— उर्मिला जाधव —
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन! मंडळातला २०२२ मधला पहिला कार्यक्रम!
अर्थातच उत्साहाने भारलेले वातावरण, पण ओमायक्रॉनचे नियम लक्षात घेऊन अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, श्री.अरुण घाटगे व सौ.घाटगे.
सकाळी साडे आठ वाजता ध्वजारोहण झाल्यावर पाहुण्यांसोबत गप्पा आणि अल्पोपहार झाला.
त्यानंतर ९.३० वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. मंडळाच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अजित एदलाबादकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
श्री.अरुण घाटगे हे इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. शासनाच्या विविध समितीवर ते नियुक्त आहेत. त्यांची दुसरी ओळख म्हणजे 1991 मध्ये देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या फ्लाईंग ऑफिसर मदन घाटगे ह्यांचे ते बंधू आहेत.
त्यांनी एअरफोर्समधे सेवा करत असताना देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या, आपल्या बंधूंच्या आठवणींना उजाळा दिला. अगदी शाळेत असल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतच्या!
ऐकत असताना खूप अभिमान वाटत होता. त्यांचे नीडर व्यक्तिमत्व, त्यांचे धैर्य, कशाही परिस्थीतीत न डगमगता देशासाठी काम करायची असलेली तयारी, मरणाची यत्किंचतही भीती न बाळगता अखेरच्या श्वासापर्यंत झोकून देऊन केलेले कार्य…..सगळे भारावून टाकणारे होते.
या शहीद झालेल्या शूरवीरांच्या कुटुंबियांवर, आई वडील,भाऊ,बहीण यांच्यावर जो कायमस्वरुपी आघात होतो, ते ऐकताना खरच अंगावर शहारे आले, काय ती हिंमत!!सगळे नतमस्तक झाले होते.
आपण नागरिकांनी देशरक्षणासाठी कसे योगदान देणे गरजेचे आहे ह्याची जाणीव झाली.
घाटगे साहेब, जे स्वत: उद्योजक आहेत….त्यांनी त्यांचे सध्या सुरु असलेले लघुउद्योग भारतीचे,भारत विकास परिषदेचे आणि टेक इंडियाच्या कार्याबद्दल माहिती दिली. वेगवेगळ्या स्टार्ट अप कंपन्यांबरोबर ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र मंडळ आणि मराठी उद्योजक परिवाराबरोबर जोडले जाऊन, योगदान देऊन नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करायची इच्छा त्यांनी दर्शविली. तरुण उद्योजकांसाठी ही मोलाची संधी ठरेल, ह्यात शंका नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थिती जरी कमी असली तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे
श्री. अरुण घाटगे साहेबांचे प्रेरणादायी भाषण सर्वांना ऐकायला मिळाले. हा दिवस नक्कीच कायमस्वरूपी लक्षात राहील.
