साधारण लेखन स्पर्धा म्हटले की तयारी साठी अगदी कमी अवधी मिळतो. त्यामुळे कित्येक वेळा इच्छा असूनही मनासारखे लिखाण होत नाही किंवा इतर कारणांनीही स्पर्धेत भाग घेता येत नाही. काही तरुण लेखकांशी संवाद साधला असताना असे लक्षात आले की लिहायला विषय मिळाला तर जास्त चांगले लेखन होते. ह्यावर विचार करताना असे वाटले की आपणच का अशी स्पर्धा घेऊ नाही?
२०२१ च्या गणेशोत्सव सनविवि विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात साहित्योन्मेष स्पर्धा जाहीर करण्यात आली. ‘बारा महिने बारा लेख’
सांगायला अतिशय आनंद वाटतो की संपूर्ण भारतातून चौकशीसाठी फोन आले. त्यामुळे पहिल्या २५ लेखकांना ह्या स्पर्धेत प्रवेश दिला गेला. पहिले तीन महिने स्पर्धकांनी त्याच्या आवडीच्या विषयावरील लेख पाठवायचे होते. त्यानंतर विषयानुरूप लेखन करायचे आहे. स्पर्धेचे सहा महिने पूर्ण झाले आहेत. प्रत्येक महिन्यागणिक लेखनाचा दर्जा उंचावत आहे. वाचकांनी अभिप्राय देऊन त्यांचा उत्साह वाढवावा.
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू गेली पस्तीस वर्ष सनविवि हे मासिक प्रकशित करत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते डिजिटल स्वरूपात झाल्यामुळे त्याचा आवाका वाढला आहे. साहित्योन्मेषमुळे महाराष्ट्र मंडळाची कीर्ती सर्वदूर पोहचणार हे नक्की.