—– अजिता पणशीकर —–
“अगं, वयाची शंभरी गाठली मी, पण अजून तब्येतीचा काहीही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही मुली! पन्नाशी नाही आली की कुठे इन्फेक्शन तर कुठे ऑपेरेशन.” आजी तिच्या अर्ध शतक पार केलेल्या नातीला रागवत होती. मी अस्वस्थपणे ऐकत होते.
मी कोण? अहो, मी मराठी, तुमची मायबोली!
हल्लीच्या मुलांचं एक सोडा, पण ह्या आजीला तरी माझा शुद्ध वापर करता येत नाही? अगदी जड-जड शब्द नाहीत, पण पूर्ण मराठी तरी? तेवढ्यात ती मोठी ‘नात‘ आपल्या भेटायला आलेल्या मैत्रिणीला कौतुकाने सांगतांना ऐकलं. “मेरी दादी सॉलिड है! क्या खूब इंग्लिश बोलती है!”
माझा पारा चढायच्या आतच ती गुजराथी मैत्रीण अडखळत आजीला म्हणाली, “तुमचं घणु कौतुक छे आजी, मोठ्या उमरमध्ये केटलो इंग्लिश बोलता! अने ते पण सहज”.
का कुणास ठाऊक, पण फार गोड वाटलं तिचं मनापासून बोलणं, आणि तेही तिच्या भाषेत मला गुंफून घेणं. ह्या आनंदात मी रममाण होते….अचानक, माझ्या विचारातला विरोधाभास मला प्रकर्षाने जाणवला. मला नेमकं काय हवंय? सर्वांनी अतिशय शुद्ध भाषेत बोलावं, की थोडी अशी सरमिसळ चालेल जी दुसऱ्याच्या थेट मनापर्यंत आपल्याला घेऊन जाते? फारच गोंधळ उडाला माझ्या मनाचा! दोन्ही बाजू अगदी पटत होत्या, पण तरी अंती कुठेतरी प्रश्न उभा करत होत्या.
हे माझं तळ्यात-मळ्यातलं विचार–द्वंद *** मांडतेच आता तुमच्यासमोर. मग तुम्हीच ठरवा, काय योग्य आहे ते!
शेपटीवाल्या प्राण्यांची गोष्ट तुम्ही ऐकली ना?
म्हणे, वापरलं नाही शेपूट तर जाईल ते गळून.
माझ्यासारख्या भाषेला शंका मग येईलच ना?
सांगा, स्वच्छ बोलू, म्हणजे भीती जाईल पळून.
मला एक वचन तुम्ही सर्वजण देणार का?
आघात झाले परभाषेचे तरी, पहाणार नाही वळून.
शब्दन्शब्द माझा उचलून तुम्ही धरणार का?
परंपरेच्या समृद्धीचे तुम्हा दर्शन घडेल जवळून.
आले देशी वा परदेशी, गोडी माझी विसराल कसे?
पिढ्यांपिढ्या जपले मला, तुम्ही सर्वांनी मिळून.
भुलवतील लोक तेव्हा, उगाच तुम्ही फसाल कसे?
एक-एक मोती वेचा माझे, हेच सांगणे कळवळून.
मात्र, शब्द माझे इतर भाषेत येतात जेव्हा कानी
गुपित सांगते, खरं बोलते, सुखावते मी मनोमनी.
शेवटच्या दोन वाक्यांने चक्र फिरू लागलं. आपण “मी, मी, मी मराठी, अशीच हवी, तशीच हवी” करत बसलो तर हे जग आपल्याला हळूहळू विसरून तरी नाही जाणार? आपण खूप संकुचित विचार करतोय का? इतर संस्कृती, इतर भाषा ह्यांच्या सहवासाने आपलंच क्षितिज रुंदावतं, आपली व्याप्ती वाढवते …. मग काय हरकत आहे? आपण काही हे स्वतःहून नाही घडवून आणलं, लोकांमुळेच ते प्रवाहाच्या ओघात घडत गेलं आणि मीही पुढे गेले…
माझीच प्रतिमा जणू मला दुसरा दृष्टिकोन दाखवत होती…
माझं सध्या ‘वजन वाढलंय‘ असं वाटतंय मला
पण सॅड नाही बरं त्याने, खूषच मी रहाणार.
परभाषांचे थर चढताहेत, पण डर नाही मला
माझ्याशी दोस्ती करतात, अभिमान तर वाटणार!
देशात-परदेशात भ्रमंती तुमची, मला घेऊन गेलात
सगळ्यांत मिसळले मी, मग इम्पॅक्ट नाही का होणार?
लग्ने जुळवळी तुमच्या मुलांनी, झुगारून देऊन जात
वैश्विक गावात रमले आता, सांगा कशी बदलणार?
‘संस्कृत‘कन्या मी जशी, इतरही आहेत अनेक
उत्क्रांतीसाठी प्रत्येकाच्या आम्ही सतत झटणार.
सामावून प्रेमाने घेतात मला ते, मी ही ठेवते विवेक
नाते जोडून, वृद्धिंगत होऊन, सुखाने मी नांदणार.
पण खोल मनाच्या कप्प्यामध्ये, वाटतो कधी खेद
शुद्ध,पवित्र होईन पुन्हा मी, असते मला उमेद.
खरंच, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हणतात ते बरोबरच आहे! माझ्यासारख्या खणखणीत नाण्याच्याही!
मनात विचार आला – साहित्यावर, काव्यावर, माझी जितकी भक्ती आहे तितकी मी इतरांना करायला लावू शकेन? ह्या नवीन पिढीच्या, परप्रांतात रहाणाऱ्यांनाही माझी गोडी लागेल ना? पण मला आनंद आहे की लोकं आपणहून एकत्र येऊन, मंडळं स्थापून, मराठी लेख-कविता लिहून, नाटकं-सिनेमे काढून, आपआपल्या परीने माझा उत्सव आणि गौरव करत आहेत.
अनेक विचार डोक्यात पिंगा घालत होते. नव्या युगात, नव्या भाषेत ती आजी इतकी सहज वावरत होती, इतकी समरसून जीवनाचा आस्वाद घेत होती. तिला जणू आयुष्याची गुरुकिल्लीच मिळाली होती! माणसे महत्वाची, संवाद महत्वाचा, आणि भाषा – त्या दोघांना जोडणारा दुवा – तो ही तितकाच महत्वाचा! मी अनादि तर आहेच, पण मी अनंत आहे आणि अनंतच रहाणार ही ह्या सर्व विचारांती खात्री पटली मला.
——————————————————————————————————————————————
विचार–द्वंद *** – मनोगत व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या काव्यपद्धतीला ‘सुनीत‘ म्हणतात. इटलीमध्ये १२०० साली उगम झालेल्या ‘सॉनेट‘ला शेक्सपिअरने नंतर जगभरात प्रसिद्ध केले. चौदा ओळींचा हा रचनाप्रकार प्रामुख्याने ४, ४, ४, २ असा असतो. पहिल्या तीन कडव्यांत सघन व अर्थपूर्ण विचार मांडले जातात व शेवटच्या दोन ओळी ह्या विचाराला कलाटणी देणाऱ्या असतात. सुनीत रचनेत यमकांचा क्रम बहुतांश ‘अ ब अ ब, क ड क ड, इ फ इ फ, ग ग’ असा असतो.
मराठी सुनीतरचनेचा पाया केशवसुतांनी (१८६६–१९०५) घातला. कवी भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, आणि बालकवी ह्या कवींनीही काही सुनीतरचना केल्या. मात्र सुनीताचा पुरस्कार आणि निर्मिती रविकिरण मंडळातील कवींनी केली, विशेषतः कवी माधव जूलियन् ह्यांनी. त्यांची १०१ सुनीते त्यांच्या ‘तुटलेले दुवे’ (१९३८) या संग्रहात एकत्रित केलेली आहेत.
१९४० नंतर सुनीतरचनेचे प्रमाण मराठी काव्यात कमी होत गेले. त्याचा इथे वापर करून पुन्हा एकदा आपल्या मायबोलीचं वैविध्य आणि सामर्थ्य आपणापुढे आणायचा माझा हा विनम्र प्रयत्न.
——————————————————————————————————————————————
- अजिता पणशीकर
९३४२१ ६४४११
