सभासदांची लेखणी

समानतेपेक्षा समतोल हवा    

       मार्च महिना आला की वेगवेगळ्या सणांची आणि विशेष दिवसांची आठवण येऊ लागते. होळी,गुढीपाडवा,रामनवमी असे उन्हाळ्यातही आल्हाद देणारे सण बरेचदा या महिन्यात येतात. त्याच बरोबर 8 मार्च रोजी साजरा होणारा जागतिक महिला दिन, 20 मार्चला साजरा होणारा आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आणि या महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारी आर्थिक वर्ष समाप्ती हे विशिष्ट दिवस तर ठरलेलेच.

       मार्च महिना पुढे जाता जाता आठव्या दिवशीच महिलांची विशेष दखल घेतो त्यामुळे देखील हा महिना मनाला विशेष भावतो.

फार पूर्वी एक काळ असा होता की स्त्रीचा फक्त वापर होत असे. तिला एक घरकाम करणारे भावना आणि बुद्धीविरहित यंत्र आणि भोगवस्तू समजले जायचे. अर्थात असे समजले गेले म्हणून काही स्त्रियांच्या बौद्धिक क्षमतेत, निरीक्षणात,जीवन कौशल्यात न्यूनत्व आले नाही. पण जसजशी ती शिक्षणासाठी आणि अर्थार्जनासाठी बाहेर पडली,चाकोरीबाहेरचे नवीन अनुभव घेऊ लागली तसतशी तिच्या विचारांची कक्षा रुंदावत गेली.ती अधिक विकसित आणि प्रगल्भ होत गेली हे नक्की.

पण त्या पूर्वी सुद्धा आपल्या बरोबर नेमके काय घडत आहे हे जाणण्याची क्षमता स्त्रियांमध्ये होती.

1909 साली स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमेरिका या देशातील न्यूयॉर्क शहरात साजरा केलेला महिला दिन  हा          जगातला सर्वात पहिला महिला दिन समजला जातो. ती तारीख 28 फेब्रुवारी 1909 अशी होती. त्या नंतर पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये महिला दिन साजरा झाला. त्या काळी अमेरिका आणि युरोपमध्ये स्त्रियांना मतदानाचा सुद्धा हक्क नव्हता. पहिला लढा त्याकरता द्यावा लागला. पुढे ही स्त्रियांची चळवळ अधिक व्यापक रूप घेऊन सर्व खंडांमध्ये पसरत गेली.

आपल्या भारत देशात पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. पुढे 1975 हे वर्ष UNO ने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे आवाहन केले आणि हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा होऊ लागला.

काळाच्या ओघात केवळ हा दिवस साजरा केल्यामुळे नव्हे तर इतरही अनेक स्तरावर आत्मभान आल्यामुळे स्त्रियांनी विविध क्षेत्रातल्या प्रगतीपथावरून यशाची शिखरे गाठली. असे कोणतेही क्षेत्र उरले नाही की जिथे स्त्रीने  मोठं यश मिळवून दाखवलं नाही.

       अंतराळापासून पाताळापर्यंत आणि देशाची पंतप्रधान होण्यापासून ते स्मशानात काम करण्यापर्यंत कोणतेच क्षेत्र स्त्रीने स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्या शिवाय सोडले नाही.

आपला भारत देश वेदकाळापासून स्त्रीशक्तीला मानवंदना देणारा आहे. मुळात या विश्वाची निर्मिती युगुल तत्वानुसार म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांकडून झालेली आहे .कोणी याला पुरुष आणि प्रकृती म्हणतं,कोणी याला ब्रम्ह आणि माया म्हणतं तर कोणी आदिदेव आणि आदिशक्ती म्हणतं. या सर्व नावावरून एकच निष्कर्ष काढता येतो की,हे जग ब्रम्हरूपी पुरुष आणि शक्तिरुपी स्त्री यांच्यापासून बनलेले आहे. म्हणजेच भारतीय तत्वज्ञानानुसार तरी स्त्रीची भूमिका विश्वनिर्मिती पासूनच पुरुषाच्या बरोबरीने आहे.

स्त्री आणि पुरुष या दोन्ही शक्ती किंवा या दोघांमधील क्षमता एकमेकांच्या सान्निध्यात योग्य रीतीने काम करतात तेव्हा तिथे संघर्ष नसतो. या दोघांपैकी एक जण जेव्हा जास्त सामर्थ्यवान सिद्ध व्हायला लागतं तेव्हा विसंगती दिसायला लागते. हीच विसंगती मग परस्पर संबंधाचा ताबा घेऊन  जगणे दुःखाचे करू शकते.

आजच्या नव्या युगात स्त्री घरातील पुरुषांच्या बरोबरीने पैसे मिळवते कधी कधी तिचे उत्पन्न आणि बाहेर तिला मिळणारा मानमरातब घरातील सर्वांपेक्षा जास्त असतो. स्वातंत्र्याच्या कल्पना सुद्धा ती पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या जीवनात लागू करते. घरात सुद्धा एकमेकांची सोय पाहून राहण्यापेक्षा माझे,मला यालाच जास्त प्राधान्य असते.आजचा समाज बघून दया,ममता,वात्सल्य, प्रेम या गोष्टींना काही स्थानच उरलेले नाही का ? असे वाटते.

       आज दुर्दैवाने काही उदाहरणांत आई मुलांना मारून टाकताना दिसते. कधी कधी मुलं जवळच्या नात्यात कोणालाही मारतात किंवा वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. हे सारं पाहून वाटू लागत की स्त्रिया आता पुरुषासारख्या वागायला लागल्या आहेत त्यामुळे त्यांच्याजवळ मुलांना देता येईल अशी माया ममता उरलीच नाही का ?

याला असणारा आणखी एक पैलू म्हणजे मूल जन्मल्यावर आणि त्या आधी आईच्या गर्भात असताना सुद्धा मुलाची पहिली गुरु आईच असते मग आई मुलांना कधी आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांचा कधी सन्मान करायला का शिकवत नाही? शाळेत सुद्धा मुलींना स्त्री म्हणून त्यांची भूमिका आयुष्यात कशी वेगळी आहे हे शिकवले जात नाही. त्याचप्रमाणे मुलांना देखील  पुरुष म्हणून काय वेगळी भूमिका त्यांना जीवनात करायची आहे याबद्दल काही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. आजच्या काळात या शिक्षणाची विशेष गरज आहे असे वाटते.

कितीही पैसे मिळाले तरी शिस्तीचं महत्व मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्याही मनावर ठसवलं पाहिजे. बेफिकीर स्वातंत्र्य किंवा स्वैराचार जगण्याला घातक ठरतो आणि क्षणिक सुख संपले की उरलेला काळ दुःखात काढावा लागतो.

       आजचं जीवन अर्थशास्त्राला सर्वात जास्त प्राधान्य देणारं आहे. सगळी दुनिया पैशाभोवती फिरते आहे. त्याला कोणीही स्त्री पुरुष अपवाद असणार नाहीत हे खरेच असले तरी, जिला मुलीच्या जन्माने आनंद व्हायला हवा ती भ्रूणहत्येत पुढाकार घेते,मूल बाळ नकोच हा निर्णय पतिपत्नी दोघे मिळून घेतात.

आजची परिस्थिती बघून अस वाटतं की स्त्री पुरुष दोघांनीही कितीही समान पातळीवरून जीवनाचा सामना करायचा ठरवला तरी निसर्गतः मनोभूमिकेमधला,समाजमान्यतेमधला, स्त्री ने अधिक आकर्षक पण कमी शक्तिशाली असण्याचा जो भेद निसर्गानेच करून ठेवला आहे तो कोण कसा मिटवणार?

       जगात सतत नवीन सुख सुविधांचा शोध लागत आहे. असं असलं तरी माणसांमधला संवाद मिटत चालला आहे. मतभेद,मनभेद,दोन व्यक्तींची ताटातूट,नाती दुरावणे,आई वडिलांचा संसार मोडल्याने किंवा आईवडिलांबरोबर राहत असताना मुलानी भावनिक दृष्ट्या उघड्यावर पडणे,आर्थिक सुस्थिती असूनही निराधार होणारे वृद्ध  हे सर्व पाहिले की वाटतं आता स्त्री पुरुष समानते पेक्षा साध्य करायला हवा आहे तो स्त्री पुरुषाच्या नात्यातला समतोल ! किंवा स्त्री पुरुष भूमिकांमधला समतोल या साठी कोण्या एकानेच नाही तर स्त्रीने आणि पुरुषाने सुद्धा कटिबद्ध राहिले पाहिजे असा विचार या महिला दिनाच्या निमित्ताने करता येईल.

 — शर्मिला पटवर्धन फाटक, बेंगळूरु —-

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *