मातृभाषेचा उत्सव
मातृभाषा मराठीचा गौरव करणारे अनेक समारंभ,उत्सव आपल्याकडे होत असतात.त्यातलाच एक पारंपरिक आणि १८७८ सालापासून प्रामुख्याने महाराष्ट्रात चालत आलेला उत्सव म्हणजे *आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन*.गेल्या १४० वर्षांपेक्षा जास्त काळ माय मराठी चा हा उत्सव मोठ्या दिमाखात वेगवेगळ्या शहरात चालू आहे.आता तर या उत्सवाने पंजाब मधील घुमान, देशाची राजधानी दिल्ली येथे सुद्धा आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
बेंगळूरु सारख्या बहुभाषिक पण मुख्य भाषा कन्नड असलेल्या शहरात राहताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या फक्त वार्ता कानावर पडायच्या. १९९० च्या दशकात मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळाले तर मराठीचा हा उत्सव केव्हातरी डोळे भरून पाहावा अशी ओढ मनाला लागायची.पण त्या वेळी वेळच्या वेळी संमेलनाबद्दल माहिती मिळून संमेलन सोहळ्यात सहभागी होण कठीणच असायचं.
पण अलीकडे परिस्थिती बदलली.माहिती आणि तंत्रज्ञान प्रधान युगात सोशल मीडियाने कमाल केली आणि साहित्य संमेलनाची माहिती बेंगळूरु काय…अमेरिका काय… दुबई, जपान काय…जगात कोठेही बसल्या जागेवर मिळायला लागली.सारे तपशील हाती यायला लागले आणि अनेक साहित्यप्रेमींना संमेलनाचा मार्ग खुला करून देऊ लागले.
दरवर्षी संमेलनाबद्दल कळले की आपण एकदा जायलाच हवं अस वाटायचं.शेवटी या वर्षीच्या सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला आणि कितीतरी वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात आले. २०२६ सालचा पहिला दिवस आणि पुढील तीन दिवस साहित्य संमेलनाचे होते.पहिल्याच दिवशी मी आणि माझी साहित्यप्रेमी मैत्रीण साताऱ्यात हजर झालो.पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी आणि चित्ररथ निघणार होते.फक्त दुपारीच कार्यक्रम होता त्या दिवशी.उद्घाटन दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे २ जानेवारी रोजी होणार होते.असे असले तरी आम्ही शाहू स्टेडियम या संमेलनाच्या ठिकाणी पोचलो तेव्हा स्टेडियमचा परिसर माणसांनी फुलून गेला होता.सगळी मराठीप्रेमी माणसं. मातृभाषेबद्दल असलेल्या जिव्हाळ्याने दूरदूरच्या ठिकाणांहून आलेली. काही परदेशातून सुद्धा आलेली होती असे ऐकले.
आम्ही आमची रहायची व्यवस्था होती त्या हॉटेलमध्ये पोचलो तेव्हा आम्हाला तिथेच हैदराबाद आणि ठाणे येथून आलेल्या बायकांचे दोन ग्रुप्स भेटले.त्या सगळ्या बायका पण संमेलनस्थळी मंगलकार्याला जात आहोत अशा भावनेने आणि अतीव उत्साहाने मराठमोळे भरजरी पेहराव करून आणि दागिने घालून नटून थटून आल्या होत्या.मातृभाषेचा गौरव करायला आलेल्या,तिच्या गौरवोत्सवात सहभागी होऊ पाहणाऱ्या सर्वांची तिथे एकच लगबग चालू होती.
साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी,कोणाही साहित्यप्रेमी रसिकाला आवडेल अशा रीतीने संमेलनाचा परिसर सजवला होता.तिथे आजूबाजूला पाहताना *मराठीचीये नगरी* मधे साहित्यशारदेच्या मंदिरात आल्याचा भास होत होता इतकी पोषक वातावरणनिर्मिती झाली होती.सरस्वतीशी ,पुस्तकांशी नातं सांगणाऱ्या सुंदर रांगोळ्या,पताका, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र आणि विस्तीर्ण मंडप,तिथे कार्यक्रम करणारा कोणीही स्वतःला भाग्यवान समजेल अशी सगळी सुंदर रचना.
संमेलनातील मुख्य मंडप खूपच विशाल म्हणजे एका वेळी बारा ते चौदा हजार प्रेक्षक बसू शकतील एवढ्या क्षमतेचा होता.बाकीचे मंडप सुद्धा काही शेकड्यात माणसे बसू शकतील एव्हढे होतेच.परिसरात ठिकठिकाणी मराठीतील दिग्गज कवींच्या आशयघन कविता आणि थोर तत्वज्ञानी साहित्यिकानी लिहिलेला विचारप्रधान मजकूर झळकवणारे फलक स्टँडच्या आधारे ठेवण्यात आले होते.ते वाचत पुढे जाताना, आपण इथे आलो आहोत ते खूप काही घेऊन जाणार आहोत याची खात्री पटत होती.
परिसरात चालता चालता मधे एक विस्तीर्ण पटांगण लागलं त्यात एका बाजूला स्वागतकक्ष होता आणि त्याच्या काटकोनात दुसऱ्या बाजूला पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते.नंतर कळलं एकूण दोनशे चौपन्न स्टॉल्स होते. जुन्या,नव्या सर्व मराठी लेखकांची पुस्तकं तिथे पुस्तक प्रेमींना साद घालत होती. भरपूर पुस्तकं आणि भरपूर ग्राहक!पुस्तकांची खरेदी विक्री जोरात होती कोणी लेखक भेटले तर त्यांच्या बरोबर फोटो काढले जात होते.तिथल्या कोणत्याही हालचालीला मातृभाषेच तेज आलेलं आहे हे जाणवत होतं.
साहित्य संमेलनाचं उद्घाटन दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता होणार होतं.त्या कार्यक्रमाला मोठा मंडप गच्च भरलेला होता.भरपूर रुंद व्यासपीठावर सुद्धा अनेक मान्यवर बसले होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय नामदार देवेंद्र फडणवीस जातीनिशी हजर होते.त्यांना सुद्धा प्रत्यक्ष पाहायचा योग या संमेलनाच्या निमित्ताने आला.
संमेलनाचे उद्घाटन डॉ.मृदुला गर्ग या हिंदी भाषिक आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या लेखिकेच्या हस्ते होणार होते प्रमुख पाहुण्या म्हणून त्या व्यासपीठावर होत्याच. त्याशिवाय मागील वर्षीच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष श्री शिवेंद्रसिंग राजे भोसले, कार्याध्यक्ष श्री.विनोद कुलकर्णी,संमेलनाचे या वर्षीचे अध्यक्ष पानिपत कार श्री.विश्वास पाटील आणि पुणे येथील साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री.मिलिंद जोशी ही सर्व मंडळी व्यासपीठावर होती.सर्वांची भाषणे उत्तम आणि अभ्यासपूर्ण झाली.सर्व भाषणातून आपली मायबोली अधिक वैभवशाली आणि सामर्थ्यवान कशी करता येईल याचा विचार प्रामुख्याने मांडला गेला. महामंडळाच्या कार्याला पूर्ण स्वातंत्र्य मंजूर करत शासन त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीसांनी केले.
सातारकर यजमानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत त्यांना कंदी पेढ्यांचे हार घालून केले आणि सातारी अगत्यातला गोडवा दाखवून दिला.एकूण अतिशय सुसंस्कृत वातावरणात तरीही धूमधडाक्यात उद्घाटन सोहळा पार पडला.
त्यानंतरचे दोन दिवस शाहू स्टेडियम मधल्या विविध मंडपात कार्यक्रमांची बहार होती.कवी कट्टा,गझलकट्टा,पुस्तक चर्चा, प्रकाशन कट्टा,मान्यवरांच्या मुलाखती,कथाकथन, बाल आणि कुमार साहित्याच्या मंडपात तर अती उत्साहाने कार्यक्रम सुरू होते.
मुख्य मंडपात रात्री रंजक कार्यक्रम असायचे.एक दिवस भारुड,एक दिवस प्रशांत दामले यांचं शिकायला गेलो एक ‘ हे नाटक, एकदा महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि शेवटच्या दिवशी फोक आख्यान हा मराठी लोक संगीतावर आधारित कार्यक्रम होता.सर्व कार्यक्रम तुफान गर्दीत अत्यंत यशस्वी झाले हे वेगळे सांगायला नकोच.
खरं सांगायचं तर संमेलनात दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी होती.पण श्रीखंड जास्त खाल्ले तर पुरणपोळी खाऊ शकणार नाही अशी परिस्थिती झाली होती कारण सगळे कार्यक्रम कितीही ओढ लावणारे असले तरी एकावेळी एकाच मंडपात हजर राहता येत होते.मग बरेच कार्यक्रम मी संमेलनाहून परतल्यावर यू ट्यूब वर पाहिले.आणि ते जास्त चांगले आणि पूर्ण कळले.साताऱ्यात साहित्य महामंडळाने रहायची आणि जेवणखाणाची व्यवस्था चांगली केली होती.
भाषेच्या उत्सवाला आलेल्यांसाठी प्रत्येक जेवणात पक्वान्नाचा थाट होता.जेवणाच्या टेबलावर वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांबरोबर परिचय झाला. पनवेल,बीड,परभणी,जळगाव,रत्नागिरी,बेंगळूरु,दिल्ली,मुंबई,इंदौर,भोपाळ अशा विविध ठिकाणाहून आलेले लोक भेटले.या भेटी अर्थातच काही क्षणांची सांगत अशा स्वरूपाच्या असतात तरी सुद्धा तिथे असलेल्या सर्वांची भाषा मराठीच असते ही गोष्ट आनंददायक असते.तो आनंद या संमेलनात सतत मिळत होता.
चार जानेवारीला संमेलनाचा समारोप समारंभ होता.त्या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी ,मराठी भाषा मंत्री उदय सामंतजी उपस्थित होते.या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रघुवीर चौधरी हे हिंदी आणि गुजराती भाषेतील दिग्गज लेखक व्यासपीठावर होते.संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संमेलनाचा आढावा घेताना सांगितले की सुमारे आठ लाख लोकांनी या साहित्य संमेलनाला भेट दिली. महाराष्ट्र सरकारने तीन कोटी रुपयांचा निधी या संमेलनासाठी उपलब्ध करून दिला.महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेचीच सक्ती होईल असा विश्वास माननीय मुख्यमंत्री यांनी दिला. संमेलनाध्यक्ष श्री विश्वास पाटील यांनी महाराष्ट्रात मराठी साहित्य विकणारी दुकाने खूप कमी झाली आहेत हा मुद्दा उपस्थित केला होता ती वाढवण्यासाठी शासन काय करणार आहे त्या योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितल्या.
एकूण माय मराठीची शान आता वाढणार आहे आणि तिची प्रगतीपथावर जाणारी वाटचाल आता अधिक सामर्थ्यवान होणार असा दिलासा या संमेलनातून सर्वांना मिळाला असावा असे म्हणायला हरकत नाही. माय मराठीचा हा उत्सव तिचा गौरव वाढवणारा होता आणि भाषेचे जिवलग असणाऱ्या सर्वांना नवा उत्साह देणारा होता हे नक्की.
शर्मिला पटवर्धन
