“साहित्योन्मेष स्पर्धा”
“अभिप्राय”
नमस्कार मंडळी!
स्पर्धेच्या शेवटच्या लेखात”ह्या स्पर्धेने मला काय दिले” ह्याविषयी लिहायला सांगितले होते; ते तर लिहून झालेलेच आहे; पण त्याहीपेक्षा “आता मला काय/कसे वाटते आहे, हे लिहावेसे वाटले म्हणून हा प्रयत्न.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी दीर्घकाळ सुरू असते, त्यात थोडे दडपण, थोडी उत्सुकता,थोडी भिती ह्या सगळ्याच भावना असतात, तसेच काहीसे वाटत होते,ह्या पूर्ण वर्षभरात. पण आता शेवटला लेख पाठवून झाल्यावर मात्र “रिते रिते” झाल्यासारखे वाटत आहे. ह्यात आपण ह्यातून “सुटलो” ही भावना नाहीये,तर दर महिन्याला काहीतरी “missing” ची भावना, कुठेतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटल्याची भावना येणार हे नक्की. सतत एखादी गोष्ट करत राहिलो तर त्या गोष्टीची सवय लागते आपल्याला—- अगदी तसेच—– सवय झाली होती ह्या सगळ्याची. आता जराशी हुरहूर वाटते आहे.
साहित्योन्मेष अंकाने दरवेळी नेत्र सुख दिले, वैचारिक खाद्य पुरवले, बौद्धिक आणि वैचारिक पातळी आजमावली. आता ह्या स्पर्धेपुरते तरी हे सगळं संपणार. रेवती मॅडम च्या कविता मिस करणार, स्वतःचं लिखाण पुन्हा पुन्हा स्वतःच वाचायचा जो एक आनंद असतो,तो मिस करणार. ग्रुप वरील चर्चा, शंका-कुशंका, सल्ले ती “यादी” सगळंच मिस करणार. पण असो.
जिथे सुरुवात आहे, तिथे शेवट हा असणारच.
सगळ्यांच्या भेटीचा योग लवकरच यावा ही सदिच्छा आणि आयोजक मंडळींचे पुनश्च एकदा आभार—–आम्हाला वर्षभर झेलल्याबद्दल.🙏😊
” कसे?” म्हणोनी काय पुसता?
वाटते काय, स्पर्धा संपल्यावरी?
एक अनामिक हुरहूर दाटे
ह्या वेड्या हृदयांतरी
होती एक अदृश्य “उर्मी”
होता एक आगळा”जूनून”
भास होईल आता सारखा
गेले का राहिले
लिहायचे अजून?
माणिक नेरकर