मराठी साहित्यातील ध्रुवतारा- कुसुमाग्रज
आठदहा वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकचं कुसुमाग्रजांचं निवासस्थान बघायला आम्ही गेलो होतो. अंगणात उभे होतो. बाहेरच्या भिंतीवरचा कुसुमाग्रजांचा मोठा फोटो बघून माझ्या आठ वर्षांच्या मुलाने मला विचारलं, “ते कोण आहेत?” मी त्याला सांगितलं की ते खूप मोठे कवी होते आणि त्यांच्या कविता मला खूप आवडतात. चटकन आठवलेली ’कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता मी त्याला म्हणून दाखवली. त्याला ती कितपत समजत होती ते मला कळत नव्हतं, पण कविता म्हणता म्हणता मला अचानक जाणीव झाली की आपण साक्षात
कुसुमाग्रजांच्या अंगणात उभं राहून त्यांची कविता म्हणतोय. ते या जागी कित्येक वेळा उभे राहिले असतील आणि कुणी सांगावं, एखाद्या क्षणी त्यांनीही आपल्या या कवितेच्या ओळी मनातल्या मनात आठवल्या असतील. या जाणिवेसरशी अंगावर सर्रकन काटा आला आणि तो मौल्यवान क्षण नकळत माझ्या मर्मबंधात साठवला गेला.
कुसुमाग्रजांच्या संपूर्ण साहित्याचा आढावा घेण्याची माझी क्षमता नाही आणि त्यामुळे तसा प्रयत्नही मी करणार नाही. पण कुसुमाग्रजांच्या कवितांनी आणि वि. वा. शिरवाडकरांच्या कथांनी जो आनंद, भव्यत्वाची जी प्रचीती दिली आहे, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ही भावना इतरांबरोबर वाटून घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे. (’नटसम्राट’ वगळता त्यांच्या नाटकांशी मात्र माझा फारसा परिचय झाला नाही याची खंत वाटते.)
प्राथमिक शाळेत भेटलेली ’गवताचं पातं वार्यावर डोलतं’ ही कविता आणि त्याच सुमारास ओळखीचं झालेलं ’शिवकल्याण राजा’मधलं ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणं, ही ’कुसुमाग्रज’ या कवीशी पडलेली पहिली गाठ. पुढे कुसुमाग्रज पाठ्यपुस्तकातल्या ’कणा’सारख्या कवितांमधून भेटत राहिलेच, पण १९९७ साली स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव देशभरात उत्साहाने साजरा होत असताना आली कुसुमाग्रजांची ’स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ ही ताजी कविता. ज्या हातांनी त्यांनी १९३९ साली क्रांतिकारकांच्या मनातला आशावाद ’कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल। रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल।’ अशा तेजस्वी शब्दांमधून व्यक्त केला होता, त्याच हातांनी ते १९९७ मध्ये ’वेतन खाउनी काम टाळणे हा देशाचा द्रोह असे। करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।’ असा ’फटका’ लिहीत होते.
तरल, नाजूक भाव व्यक्त करणारी कविता असो, रौद्र, वीररसप्रधान कविता असो किंवा सामाजिक वास्तव परखडपणे मांडणारी कविता, कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने सर्वत्र सहज संचार केला. ’अहिनकुल’ कवितेत सळसळत्या नागाचं वर्णन करताना ’अग्नीचा ओघळ’, ’यमाने टाकलेली कनकाची कट्यार’, ’तांडव करणार्या कालीच्या हातातील निखळून पडलेलं कंकण’ अशा एकाहून एक सरस प्रतिमा त्यांनी वापरल्या आहेत, तर ’स्वप्नाची समाप्ती’ सारख्या तरल कवितेत दवाने भिजलेल्या जमिनीसाठी ’भासते भू तारकांच्या आसवांनी ओलसर’ अशी सुंदर प्रतिमा ते वापरतात. रूढार्थाने वैभवात रहात असतानाही काहीतरी गमावल्याचा अनुभव जेव्हा आपण घेतलेला असतो, माणसांच्या गराड्यात राहूनही जेव्हा एकटेपणा वाटलेला असतो, तेव्हा कुसुमाग्रजांच्या ’परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातिल मंद दिव्याची वात’ या ओळी मनाला येऊन भिडतात. प्रेमाची उत्कटता ज्यांनी आयुष्यात कधी ना कधी अनुभवली आहे, त्यांना ’प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं’ या ओळी रोमांचित केल्याशिवाय रहात नाहीत! ’प्रेमयोग’ या अजून एका सुंदर कवितेत ते शेवटी लिहितात, ’प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा, एकमेव’. आशयाचं मूळचं सौंदर्य आणि त्याला लाभलेलं हे डौलदार भाषेचं कोंदण असताना त्यांच्या कित्येक ओळींना सुभाषितांचं मोल लाभलं आहे, यात नवल ते काय? ’अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा’, ’अमर्याद मित्रा तुझी थोरवी’, ’ए कच तारा समोर आणिक पायतळीं अंगार’ अशा त्यांच्या कितीतरी ओळी मराठी वाङ्मयात अजरामर झाल्या आहेत.
कुसुमाग्रजांच्या ’तृणाचे पाते’, ’थेंब’ यासारख्या काही कविता अमूर्ततेला स्पर्श करतात, तर ’पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या काही कविता जगात सहज दिसणार्या, आपण गृहीत धरलेल्या घटनांचा सुंदर, कल्पक अर्थ अनपेक्षितपणे दाखवतात.
मात्र कुसुमाग्रजांची कविता केवळ उदात्त, भव्य किंवा उत्कट, तरल भावना व्यक्त करण्यापुरती सीमित कधीच नव्हती. समाजातलं कुरूप वास्तवही ते त्याच असोशीने आणि प्रभावीपणे कवितेतून मांडत होते. ’म्हातारा म्हणतोय’ या कवितेत एका दंगलग्रस्त भागातला म्हातारा बाप उद्वेगाने शासनाकडून आलेल्या मदतीची ’भीक’ म्हणून संभावना करतो. या भिकेला पात्र होण्यासाठी निष्पापांचे जीव, घरदार, अब्रू गमावली गेली आहे. ’राजा आला’ या कवितेतली एक खेडूत बाई तिच्या गावाला देशाच्या पंतप्रधानांनी भेट दिल्याचं वर्णन करते. वर्णनाच्या शेवटी म्हणते, ’राजासाठी घरोघरी आज पीठमीठ येई. आठ दीस रजा होती, आता पेटा चूलबाई’. बाबा आमटे यांच्यावर कुसुमाग्रजांनी ’संत’ अशी एक कविता लिहिली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर ही कविता एका संतावर आहे आणि संतत्वावरही आहे. या कवितेत ते लिहितात, ’अरे आम्ही आहोत असे करंटे, की आमच्या गल्लीत लागतात पताका, केवळ मंत्री आले तर’. सामाजिक वास्तवाचं हे भान कधीच न सोडता, तरीही निराशावादी न बनता ते जीवनातलं श्रेयस आणि प्रेयसही आपल्या लेखनातून मांडत राहिले.
कुसुमाग्रजांच्या कवितांइतक्याच सुंदर, विविध आणि तशाच ताकदीच्या वि. वा. शिरवाडकरांच्या कथा आहेत. ’अंतराळ’ ही कथा स्थलांतर करणार्या पक्ष्यांच्या मोठ्या थव्याबद्दल आहे. लांब पल्ल्याचं स्थलांतर करताना वाटेत एक मोठं संकट आल्यावर एका पिल्लाचं संपूर्ण थव्याच्या नायकात कसं रूपांतर होतं, याचं रोमहर्षक वर्णन या कथेत आहे. तर ’रस’ या कथेचं कथानक तसं अगदी साधं. पुतण्याच्या आधाराने राहणारी, त्याच्या घरातलं काम करून आला दिवस पुढे ढकलणारी एक वृद्ध विधवा स्त्री. नीरस असं तिचं आयुष्य. काही इच्छा-आकांक्षा न उरलेलं. पण एकदा उसाच्या रसाचं गुर्हाळ दिसतं आणि तिला रस प्यावासा वाटतो. पण तुमच्यामाझ्याइतकं तिच्यासाठी हे सोपं नाही. जवळ थोडेफार पैसे जरी असले, तरी स्वतःसाठी म्हणून अशी काही ’गरजेच्या पलीकडची’ वस्तू, केवळ मजेसाठी म्हणून विकत घेणं, याची तिला सवयच नाही. पण रसाचा मोह तर आहे. अशा परिस्थितीत तो साधा उसाच्या रसाचा एक पेला तिच्यासाठी आणि कथा वाचता वाचता आपल्यासाठीही, खूप काही होऊन जातो. ’मांडवातील जेवण’ ही अशीच अजून एक जबरदस्त कथा. डोंगराळ भागातल्या एका वाडीतले गरीब आबालवृद्ध इनामदाराच्या आमंत्रणावरून त्याच्या मुलाच्या लग्नात जेवण्यासाठी मैलोनमैल वाटचाल करून येतात. गोडाधोडाचं तर जाऊद्या, पोटभर जेवण हीच ज्यांच्यासाठी क्वचित नशिबात येणारी गोष्ट आहे, अशी ही सगळी माणसं. पण त्यांच्यातही एक ’बयना’ आहे, जी नुसतीच जेवणाची नाही, तर मानाची अपेक्षा ठेवून आली आहे. यात उभी केलेली माणसांची, त्यांच्या परिस्थितीची शब्दचित्रं न विसरण्यासारखी आहेत.
या सगळ्या गंभीर कथांपेक्षा एकदम वेगळी अशी कथा म्हणजे ’कामयाब’! कथेचा निवेदक एक पाळीव कुत्रा आहे आणि आपण एका भामट्याला कसं पकडून दिलं, याची भन्नाट आणि खुसखुशीत कथा तो सांगतो. या कथा वाचून असं वाटतं की शिरवाडकरांनी अजूनही खूप कथा लिहायला हव्या होत्या.
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचं नावही अवकाशातील एका तार्याला अधिकृतपणे देण्यात आलं आहे. अर्थात, मराठी सारस्वताच्या अवकाशात ’कुसुमाग्रज’ हा तारा त्याआधीही तळपत होताच आणि जोपर्यंत मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं आहेत, तोपर्यंत हा तारा अढळपणे प्रकाशत राहील.
—विशाखा पंढरपुरे—
