–अंजली संगवई —
जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रवास म्हंटले की सहप्रवासी आलेच, तसे तर प्रवासात खूप लोक भेटतात, त्यातले काही पाण्याच्या क्षणीक बुडबुड्या सारखे तर काही अथांग जलाशया सारखे जे कायम स्वरुपी स्मरणात राहतात. बरेचदा एखादे सामान्य व्यक्तिमत्त्व पण विशेष अनुभव देऊन जाते.
त्यांच्याशी एक वेगळी नाळ जोडली जाते मनाची, कायमस्वरूपी…..
सायंकाळी बंगलोरच्या ट्रॅफिक सागरा मधून वाट काढत ऑटो एकदाचा रेल्वे स्टेशन वर पोहचला. नेहमी प्रमाणे स्टेशनवर प्रचंड ओसंडून वाहणारी तोबा गर्दी…
एका हाताने ट्रॉलीबॅग ओढत दुसरी बॅग खांदयावर घेऊन, माझी स्वारी बोगी शोधत पुढे पुढे सरकते. आपल्या जागेवर बसेपर्यंत आपण वेळेत पोहचलो याची पूर्ण खात्री नसते. ट्रेन आधीच प्लॅटफॉर्म वर उभी होती. गर्दीत वाट काढत हातातील ट्रॉलीबॅग जागेनुसार तिरपी सरळ करीत बोगी पर्यंतचे अंतर एकदाचे संपत आणि अगदी तीन चतुरथाऊंश लढाई जिंकल्या सारखे वाटते. बघता क्षणी चेहऱ्यावर शोधून सापडल्याचा आनंदीभाव लपवीता येत नाही.
जागेवर बसल्यावरही सारी लढाई संपलेली नसते, आपल्या सामानाला देखील व्यवस्थीत जागा मिळायला हवी, ही दुसरी धडपड. धडपड हा देखील प्रवासाचा अविभाज्य घटक आहे. एक सीट आरक्षीत केली असते त्यामुळे जणू काही वेळ ती जागा आपलीच असते. जर आपल्याला खिडकी जवळची सीट मिळाली असेल तर प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. तसे बघायला गेले तर कुणीही पूर्ण वेळ खिडकीतून बाहेर बघत नाही आणि शुध्द हवेसाठी म्हणाल तर एसी डब्यात ती उघडतही नाही पण तरीही खिडकी जवळची सीट नेहमीच सगळयांना हवी असते.
ठरलेल्या वेळेत गाडी एकदाची निघाली आणि प्रवासाला सुरूवात झाली.
एकटीने प्रवास करायचा असेल तर तो विशेष आनंदाचा असतो. मनसोक्त लोळून वाचन करायला मिळणार, कुणी उठवणार नाही, कुणी काही मागणार नाही, कुणी आवाज देणार नाही म्हणजेच कुणी व्यत्यय आणणार नाही ही कल्पनाच फार सुखदायक असते. समस्त स्त्री वर्गाला असेच वाटत असावे, असे मला वाटते. पुस्तक वाचावे असा विचार असतो पण यावेळी हा प्रवास एक वेगळे वाचन घडविणार होते. पुस्तकांतून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून वाचायला मिळणार होते.
समोरच्या सीट वर साधारण पन्नासी पार वयोगटातील एक ताई बसल्या होत्या . आजूबाजूला होणाऱ्या सर्व हालचाली त्या सूक्ष्मपणे न्याहाळीत होत्या. त्यांची नजर अनुभवी जाणवत होती. मग नेहमी होते तशी एक साधी औपचारिक ओळख झाली. ट्रेनच्या वाढत्या गतीप्रमाने हळूहळू आमच्या दोघींमधील संवाद चांगलें बाळसे धरू लागले होते.
खूप बोलक्या आणि मोकळ्या स्वभावाच्या राधा ताईंशी माझे तार जुळायला वेळ लागला नाही. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा जिंदादील स्वभाव आहे हे लगेच लक्षात आले. नवीन गोष्टी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वैगरे त्यांना अवगत होते. त्यांच्या सहज कृतीतून ते दिसत होते. गप्पा करता करता जेवणाची वेळ झाली. प्रवास राजधानीचा असल्यामुळे जेवण ट्रेन मधेच मिळाले. जेवन आल्यावर त्यांनी बॅग मधून काहीतरी काढले, मला वाटले काही खाण्यासाठी आणले असेल, पण त्यांनी चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्बचे पॅकेट्स काढले.
त्या देखील भरपुर प्रवास करणाऱ्या पैकी होत्या. त्यामूळे जाणून होत्या रेल्वेतील जेवण आवडण्या सारखे नसतच.
“हल्लीं पिझा पास्ता ऑर्डर केले की या पुड्या बऱ्याच येतात ग मग मी जास्तीच्या प्रवासा साठी राखून ठेवते”. असे त्यांनी सांगीतले. मला त्यांची कल्पना खूप आवडली आणि काही वाया न जाऊ देता योग्य ठिकाणीं कसे उपयोगी आणायचे हा गुण कळला.
त्या दिवशी आम्ही दोघींनीही जेवणात चायनीज नुडल्स ऑर्डर केल्या होत्या. खरे सांगते त्या सपक नूडल्सला या छोटया पुड्यांनी खुप चविष्ट बनवलं. आमचे जेवण झाले आणि गप्पांचा पुन्हा एक राऊंड सुरू झाला.
बोलतांना त्यांचे खंबीर आणि सशक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसत होते. त्यांची विनोद बुध्दी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याचे वेळोवेळी दर्शन होत होते.
खूप वेळ हसून मोकळ्या बोलणाऱ्या राधा ताईं जेव्हा स्वतः बद्दल बोलायला लागल्या तेव्हा त्या मनमोकळ्या हसऱ्या चेहऱ्या मागे खूप मोठे दुःख लपले होते, ते बोलण्याच्या ओघात समजत गेले. सांगताना डोळ्यांतील आसवांना वाट करून देत त्यांनी आपले मन देखील मोकळे करत होत्या. एका पाठोपाठ एक असे जवळचे लोक त्यांना सोडून गेले होते. यात त्यांची लहान लेक जीवनाचा जोडीदार आणि लहानशी नात यांचा समावेश होता. मला देखील ऐकून धक्काच बसला.
बर ओळख इतकी नवीन होती की त्यामुळे असे रडायला लागल्या नंतर काय करावे या विचारानं गोंधळायला झाल मला. त्यांचे वरवर सांत्वन करीत होते पण ते खूप तोटके आहे हे कळत होते मला. काही वेळानी त्यांनीच स्वतःला सावरले. प्रथम माफी मागितली, मग म्हणाल्या “अचानक भावना प्रधान झाले ग”.
“अग घरी लेकीचे दुःख पण काही कमी नाही. तिच्या समोर विषय देखील काढता येतं नाही. पण मलाही कुठेतरी बोलावे असे वाटते, का कोण जाणे पण तुझ्याशी बोलतांना भावना आपोआप मोकळ्या झाल्या”
मी कुठेतरी वाचले होते कधीं कधीं अनोळखी व्यक्तींन समोर सहज मन मोकळे करता येते.
आम्ही रात्री बराच वेळ बोलत होतो. परत विषयानंतर झाले आणि अनेक गोष्टी उलगडल्या. “आता झोपुया” असे म्हणत गप्पांना जरा विराम दिला.
झोपतांना एक विचार मनात आला, मनातील दुःख मोकळे करायला कुणीतरी हवेच असते. मग ते आपले जवळचे असो किंवा अनोळखी असो. मोकळे होणे किती गरजेचे आहे ते त्यांची परिस्थिती बघून जाणवले. आताच्या काळात जिथे आपसातील संवादच हरवत चालला आहे तिथे बाकीचे काय. या साऱ्या विचारांचे काहूर मनात चालू होते.
झोपलेल्या साधना ताईंकडे बघीतले तेवहा जाणवले की मनातील दुःख बोलुन दाखविल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता.
दुःख सांगून संपत नाही किंवा कमी देखील होत नाही, पण ते कुणाल तरी सागितले, त्यानी ऐकले तर थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला एक भावनीक सोबत मिळते. या जाणीवेने खूप हलके वाटत. साधना ताईकडे बघून तसे प्रकर्षाने जाणवत होते.
सकाळ झाली गाडी हैदराबाद स्टेशन वर आली. नवीन प्रवासी डब्यात दाखल झाले .आताचे आमचे सह प्रवासी हे सैन्यातील होते. मला भारतीय सैनिकांचा खूप आदर वाटतो अर्थात तो सगळ्यांनाच वाटतो. त्यांचा गणवेश, त्यांची चालण्याची पद्धत हे नेहमीच प्रभावी वाटत. त्यांचे सामान प्रचंड होते. आता माझ्या दोन बॅग त्यांच्या मोठ्या सुटकेस आणि ट्रंक समोर कुठेतरी कोपऱ्यात लपून बसल्या.
‘कमी सामान आनंदी प्रवास’ या तत्वाला इथे अपवाद आहे.
आम्ही सर्व त्यांचे सामान जागेवर लावण्याची शिस्तबद्ध पद्धत बघत होतो.
आता आमच्या दोघींचा ग्रूप मध्ये एका आर्मी मधील व्यक्तीची भर पडली. मग आमच्या सगळ्याच सामाजिक आर्थिक आणि राजकीय विषयांच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी बदल्या होतात त्यामुळे त्यांच्या कडून वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. त्यांचाही एक वेगळे अनुभव कथन आहे पण तो परत कधीतरी.
मी आणि त्या ताई आणि तो सैनिक बऱ्याच विषयांवर बोललो. ताई मधेच विनोदी मधेच गंभीर मधेच कर्तव्य दक्ष असलेल्या त्यांच्या बोलण्यातून चित्रित होत होत्या.
आदल्या रात्री रडणाऱ्या ताई आज अगदी वेगळया वाटत होत्या.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे दुःख कीतीही असेल तरी सामान्य राहून ते पेलता आले पाहिजे. तसेच वाटलेच कधी तर योग्य ठिकाणी ते व्यक्त करता आले पाहिजे. जीवनरुपी प्रवासाचा हा एक महत्वाचा भाग आहे.
आमच्या दोघी मध्ये फोन नंबरची देवाणघेवाण झाली. भेट घेण्याचा प्रयत्न करूच पण नाही झाली तर फोन वर संपर्क मात्र नक्की ठेवू.
त्यांच्या वीस बावीस तासांच्या सोबतीत मी त्यांच्या स्वभावाचे अनेक पहेलू बघीतले, काही गोष्टी शिकले. तसे बघायला गेले तर खूप सामान्य अनुभव आहे, बरेच जणांना येत असतो. पण एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सोबत घालवलेला हा वेळ मला बरेच काही सांगून गेला, शिकवून गेला. असे कधी झाले नाही की प्रवासात मी पुस्तक वाचले नाही. या वेळीही वाचले पण यावेळी स्वभाव वर्णन आणि अनुभव कथन जरा वेगळ्या अनुषंगाने.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हक्काची एक मैत्रीण भेटली जिच्या जवळ कधी वाटले तर मन मोकळं करू शकतील. कधी कधी आपल्या अवती-भवती खूप गोतावळा असतो पण मनातील दुःख व्यक्त करायला कधी कधी अनोळखी व्यक्ती जवळची वाटते आणि तसे होतेही. दोघींनी अनोखीमैत्री या नावाने फोन नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवले.
प्रवासात भेटलेल्या सहप्रवासांच्या यादीत एक नवे नाव अनोखीमैत्री. या मैत्रीने नंतर बरेच आनंदाचे क्षण देखील मनमोकळ्या पणाने एकमेकींकडे व्यक्त केले. बराच प्रवास केला, बरेच वेळा प्रवासात अनेक वेगवेगळे सहप्रवासी भेटले पण राधा ताई कायम स्वरुपी स्मरणात राहिल्या आहेत. त्यांच्या सहज पण वेगळया स्वभावाने. त्यानंतर अजून पर्यंत प्रत्यक्षात भेटलो नाही, पण संपर्कात मात्र आहोत.
असे काही अनोळखी आपल्या स्मरणात कायम राहतात…..
आते जाते खूबसुरत
एक अच्छेसे सफर में….
कभी कभी इत्तफाक से
कितने अंजान लोग मिल जाते है,
उंन मे से, कुछ लोग भुल जाते है
कुछ याद रह जाते है…
कुछ याद रह जाते है