सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय –जीव सुखाचा प्रवासी-एक आध्यात्मिक शिबिर

–जीव सुखाचा प्रवासी-एक आध्यात्मिक शिबिर

–प्रज्ञा नरेंद्र करंदीकर 

रविवार दि.१० सप्टेंबर २०२२ रोजी, श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड आणि महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरू यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक दिवसीय *जीव सुखाचा प्रवासी* हे अध्यात्मिक शिबिर सज्जनगड येथून आलेले समर्थभक्त पू. श्रीयोगेशबुवा रामदासी पुरोहित व श्री श्रीधर स्वामी मठ,पुणे येथून आलेले समर्थभक्त पू.श्रीअजेयबुवा रामदासी देशपांडे या उच्च विद्याविभूषित महान विभूतींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात भावपूर्ण वातावरणात  संपन्न झाले.

महाराष्ट्र मंडळाने शिबिरार्थींच्या चहा व भोजनाची  सोय केली होती.येणाऱ्या भक्तांना मंडळाच्या प्रवेशद्वारावरच चहा व भोजनाची कुपन्स वाटण्याची सोय केली होती त्यामुळे कुठलाही गोंधळ झाला नाही.प्रत्येकजण चहा काॕफी घेऊनच सभागृहात उपस्थित झाले.

मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यात आपले योगदान देऊन मंडळ परिसर रांगोळ्या, तोरणांनी सुशोभित केला होता.१००माणसांची आसन व्यवस्था चोख ठेवली होती.

मंडळ सभागृहात श्रीरामरायाची मूर्ती विराजमान करुन त्याबरोबर श्री ग्रंथराज दासबोध ,श्री श्रीधरस्वामी चरित्र हे ही हार फुले,मंद तेवणार्‍या समया ज्योती, निरांजनानी अलंकृत केले होते.

प्रज्ञा करंदीकर यांनी सूत्र संचालन हाती घेऊन मान्यवर दोन्ही रामदासी बुवांचे व उपस्थित सर्व समर्थभक्तांचे मनःपूर्वक स्वागत केले.कार्यक्रमाची रुपरेखा उपस्थितांना  स्पष्ट करुन श्रीसमर्थसेवा मंडळ सज्जनगड या संस्थेविषयी माहिती करुन दिली.आर्या अहिरराव व अनया अहिरराव ह्या चिमुकल्या समर्थभक्तांनी समर्थांची *कोमलवाचा दे रे राम* ही चौपदी सर्वांपुढे सादर केली. याबरोबरच सर्वांनी *जय जय श्रीराम* *जय जय श्रीराम* नामाचा जयघोष केल्याने  संपूर्ण सभामंडप भक्तिभावपूर्ण वातावरणानी दुमदुमून गेला.

या आनंदमयी ,राममयी होऊन गेलेल्या मंगल वातावरणात  पू.श्रीयोगेशबुवा रामदासी,पू.श्रीअजेयबुवा रामदासी व महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा माणिकताई पटवर्धन यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन टाळ्यांच्या गजरात मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

*शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे* या श्लोकानी श्रीअजेयबुवांनी श्रीसमर्थांच्या  प्रयत्नवादाचे सुंदर उदाहरणे देऊन विश्लेषण केले.दैववाद हा कुणाला चुकला नाही अगदी श्रीरामालाही नाही मग आपण तर सर्वसामान्य आहोत.त्याचा स्वीकार करुन प्रयत्नांनी त्यावर विजय प्राप्त करावा.दैववाद व पुरुषार्थ यातील सीमा ज्यानी जाणू घेतल्या त्याला प्रयत्नवाद कळला ! प्रयत्नवादाचा अंगिकार केल्याने आपण आपले प्रारब्ध बदलू शकतो..अगदी तीव्र प्रारब्धही प्रयत्न व संत सहवासातील उपासनेने बदलू शकतो. मात्र सुखाचे दरवाजे उघडण्यासाठी समर्थांच्या प्रयत्नवादाचा अंगिकार प्रत्येकाने करायला हवा हा समर्थ संदेश बुवांनी आपल्या मधुर वाणीतून उपस्थितांपर्यत पोहचवला.

यानंतर पू.श्रीयोगेशबुवा रामदासी यांनी उपासना म्हणजे काय ?ती कशी करावी त्याच बरोबर कशी असावी ?त्याचे फलित काय?  हे समजावून सांगितले .

उपासना जगण्याचा मोठा आधार आहे.उपासना आपल्याला आश्रय देते,यश देते. उपासना आपल्याला डोळस करते,आपल्यातील त्रुटींची जाणीव करुन देते.*एकच गोष्ट सातत्याने परत परत करणे म्हणजे उपासना!* *कश्याच्या तरी जवळ जाऊन स्वस्थ होणे उपासना!* इतक्या सहज सोप्या शब्दात उपासना म्हणजे काय हे बुवांनी आपल्या प्रभावित वाणीने उलगडून सांगितले.श्री ग्रंथराज दासबोधाचे वाचन आपल्या क्रियेत बदल घडवून आणते.क्रिया बदलली की विचार बदलतात व विचारात बदल म्हणजे स्वतःत परिवर्तन होय..उपासना कोणतीही असो ,ईश्वर प्राप्तीची किंवा ध्येय प्राप्तीची ;फळ ही देतेच फक्त उपासना करताना काय टाळायचे हे लक्षात घ्यायला हवे ..हे त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर पहिल्या सत्रातील शेवटचे सदर *प्रपंच सुखे करावा |परि प्रयत्ने परमार्थ 

वाढवावा ||  ह्या विषयावर श्रीअजेयबुवांनी समर्थभक्तांना अनमोल मार्गदर्शन केले.मानवी जीवनात उपासनेची नितांत गरज आहे, मानवालाच भगवंताची प्राप्ती करुन घेता येते.ते ज्ञान त्याच्याशिवाय अन्य प्राण्यांना नाही .उपासना करताना काय त्यागले पाहिजे.वाईट संग टाळावा. अधर्म,अनिती,दुष्टवासना,पाप बुद्धी टाळावी  हे त्यांनी विषद केले. दुर्भावना त्यागल्या की सद्भावनांचाच मार्ग दिसू लागतो.  

*काय त्यागायचे हे कळले की काय करायचे ते दृष्टीपथात येतेच.* चुकीच्या भावनांचा त्याग न करता उपासना केली तर ती लवकर फलद्रूप होत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.प्रपंचाचा त्याग समर्थ सांगत नाहीत .प्रपंच नेटका  करावा पण रामाचा विसर न पडावा हे समर्थ सांगतात.आपण सर्व दिले कि स्व देण्याची वृत्ती वाढीस लागते व भगवंताजवळ पोहचण्याचा मार्ग मोकळा होतो याची सुंदर उदाहरणे देऊन विश्लेषण केले. जाता जाता *ज्याने विठ्ठलाची मात्रा घ्यावी त्याने पथ्ये पाळावीत** 

उपासना करताना आपण चुकीच्या भावना त्यागत नाही त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होत नाही .स्व सोडा जीवनाचे सार्थक होईल हे ही त्यांनी नमूद केले.

या पहिल्या सत्रानंतर उपस्थित समर्थभक्तांनी सात्त्विक प्रासादिक भोजनाचा आस्वाद घेतला. जय जय श्रीराम म्हणत प्रसाद स्विकारताना आपण गडावरच आहोत असे सर्वांना भासत होते.इतके वातावरण समरसून टाकणारे होते..राममय झाले होते.

भोजनानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात भजनांनी झाली. श्रीअजेयबुवांनी रामदासांची अनेक पदे आपल्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना ऐकवली. भक्ती कळसास गेली आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. भक्तीरसात चिंब न्हाऊन गेले. या सुरेख कार्यक्रमात बुवांना पेटीवरती सौ.आदिती श्रीपुरम व तबल्यावरती श्री.आनंद पाठक यांनी साथ केली.

तासाभराच्या या भजनानंतर पू.श्रीयोगेशबुवांनी श्रीसमर्थ रामदास व प,पू.भगवान श्री श्रीधर स्वामींच्या कार्याची माहिती करुन दिली. एकीकडे मुघल मंदिरे उध्वस्त करत राहिले तर दुसरीकडे समर्थ मंदिरे बांधत धर्मप्रचार व प्रसार करत राहिले. समर्थांचा जीवन प्रवास ,तपश्चर्या ,देशाटन याविषयीची, त्यांच्या अकरा मारुतींच्या स्थापना , प्रताप मारुती,दास मारुती,एकमेव असलेला वरद मारुती यांची  माहिती,श्री श्रीधर स्वामींच्या कार्याची माहिती ,त्यांनी स्थापन केलेल्या सेवा मंडळाची माहितीही  बुवांनी करुन दिली..रामापर्यंत पोहचायचे तर मारुतीला आपलेसे करा. मारुतीराया सामर्थ्याचे प्रतीक आहे. मुलांपुढे त्याचाच आदर्श ठेवा. मुलांना सूर्यनमस्कार शिकवले जावेत. सुखाचा प्रवास व्हावा वाटत असेल तर, निरोगी संस्कारी,संयमी पिढी निर्माण करणे काळाची गरजच आहे व हेच समर्थ सांगतात हे हसत्या खेळत्या वातावरणात  सहज समजावत मार्गदर्शन केले.

यानंतर प्रश्नोत्तर सदर पार पडले.प्रत्येक सदरातील विवेचन ऐकताना प्रत्येकाच्या मनात घोळणा-या शंकांचे आपोआपच निरसन होत होतेच पण तरी श्रोत्यांना असलेल्या अनेक शंकांचे समाधान या दोन्हीही बुवांनी सुंदर केले. 

यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा सौ. माणिकताई पटवर्धन,आजी आजोबा क्लबचे श्री.धनंजय जोग, सूत्र संचालिका प्रज्ञा करंदीकर यांचा श्रीसमर्थसेवा मंडळातर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला सुंदर प्रतिसाद दिल्याचे समाधान व्यक्त करुन सर्वांना आशिर्वाद दिले.  

प्रज्ञा करंदीकर यांनी बुवांचे आशिर्वाद घेऊन व श्रोत्यांना वंदन करुन समारोपाची सूत्रे मंडळाच्या कार्यकारी सौ.स्मिताताई बर्वे याच्याकडे सुपूर्त करत सर्वांचा निरोप घेतला. स्मिताताईंनी मंडळातर्फे सर्वांचे आभार मानले.

शिबिर सांगता श्रीसमर्थ रचित *कल्याणकरी रामराया* या प्रार्थनेनी झाली. आपल्या खणखणीत पण तितक्याच आर्त भावनेने  पू.श्रीअजेयबुवांनी ती म्हटली ..सर्व शिबिरार्थींनी त्यात सहभाग घेतला.

महाराष्ट्र मंडळाचे आयोजन,नियोजन,सुरेख,अतिशय उत्कृष्ट होते. 

रामदासीबुवांची सोवळ्यात जेवणाची व्यवस्था श्री रामण्णा यांनी भक्तीभावाने पार पाडली. रंगमंच व्यवस्था सतीश बर्बे यांनी,रांगोळी,दीप,पूजा साहित्य योजना ही जबाबदारी संजीवनी अहिरराव, प्रज्ञा करंदीकर ,अपर्णा चेरेकर, मंजिरी गाडगीळ, स्मिता बर्वे यांनी धनंजय जोग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फुर्तपणे ,आनंदाने पार पाडली..मंडळाच्या सर्वच कार्यकत्यांचे शिबिर यशस्वी करण्यात योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचे राम पाठीशी होता ! पुण्याच्या अॕडव्होकेट मुग्धा बिवलकर यांनी हा प्रस्ताव मंडळापुढे मांडला व मंडळाने संमती दिली त्यामुळे सर्व समर्थभक्तांना बेंगळूरूमधे याचा लाभ घेता आला .

निखळ आनंद, मौलिक विचार आणि अनमोल जीवनमूल्यांची शिदोरी गाठीशी बांधत उपस्थितांनी एकमेकांचा संध्याकाळच्या चहाबरोबर निरोप घेतला.🙏🏻

🌹|| *जय जय रघुवीर समर्थ*||🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *