–सौ.अनुराधा भागवत.
सप्टेंबर महिन्याचा अंक वाचला. गणेशोत्सव विशेषांकही पोचला. सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसांत एका महिन्यात दोन अंक यशस्वीपणे सादर केल्याबद्दल संपादक मंडळाचे खरंच खूप कौतुक व खूप खूप अभिनंदन!
गणेशोत्सव विशेषांक अजून पूर्ण वाचला नाही फक्त चाळला आहे. परिक्षकांच्या मतावर कुणी आक्षेप घेतला आहे व तत्सम चर्चा आधीच ग्रुपमध्ये वाचली होती. कुणाच्या व्यक्तिगत मतावर आपण काय बोलणार? मला वाटतं लेखनाच्या सुरुवातीला ‘कथा ‘प्रकार लिहायला थोडा अवघडच असतो. दिलेल्या विषयावर लेख लिहणे तुलनेने सोपे असते. शाळेपासून निबंध लिहित असतोच आपण कथेचा बाज थोडा वेगळाच पडतो. कथेची भाषा, आशय कथानक यांतूनच वेगवेगळे रसाविष्कार प्रतीत होतात. एकाच रसाची प्रचिती देत कथा लिहिली असेल तर ती आवडणे कठीण आहे. पिठात मीठ मिसळले तरच अन्नाला चव येते. काळ्या साडीला हलकीशी पांढरी किनार किंवा बुट्टी असेल तर ती पट्कन आवडते. परिक्षकांना आपली कथा कशी वाटली, त्यापेक्षा आपल्याला कथा लिहतांना काय अडचणी आल्या, कुठे अवघड वाटले याचा सर्वांनी विचार करावा, त्यावर मात करायचा प्रयत्न करावा. एकदा कथा rewrite करून बघायलाही हरकत नाही, आपली एक प्रैक्टीस म्हणून. यांतूनच आपल्यात सुधारणा होत जाते.
आपला ओवा व पानांचा ओवा वेगळा हे वाचून बरं वाटलं. आमच्या आवारात हे झाड खूप वाढते. याला ओवा लागत नाही मग ओव्याचं झाड कसं? यावर घरात पुष्कळदा चर्चा झाली आहे. आता सर्वांना लेख वाचायला दिला व ही पानं खाल्ली तरी चालतात हे पटवले. या माहितीबद्दल धन्यवाद.
या महिन्यातील बहुतेक लेख एकाच विषयावर आहेत, प्रसंग मात्र वेगवेगळे आहेत. जगत्पाळजींच्या आयुष्याची कलाटणी व मालशेंना मिळालेले जीवदान विस्मित करणारे आहे. रसिका हिंगे यांच्या लेखातील प्रसंग, काल्पनिक असणार पण अतिशय सुसंगत व विषयाला धरून लिहिले आहे. दोनशे वर्षांपूर्वीची स्त्री, तिचे आयुष्य, व आजच्या स्त्रीचे बदलेले आयुष्य व रूप हा लेख सर्वांपेक्षा वेगळा आहे, चांगला आहे. त्यातील विचार व मांडणी आवडली.
बाकी मुखपृष्ठ, सजावट व पूर्ण अंकाचे संपादन नेहमीप्रमाणेच स्पृहणीय!
धन्यवाद.