–रेखा नाईक–
महाराष्ट्र मंडळातील सर्व मित्रवर्गास अभिवादन !!
सप्रेम नमस्कार विनंती विशेष !!
नव्या जोमाने नव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सनविविच्या नवीन स्वरूपाबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन. मासिकासाठी *साहित्योन्मेष* या मथळ्याखाली साहित्यनिर्मितीसाठी केलेल्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. स्पर्धक म्हणून नव्हे तर नियमितपणे काहीतरी लिहिता यावे म्हणून या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा मी संपादक मंडळासमोर व्यक्त केल्यानंतर, त्यांच्याकडून आलेला होकार माझ्या वाचन आणि लेखनाच्या छंदास एक शिस्तबद्ध स्वरूप देण्यास कारणीभूत ठरेल, याच अपेक्षेने लिहायचे ठरवले.
कोरोना काळात अनेक गटांमध्ये अनेक प्रकारचे साहित्यिक उपक्रम राबवण्यात आले त्यातीलच एका गटातील आवडलेला उपक्रम होता वाचते व्हा ! लिहिते व्हा !! ह्या आवाहनाचे स्वरूप थोडेसे बदलून स्वतःलाच नियमित सवय लावून घेण्याच्या दृष्टीने असे ठरवले की चला *वाचू काही लिहू काही* !!
आणि त्याच संकल्पनेतून सुरू केला स्वतःसाठीचा हा उपक्रम. वाचलेले जे जे आवडेल त्यावर काहीतरी लिहिण्याच्या प्रेरणेतून अत्यंत आवडलेल्या पुस्तकावरील हे पहिले भाष्य !!!
पुस्तक : गोफ जन्मांतरीचे
लेखिका : डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर
प्रकाशक : राजहंस
पृष्ठसंख्या : ३२४
किंमत : ३२५ रुपये
*गोफ जन्मांतरीचे* हे पुस्तकाचे शीर्षक आणि त्याला असणारी टॅगलाईन *अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे*- हीच मुळात पुस्तकाकडे लक्ष वेधून घेणारी गोष्ट. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळ्यात आधी वाचला तो मलपृष्ठावरील सारांश.
*निसर्ग फक्त असतो, तो दुष्ट नाही आणि सुष्ट ही नाही. तो फक्त अंगभूत नियमानुसार वागत असतो. निसर्गाच्या नियमांमधून उत्क्रांती घडत असते. त्यातून फक्त माणूसच जन्माला येतो असे नाही तर भोवतालच्या जगाशी असलेली त्याची नातीही याच उत्क्रांतीच्या नियमांप्रमाणे घडतात*.
सारांशातील ही काही वाक्ये एका विज्ञानप्रेमी आणि विश्लेषणात्मक वाचनाची आवड असणाऱ्या वाचकाला आकर्षित करून घ्यायला पुरेशी ठरतात.
कमल शेगडे यांचं मुखपृष्ठावरील चित्र विषयाला साजेसं आहेच पण त्याहूनही जास्त आकर्षित करते ते सुरूवातीला डावीकडच्या पानावर असलेले चित्र आणि त्या चित्राला दिलेले समर्पक असे जोड वाक्य – *Simplicity piled on simplicity creats complexity* ह्या वाक्यावरून आपल्या समोर काय आणि कशा पद्धतीने मांडले जाणार आहे याचा अंदाज येतो.
अनुक्रमणिकेतील तीन विभाग वाचनाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांची जाणीव करून देतात. वाचनाचा हा प्रवास कोsहम या अत्यंत वैयक्तिक प्रश्नापासून सुरु होऊन, मानवमूल्यांच्या उत्पत्तीचा टप्पा गाठत थेट समाजमूल्यांच्या उत्पत्तीलाही असलेल्या उत्क्रांतीच्या पायाचा वेध घेणारा असा लांब पल्याचा प्रवास आहे.
विषय खूपच सखोल व विश्लेषणात्मक असल्यामुळे सुरुवातीला लेखिकेने लिहिलेली प्रस्तावना, पुस्तक पूर्ण वाचून झाल्यानंतर जास्त अर्थपूर्ण वाटते.
प्रत्येक विभागाची सुरुवात त्या त्या विषयाला समर्पित शास्त्रज्ञांचे विचार व्यक्त करणार-या उता-यांने करण्याच्या कल्पनेतून, लेखिकेने विनम्रपणे त्या त्या शास्त्रज्ञाला केलेली मानवंदनाच दिसून येते.
जीवसृष्टीचे रहस्य उलगडणारा पहिला विभाग विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या वाचकाला बराच परिचयाचा वाटतो तर इतर वाचकांना कदाचित थोडा क्लिष्ट वाटू शकतो.
ह्या विभागात सांकेतिक भाषेची उकल करणाऱ्या जीनोमच्या उत्पत्ती आणि विकासापासून, पंचमहाभूतांचे शरीरात होणारे रूपांतर म्हणजेच *जडातून चैतन्य उद्भवले कसे* हा रंजक प्रवास उत्कंठावर्धक पद्धतीने लेखिका मांडते.
त्याच प्रमाणे पुढे *LUCA* (Last Universal Common Ancestor) म्हणजेच लहानश्या रेणू पासून घडत जाणाऱ्या निसर्गातील प्रगत रचनांपर्यंतचे टप्पे पण, नेहमीच्या माहितीतील उदाहरणे देत आपल्या डोळ्यासमोर अगदी शब्द चित्र उभे केल्याप्रमाणे लेखिका रंगवत जाते. ह्याच पद्धतीने आदिजीवापासून मानव निर्मितीपर्यंतच्या उत्क्रांतीच्या घटना लेखिकेच्या लेखणीतून अगदी चित्रपट बघितल्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर घडत जातात.
चैतन्य निर्मितीपासून मानवनिर्मितीच्या प्रवासात घडलेल्या उत्क्रांतीच्या घटनांमधून प्रवास करत करत आपण दुसऱ्या विभागापर्यंत येतो.
दुसर-या विभागात घडतो तो *भावभावनांच्या निर्मितीचा प्रवास*. सहकार्य आणि सहउत्क्रांतीच्या विकसित होत जाणा-या सिद्धांतांमागे दडलेली शास्त्रीय कारणे, जसजशी आपल्यासमोर उलगडत जातात तसतशी बुद्धीला खात्री पटत जाते ती जीनोम नावाच्या त्या पहिल्या रेणूच्या महत्त्वाची !! अगदी लेखिकेच्या शब्दातच सांगायचे झाले तर- *खरोखरीच अरबी कथेपेक्षा ही सुरस आणि चमत्कारिक रहस्यकथे पेक्षाही गूढ, कवी कल्पनेपेक्षाही रम्य आणि आत्मचरित्रा पेक्षाही सत्य, असे हे मानवजातीचे आत्मचरित्र म्हणजेच *जीनोम* !!
जीनोम ह्या अगदी मूलभूत अशा गुणसूत्रातूनच आलेली स्पर्धेची भावना मनुष्य स्वभावात आणि पुढे समाज मनातही किती ठामपणे का आणि कशी रुजते ते विज्ञानाच्या चष्म्यातून बघणे वाचकासाठी एक वेगळीच पर्वणी ठरते !!
त्यानंतर तिसऱ्या विभागात म्हणजेच प्रवासातल्या शेवटच्या टप्प्यावर लेखिकेने आढावा घेतला आहे तो विकसित होत जाणाऱ्या समाज मूल्यांचा . विज्ञानाच्या कक्षेत राहूनच शोध घेतला आहे तो समाज मनातील भावविश्वाचा, अगदी सजातीय सहकार्यापासून विजातीय सहकाऱ्याला असणाऱ्या शास्त्रशुद्ध पायाचा. समाजमनातील सर्व चांगल्या वाईट भावनांचे, निरीक्षण, विश्वासार्हता आणि दुहेरी अस्तित्व अशा सर्व वृत्ती-प्रवृत्तींचे मूळ शोधण्याचा हा शास्त्रशुद्ध प्रवास, आपल्याला शेवटी जनुक नियंत्रित वर्तणुकीला असलेल्या संस्कारांच्या आवश्यकतेचे महत्व वैज्ञानिकरीत्या प्रभावीपणे प्रतिपादित करण्याच्या गंतव्यस्थळी आणून पोहोचवतो.
वैज्ञानिक तथ्यांवर आधारित असलेले आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने केलेल्या वाचनाची आवड असणाऱ्यां माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे एक मोलाची पर्वणी आहे . विज्ञानाची फारशी आवड नसणाऱ्यांसाठीही फार खोलात जायचे नसल्यास, फक्त तिस-या विभागाचे वाचनही खूप समृद्ध करणारे असेच आहे. वैज्ञानिक श्रेणीतल्या मराठी साहित्य लेखनात, पूर्णतः वैज्ञानिक धर्तीच्या ह्या पुस्तकाची भर मोलाची ठरेल, अशी खात्री आहे.
वाचू काही लिहू काही
Categories:
