासात माणूस ध्येयाच्या दिशेने सतत धावत राहतो. यश मिळवायचे, उंच शिखरे गाठायची, अपेक्षा पूर्ण करायच्या—या सगळ्या धडपडीत तो अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. वाटेवरील निसर्गसौंदर्य, सावली, थंड वारा, पक्ष्यांचे कलरव आणि आपलीच माणसे हळूहळू पार्श्वभूमीवर जातात. आयुष्य जगण्याऐवजी ते फक्त “पूर्ण” केले जात आहे, अशी भावना मनात घर करू लागते. अशाच वेळी जीवनाच्या वाटेवर एखादे वळण येते आणि तेथे थांबून मन नकळत म्हणते— “जरा विसावू ह्या वळणावर.”

              आजचे युग वेगाचे आहे. घड्याळाचे काटे जणू माणसाच्या पावलांपेक्षा वेगाने धावत आहेत. शिक्षण घेताना स्पर्धा, नोकरी करताना स्पर्धा, यश मिळाल्यावरही पुढच्या यशाची स्पर्धा—अशी अखंड धाव सुरू आहे. अपेक्षांचे ओझे वाढत जाते, जबाबदाऱ्यांची यादी लांबत जाते आणि स्वतःसाठी राखलेला वेळ कमी होत जातो. माणूस “व्यस्त” असतो, पण समाधानी नसतो. शरीर पुढे चालत असते, पण मन थकलेले, गोंधळलेले आणि अस्वस्थ असते. या अखंड धावपळीत तणाव, चिडचिड, असमाधान आणि अपूर्णतेची जाणीव वाढत जाते. अशा वेळी विसावा म्हणजे आळस नव्हे, तर स्वतःशी संवाद साधण्याची, मन सावरण्याची आणि पुढील प्रवासासाठी स्वतःला तयार करण्याची गरज असते.

संस्कृतमध्ये म्हटले आहे—
“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।”

              म्हणजे शरीर आणि मन हीच सर्व कार्यांची मूळ आधारशिला आहे. जर तीच थकली, तर कोणतेही यश टिकणारे नसते. आरोग्य आणि मानसिक शांतता नसतील, तर मिळवलेले यशही बोथट, रिकामे आणि निरर्थक वाटू लागते. म्हणूनच जीवनाच्या प्रवासात वेळोवेळी थोडा विसावा घेणे अत्यावश्यक ठरते. हा विसावा म्हणजे पळून जाणे नव्हे, तर थांबून स्वतःकडे पाहणे, आत डोकावणे आणि पुढचा मार्ग ठरवणे होय.

वळणावर थांबणे म्हणजे हार मानणे नव्हे. उलट, तो आत्मपरीक्षणाचा सर्वांत महत्त्वाचा क्षण असतो. आपण कुठून आलो, काय मिळवले, काय गमावले, कोणत्या चुका केल्या, कुठे घाई केली, कुठे थांबायला हवे होते—याचा शांतपणे विचार करण्याची ही वेळ असते. या थांब्यात अनुभवांचे मोल उमगते. अपयशाची कारणे स्पष्ट होतात, यशाचे खरे अर्थ कळतात आणि पुढील वाटचालीसाठी योग्य दिशा ठरते. म्हणूनच म्हटले आहे—
“न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।”
ज्ञान आणि आत्मभान यासारखे पवित्र काहीच नाही, आणि हे आत्मभान धावण्यातून नव्हे, तर विसाव्यातूनच मिळते.

              निसर्ग आपल्याला विसाव्याचे सुंदर धडे देतो. वाहती नदी अखंड पुढे जात असली, तरी वळणावर ती क्षणभर संथ होते. त्या संथतेत तिची खोली वाढते, प्रवाहाला अर्थ मिळतो. सूर्य मावळताना थांबतो, आकाश लालसर छटा घेते, आणि त्या शांत क्षणातूनच दुसऱ्या दिवशी नवे तेज जन्माला येते. झाडे ऋतूनुसार विश्रांती घेतात—पानगळ होते, स्थैर्य येते, आणि त्याच विश्रांतीनंतर नव्या पालवीने ती सजतात. समुद्रही भरती–ओहोटीच्या लयीत विसावा घेतो. निसर्ग आपल्याला शिकवतो की थांबणे म्हणजे संपणे नव्हे, तर नव्याने उमलणे आहे. 

व. पु. काळे यांच्या साहित्यामध्ये माणूस सतत स्वतःशी संवाद साधताना दिसतो. त्यांच्या कथांतील व्यक्तिरेखा आयुष्याच्या वळणावर थांबतात, स्वतःला प्रश्न विचारतात, उत्तर शोधतात आणि मगच पुढे जातात. वापूंच्या मते विसावा म्हणजे पलायन नव्हे, तर आत्मभान. स्वतःला समजून घेतल्याशिवाय पुढे जाणे धोकादायक ठरू शकते. त्यांच्या लेखनातून माणूस शिकतो की थांबणे ही कमजोरी नसून शहाणपणाची खूण आहे. त्यामुळे “जरा विसावू ह्या वळणावर” हा विचार वापूंच्या जीवनदृष्टीशी अतिशय जवळचा वाटतो.

              पु. ल. देशपांडे यांच्या लेखनात मात्र जीवनाकडे पाहण्याची एक हसरी, पण खोल दृष्टी दिसते. ते सांगतात की आयुष्य फार गंभीरपणे घेतले, तर ते कंटाळवाणे होते. पुलंच्या मते थांबणे म्हणजे काम चुकवणे नव्हे, तर आपण काय करतोय हे कळण्याची उसंत घेणे. त्यांच्या शैलीत सांगायचे तर, धावताना फक्त पाय पुढे जातात; थांबल्यावर मात्र मन पुढे जाते. जीवनातील विसंगती, धावपळ, थकवा आणि गोंधळ यावर पुलं हसत-हसत प्रकाश टाकतात आणि माणसाला थोडा हलका श्वास घ्यायला शिकवतात.

आजच्या समाजात सतत व्यस्त असणे म्हणजेच यश, अशी चुकीची धारणा रूढ झाली आहे. मोकळा वेळ म्हणजे वाया गेलेला वेळ, असे मानले जाते. “थांबणे” म्हणजे मागे पडणे, अशी भीती मनात बसलेली आहे. पण विसाव्याविना जीवन यांत्रिक, कोरडे आणि भावनाशून्य होते. विसाव्यामुळे नाती जपली जातात, संवाद वाढतो, संवेदनशीलता जागी होते आणि जीवनाला

मानवी स्पर्श मिळतो. भगवद्गीतेत सांगितले आहे—
“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।”

म्हणजे संतुलन हाच जीवनाचा खरा आधार आहे, आणि तो विसाव्याशिवाय साध्य होत नाही.

              आज माणसाने थांबण्याची कला शिकली पाहिजे. थांबून पाहिले तरच पुढचा रस्ता दिसतो. थांबून विचार केला तरच ध्येय स्पष्ट होते. थांबून श्वास घेतला तरच पुढे जाण्याची ताकद मिळते. विसावा हा दुर्बलतेचा नव्हे, तर शहाणपणाचा आणि आत्मजाणीवेचा लक्षण आहे. जो माणूस योग्य वेळी थांबतो, तोच योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो.

              शेवटी, पुलं असते तर कदाचित ते असं म्हणाले असते की, आयुष्य म्हणजे लोकल ट्रेन आहे—ती सतत धावत राहिली तर सुटतेच; पण कुठे उतरायचं हे ठरवलं नाही, तर माणूस अख्खं आयुष्य उभ्यानेच प्रवास करतो! म्हणूनच आयुष्य एखाद्या वळणावर थांबून म्हणतं— “जरा विसावू या—क्षणभर थांब, चहा घे, विचार कर आणि मग पुढे जाऊ.” कारण विसाव्याशिवाय आयुष्य पुढे जात नाही; ते फक्त पळत राहतं. आणि पळता-पळता जगलेलं आयुष्य, पुलंच्या भाषेत सांगायचं तर, फारसं जगलेलं नसतंच!

x-x-x-x-x-x-x-x-x-x-x

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *