श्रद्धांजली

मधुश्री सरदेशपांडे

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या आजीव सदस्य सौ. मधुश्री देशपांडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मंडळाच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ह्यापुढे त्यांची उणीव भासेल.

महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी आणि स न वि वि तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मधुश्री सरदेशपांडे, एक लोभस व्यक्तिमत्त्व!

      तिची आणि माझी मैत्री स्नेहधारामधली,४०हून अधिक वर्षांची. आमची मुले बरोबरीची, स्नेहधाराच्या अनेक उपक्रमात आम्ही बरोबर होतो. १९९१ पासून तर आमची घरेही जवळ आली आणि आम्ही रोज सकाळी चालायला जायला सुरुवात केली – मधुश्री, नीता जोशी आणि मी. आम्ही महालक्ष्मी लेआउट मधलं घर सोडेपर्यंत,म्हणजे १४-१५ वर्षे हे रुटीन चालू राहिलं. हसत, खेळत, गप्पा  मारत चालताना दिवसाची सुरुवात मोठी प्रसन्न होत असे. ह्याच काळात आमच्या त्रिकुटाने ‘कमलाबाई मराठे करंडक’ स्पर्धेसाठी स्नेहधारा तर्फे अनेक एकांकिका सादर केल्या. त्यात मधुश्रीचं ध्वनी संयोजन,नीताची प्रकाश योजना आणि माझं दिग्दर्शन – खूप मजा यायची.

      संगीताची तिला उत्तम जाण व आवाज होता. आपल्या ठसकेदार आवाजात ती मराठी गाणी, लावण्या फार सुरेख म्हणत असे. स्नेहाधारेच्या हौशी गायिकांच्या ‘सूरमयी ‘ ह्या ग्रुपमध्ये ती रमली, तिच्यात आत्मविश्वास आला. स्नेहधारेत सादर केलेल्या सूरमयी च्या कार्यक्रमांमध्ये तिने रंगत आणली. शास्त्रीय संगीताचे शिक्षणही ती घेत होती.

      महाराष्ट्र मंडळाच्या कित्येक गाण्याच्या कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. लहान व मोठ्या नाटकांमधूनही तिने भूमिका केल्या व प्रेक्षकांची दाद मिळवली. तिच्या काही भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहेत. मंडळाच्या कार्यकारिणीत तिने काम केले, स न वि वि संपादक मंडळाची धुरा सांभाळली. मंडळाची ती हितचिंतक व चोखंदळ प्रेक्षक होती. तिच्यामुळे सरदेशपांडे कुटुंब मंडळाशी जोडलं गेलं. तिचे सूक्ष्म निरीक्षण आणि विनोदबुद्धी यामुळे कुठल्याही सहली, स्नेहसंमेलनाचा ती केंद्रबिंदू असे- नकला, गाणी, किस्से यांनी ती अशी काही मैफिल जमवायची —- पण कुणालाही न दुखवता. उलट स्वतःवर विनोद करण्याची, आपलीच फजिती रंगवून सांगण्याची खिलाडू वृत्ती तिच्यात होती. संवेदनशील मनही होतं. तिच्या स्वभावामुळे तिने अनेक माणसे जोडली . सासर- माहेर दोन्ही मोठी कुटुंबं – ती ह्या दोन्हीतला दुवा होती. कुणाच्याही लहानशा गुणाचं तिला कोण कौतुक! आयुष्यात आनंद भरभरून दिला आणि घेतलाही. साधी राहणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम यांनी तिने आपला डायबेटीस दूर ठेवला, परंतु कॅन्सरचा आघात ती सहन करू शकली नाही. अप्पण्णा सारखे कर्तबगार  मनमिळाऊ पती, हुशार लाघवी मुले, नातवंडे या सगळ्यांना तिची उणीव भासेल आणि स्नेहधारा सभेची सांगता ‘ वंदेमातरम’ ने झाल्यावर खणखणीत आवाजात ‘भारतमाताकी जय’ ऐकू आलं नाही की आमचे डोळे पाणावतील.

तिच्या आत्म्याला सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

ऋता दीक्षित

माझी आणि मधुश्रीची ओळख स्नेहधारेमुळे झाली. आम्ही दोघीही गृहिणी…आमची घरं जवळ…मुलेही समवयस्क आणि शाळा एकच होती. आम्हा दोघींना विविध विषयात रस असल्यामुळे अनेक एकांकिका, नाटक आणि कार्यक्रमात आम्ही सहभागी होत होतो.

              मधुश्रीमध्ये एक नकलाकार लपलेली होती. एखाद्याची विशिष्ट लकब, चालण्या, बोलण्याची हातवारे करण्याची विशेष खुबी नजरेला पडली की ती लगेच करून दाखवत असे. तिच्या उत्स्फूर्त विनोदामुळे ती नेहमी सगळ्यांना हसवत राही. तिने मंडळाच्या काही मोठ्या नाटकातून आणि अनेक एकांकिकेतून काम केलं होतं.

पण तिचं प्रथम प्रेम म्हणजे गाणं होतं. जात्याच असलेला गोड गळा, स्वर आणि तालाची उत्तम समज आणि उपजत जाण असलेली मधुश्री कुठलंही गाणं लीलया म्हणत असे.

तिची लावणी इतके ठसकेबाज असे की आम्ही अनेक जणी तिच्या फॅन होतो. पन्नाशी नंतर तिने गाणं शिकायला सुरुवात केली आणि त्यातही ती मनापासून रमली.

मुख्य म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोन तिच्याकडे होता. ओळखीच्या कोणीही काही चांगलं केलं की मनापासून दाद देत कौतुक करायची. एक छान समृद्ध जीवन आनंदाने जगत होती.

              दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने तिला गाठले आणि सारे क्रमप्राप्त उपचार सुरू झाले. पण त्या सर्वांना  ती धैर्याने सामोरे गेली. अगदी शेवटपर्यंत तिची विनोद बुद्धी शाबूत होती.

तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना.

नीता जोशी.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *