–सौ. शिल्पा कपिल रायकर
नमस्कार
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरूने आयोजित केलेली नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा ५ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२२ ला मंडळात झाली.
सध्याचे आघाडीचे नाट्य प्रशिक्षक श्री योगेश सोमण यांनी ही कार्यशाळा घेतली आणि आम्ही एकूण २५ जणं त्यात सहभागी झालो होतो.
योगेश सरांनी कार्यशाळेची सुरुवात काही बौद्धिक खेळ घेऊन इतक्या रंजक पद्धतीने केली की पुढे काय शिकायला मिळणार याबद्दलची उत्सुकता वाढली.
दररोज कार्यशाळेची सुरुवात ओंकार करून व्हायची आणि सरांनी वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये ओंकार करणे तसेच गुणगुणणे(Humming करणे ) आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी एकत्र जवळपासच्या पट्ट्यांमध्ये ओंकार करणे याचे team Building साठी खूप महत्व आहे हे आम्हाला सांगितले. बोलताना उच्छवासाचे भान असणे त्याच्यावर प्राणायामाने(Breathing Exercises) काम करणे किती आवश्यक आहे हे सांगत स्वतःचा आवाज ओळखा आणि नेहमी संहितासुद्धा मोठ्यांदाच वाचा ही सूचना देखील केली.एकीकडे योगेश सर आम्हाला लेखनाचे स्वाध्याय देत होते ज्यामध्ये स्वतःची ओळख १० वाक्यांमध्ये करून द्यायची होती तसेच १० शब्दांमध्ये सुद्धा करून दाखवायची होती तर दुसरीकडे वाचिक अभिनय हे शब्द न उच्चारता त्याबद्दलची प्रात्यक्षिके चालू होती.
कुसुमाग्रजांच्या अहि- नकुल आणि आगगाडी आणि जमीन या कवितांचे अभिवाचन आम्हाला करायचे होते, काव्याच्या बाजाप्रमाणे लयीत बदल करणे , आवाजाचे चढ-उतार, शब्दोच्चार आणि सामूहिक म्हणणे याने अगदी नाट्यातच रूपांतर झाले, मजा आली.
योगेश सरांची शिकविण्याची पद्धतच इतकी छान आहे की प्रत्येकाकडून ते अचूक वाचन करून घेत होते आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाला आपली चूक दुरुस्त करून देत त्याच्याकडून योग्य सराव पण करून घेत होते.
त्यानंतर मूकाभिनयचा(Mime) विषय होता आणि जितका नैसर्गिक अभिनय करता येईल तितका करावा यावर भर देत काही प्रसंग देऊन आमच्यातील काही लोकांकडून १ मिनिटाचे सादरीकरण करून घेतले, प्रत्येक सादरीकरणानंतर त्यावर विश्लेषण व चर्चा होत होती त्यामुळे सगळ्यांनाच प्रत्यक्ष केल्याचा
अनुभव मिळत होता.कार्यशाळा असल्यामुळे प्रत्यक्ष करणे/अनुभव घेणे याला जास्त महत्व होतं जे आम्हाला नक्कीच फायद्याचे होते.प्रत्येक दिवसाचा शेवट हा प्रश्नोत्तरांचा होता आणि विशेष म्हणजे सर वेळ देऊन सविस्तरपणे उत्तरे देत आणि स्वतःचे अनुभवसुद्धा सांगत.
सरांनी आम्हाला वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून प्रत्येक गटाला एक विषय देऊन त्यावर नाटक स्वतः लिहून, पटकथा रूपांतर करून , सादर करायचे असे काम दिले होते आणि त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन सर करत होते. ही सगळ्यात कठीण पण तितकीच समृद्ध करणारी प्रक्रिया होती.
एकतर सगळ्यांनी आपल्या गटात काम करायचे होते शिवाय वयक्तिक पातळीवर विचार करून आपापले म्हणणे inputs पटवून द्यायचे होते, Team मध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला शिवाय एक कलाकृती कशी उभी करावी याचे उत्तम मार्गदर्शन लाभले व आम्ही एक छोटंसं नाटुकलं बसवू शकलो!
प्रत्येक पायरी आम्ही पार केली(नाट्य लेखन , पटकथा लेखन, संवाद , नाटकाची सुरुवात-शेवट ) की सर त्यावर आपले मत,आवश्यक ते बदल आणि त्याची कारणे एकदम विस्तृतपणे सांगत होते आणि त्यामुळे नकळत नाट्य आकलनाच्या देखील कक्षा रुंदावल्या.
तटस्थपणे आपण नाटक बघितले पाहिजे आपल्या भूमिकेव्यतिरिक्त विचार आपल्याला करता आला पाहिजे अशा छोट्या पण तितक्याच आवश्यक टिप्स सर वेळोवेळी देत होते.नाटक उभे करताना कोणत्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे ही आम्हाला सर सांगत होते.
दिलेल्या थोड्या वेळात आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे एक नाटुकलं करू शकलो याचा आनंद खरंच मोठा होता.
एकूण आमचे नाटकाविषयीचे भान व जाण खूपच वाढली.
वाचनाचे महत्व सांगताना विश्राम बेडेकर , दत्ता भट यांची चरित्रं त्यांना विशेष आवडली तसेच राम गणेश गडकरी यांची सुंदर मराठी भाषा जरूर वाचा असे सांगितले. त्याचबरोबर एखादे नाटक करताना भूमिकेव्यतिरिक्त कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्याचेही छान विवेचन केले , नाटक कसे पाहावे ? भूमिका करतानाची तयारी , लेखनातल्या काही नवीन बाबी असे अनेक पैलू उलगडले.
माझ्यासाठी तरी ही नाटक शिकण्याची प्रक्रिया अतिशय समृद्ध करणारी आणि
निखळ आनंद देणारी होती.
महाराष्ट्र मंडळाचे आभार आणि आयोजकांमध्ये श्री गिरीश जोशी व श्री ओमकार संगोराम यांचे विशेष आभार!
