—शिल्पा धर्माधिकारी—
महाराष्ट्र म्हणजे संतांची मांदियाळी असलेली पावित्र भूमी! जिथे आषाढ महिना म्हणजे पंढरीची वारी, वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा पालखी सोहोळा, ह्या आणि अशा विठ्ठलमय वातावरणाने भरून गेलेला .
असेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते, आषाढ शुद्ध दशमी म्हणजे ९ जुलै २०२२ या दिवशी महाराष्ट्र मंडळाने खास आषाढी निमित्य रविंद्र कलाक्षेत्र,बेंगळुरु येथे आयोजित केलेल्या “विठ्ठल गीती गावा” ह्या अभंग गायनाच्या कार्यक्रमाने आणि सुचेता भिडे चापेकर निर्मित कलावर्धिनी तर्फे “तुका म्हणे” ह्या तुकारामांच्या अभंगावर आधारित नृत्याच्या कार्यक्रमाने.
ह्या कार्यक्रमात खास “नामाचा” टिळा लावून प्रेक्षकांचे स्वागत केल्यामुळे, आपणही पंढरीच्या वारीतील एक वारकरी आहोत असे वाटायला लागले.
ह्यात “व्हॉईस ऑफ बेंगळूरू” ने सादर केलेल्या “विठ्ठल गीती गावा” ह्या अभंग गायनाचा कार्यक्रम अप्रतिम झाला. गायक, निवेदक आणि सर्व सहभागी यांनी परिधान केलेली वारकरी वेशभूषा, आपण जणू वारीमध्ये आलो आहोत ही भावना निर्माण करणारी होती. अतिशय सुंदर संतांच्या कथा, ओव्यांचे दाखले देणारे अर्थपूर्ण निवेदन, भक्तिरसाने भरलेलं गायन आणि सगळ्यांना योग्य साथ देणारा वाद्यवृंद. अप्रतिम कार्यक्रम. आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो १५-१६ वर्षाच्या सावनी संगोराम हिचा आणि तिने सादर केलेल्या “मोगरा फुलला” ह्या अभंगाचा. गिटारीच्या धूनेवर गायलेला अभंग आणि मधून मधून गद्य रुपात उकलत जाणारा अभंगाचा अर्थ. अतिशय आगळावेगळा प्रयोग मनापासून भावला.
“तुका म्हणे ” ह्या नृत्याच्या कार्यक्रमात “तुकारामांच्या अभंगावर बसवलेली नृत्य” ही संकल्पनाच वेगळी आणि वाखाणण्याजोगी वाटली आणि ती तितक्याच ताकदीने दोन्ही नृत्यांगनांने सादरही केली. तुकारामाचे विठ्ठलाविषयीचे प्रेम, भक्ती, त्याला भेटण्याची तळमळ आणि प्रत्यक्ष गळाभेटीनंतरचा होणारा आनंद नृत्यामधून अप्रतिमपणे दाखविला आणि आमच्यापर्यंत पोहोचलाही.
खरंच त्या दिवशी विठुरायाच्या गजराने पूर्ण सभागृह भरलेले आणि भारावलेलं होते.
कार्यक्रम संपल्यावर पांडुरंगाने भारावलेलं मन घेऊन मी जेव्हा बाहेर पडले आणि कन्नड भाषा कानावर पडली तेव्हा लक्षात आले की मी महाराष्ट्रात नाही तर बेंगळुरुमध्ये आहे. इतका सुंदर असा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम मला माझ्या आषाढातील वारी आणि वारकरी संस्कृतीचा आनंद देऊन गेला.
ह्यासाठी खास आभार महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर, बेंगळुरुचे.