— दीपक कुलकर्णी —
“शुक्र तारा मंद वारा” हे गाणं ऐकलं नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. या गाण्याला ६० वर्ष झाली तरीही हे गाणं अजून टवटवीत आहे. स्व. अरुण दाते यांच्या गाण्यांची एक सुंदर मेजवानी “नवा शुक्रतारा” या कार्यक्रमाच्या रूपाने मंडळाने बेंगळुरूवासियांना दिली.
अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल दाते हा कार्यक्रम मराठी भावगीते जतन व्हावीत, पुढच्या पिढीपर्यंत पोहचावीत या उद्देशाने करतात. त्यात मंदार आपटे आणि मनीषा निश्चल या गायकांनी अरुण दाते, सुमन कल्याणपूर, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी गायलेली आणि आजही रसिकांच्या मनात कायम असलेली सुंदर गाणी सादर केली. दिवस तुझे हे फुलायचे, भेट तुझी माझी स्मरते, भातुकलीच्या खेळा मधली, संधिकाली या अशा, केतकीच्या बनी आणि लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून ‘भय इथले संपत नाही’ आणि ओ सजना बरखा बहार ! ही सगळी गाणी रसिकांना वेगळ्याच भाव विश्वात घेऊन गेली. साथीदारांनी आपल्या साथीने ही गाणी आणखी सुंदर केली. अतुल दाते यांनी प्रत्येक गाण्याच्या आठवणी अगदी सहज व मोजक्या शब्दात सांगितल्या. अरुण दाते, पाडगावकर, श्रीनिवास खळे, यशवंत देव, आणि इतर समकालीन गीतकार, संगीतकार आणि गायक,गायिका यांनी घेतलेल्या कष्टाची पुन्हा एकदा आठवण झाली. अरुण दाते त्यांनी सगळ्या भाषेत मिळून ११५ गाणी गायली आहेत हे आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसावं.
शुक्र तारा विषयी काय सांगावं? अरुण दाते यांनी बऱ्याचदा नकार देऊन गायलेले त्यांचं हे पहिलं गाणं, श्रीनिवास खळे यांनी या गाण्याला लावलेल्या ११ वेगळ्या चाली, बऱ्याच जणांच्या सांगीतिक प्रवासातील हे पहिलं गाणं होतं, अशा खूप आठवणी अतुल यांनी सांगितल्या.
अडीच तास मंत्रमुग्ध करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता “शुक्र तारा” या अजरामर गाण्याने झाली. लावणीला ऐकू आलेल्या शिट्या, प्रत्येक गाण्याला मिळणाऱ्या टाळ्या, आणि काही गाण्याला मिळालेले once more श्रोत्यांची पसंती दाखवत होते.रसिकांची उपस्थिती आनंद देणारी होती. अशीच उपस्थिती इथून पुढे होणाऱ्या कार्यक्रमाना असावी अशी अपेक्षा आहे. घरी जाताना बहुतांशी सगळे ‘तू असा/अशी जवळी रहा’ या ओळी गुणगुणत गेले असणार हे नक्की.