सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय सनविवि गणेशोत्सव स्पर्धा, आभारप्रदर्शन

सनविवि गणेशोत्सव स्पर्धा, आभारप्रदर्शन

 

–पुरुदत्त रत्नाकर

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु, आयोजित गणेशोत्सव कथास्पर्धेच्या परीक्षक सौ. माधुरी शानभाग यांच्या त्याच अंकात प्रसिद्ध झालेल्या चार शब्दांना हा माझा प्रतिसाद आहे. केवळ परीक्षण न करता शानभाग यांनी परिक्षणाचे निकष लिहिले आणि चार शब्द लिहित स्पर्धकांशी संवादही साधला. याबद्दल आभारप्रदर्शन हा या प्रतिसादाचा एक हेतू आहे.

शानभाग विज्ञानाच्या अध्यापिका आणि प्राचार्य होत्या. त्यांनी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केलेली आहे. यांना मराठी साहित्य राज्यपुरस्कार मिळालेला आहे. अशा परीक्षकांनी आपलं लिखाण वाचणं हेसुद्धा भाग्य असतं. हा भाग्यलाभ महाराष्ट्र मंडळामुळे झाला, याबद्दल सर्वप्रथम मंडळाचे आभार.

एकही कथा बक्षीस देण्याच्या क्षमतेची नव्हती, या परखड मतप्रदर्शनाबद्दल परीक्षकांचे आभार आणि अभिनंदनही. हो ला हो आणि सगळ्यालाच चांगलं म्हणत धकवून नेण्याच्या काळात नीरक्षीरविवेक करणारी व्यक्ती परीक्षक म्हणून योग्यतेची आणि क्षमतेची होती हे त्यांनीच आपसूक दर्शवलं. मला माझ्या लिखाणाबाबत त्यांचं हे परीक्षण मान्य आहे. स्वतःच्या लिखाणाचे खरे परीक्षण हवे आहे, अशा आमच्यातल्या लेखकांना, यापुढचे लिखाण माधुरी शानभागांना पाठवून त्यांचं मत जाणून घ्यावं अशी इच्छा झाली तर त्यात नवल नसेल. 

नवरसांवर आधारीत लेखन ही वेगळी आणि धाडसी संकल्पना आहे, या परीक्षकांच्या मताशी मी सहमत आहे. विविध रसांमधली सीमारेषा स्पष्ट नाही. एवढंच नाही तर एका रसातून दुसऱ्याची किंवा तिसर्‍याचीही उत्पत्ती होते आणि कोणता रस अधिक पाझरतो ते लिखाण झाल्यावर किंवा लिखाणाचं वाचन झाल्यावर जाणवतं, जाणवू शकतं. ती जाणीव आधीच मनात ठेवून लिहिणं आव्हानात्मक होतं. उत्सव विशेषांकात करूण, बिभत्स लिहिलेलं वाचकांना रुचेल, खपेल याबद्दलही साशंकता होती. 

मी अजून पुरेसा वाचकही नाही. लेखक होणं ही दूरची बाब आहे. या पार्श्‍वभूमीवर मी अन्य स्पर्धक हाताळण्याची शक्यता कमी असा बिभत्स रस आणायचा ठरवला. यात सुचलेला पहिलाच विषय हा इतका त्याप्रकारचा होता की ते विचार माझ्याच मनातूनही हद्दपार केले, लेखणीतून उतरणं तर दूरच. नंतर एका विषयावर लिहून पूर्ण केलं, पण वाचकाच्या भूमिकेतून त्यात मला कारुण्य अधिक जाणवलं. करूण रसासाठी तो विषय तेवढा योग्य ठरवता आला नाही. कारुण्य आणि करुणाकर यापेक्षा योग्य विषय कुठला? करुणाकर दत्तगुरूंच्या जवळचे श्वान या विषयावर लगेचच सुचलं ते लिहिलं. मला त्यातून कारुण्य प्रकट होतं असं वाटलं तरी इतरांना तेच वाटत असेल अशी मला अजूनही खात्री नाही. लेखनातल्या रसांची जाणीव वाचकाच्या जीवनअनुभवांच्या, त्यातून निर्माण झालेल्या मतांच्या रसनेत मिसळते आणि या मिश्रणातून निर्माण झालेल्या रसाची अनुभूति वाचकाला होते. त्यामुळे वाचकाला जाणवलेल्या रसाचं प्रमाण आणि प्रकार हे दोन्हीही मुख्यत्वे व्यक्तीसापेक्ष असतं असं मला वाटतं. 

पुलं, वपु किंवा अन्य लेखकांचीही पुस्तकं वाचतांना येणारा अनुभव आणि तेच लिखाण त्यांच्या आवाजात ऐकतांना येणारा अनुभव भिन्न असतो. वाचनाने लिखाण वाचकाच्या जिभेवर, रसनेवर येतं आणि लेखकाला अपेक्षित रस तेवढासा उतरत नाही. पण अभिवाचन केल्यास तेच लिखाण कानात उतरतं आणि लेखकाला अपेक्षित रस थेट पोहोचतो. असं होत असेल का, असाही, यासंदर्भातला एक गमतीदार विषयबाह्य विचार माझ्या मनात येऊन गेला.  

वरच्या गोषवार्यात परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हो. मी आपल्या कथेतून जाणवणारा रस हे उद्दिष्ट ठेवूनच लिखाण केलं आहे. आयोजकांनी दोन अपेक्षा मांडल्या होत्या. नवरसांपैकी एका रसावर आधारित लिखाण आणि शब्दमर्यादा. या अपेक्षा गुणवत्तापडताळणीच्या मोजपट्टीच्या बाहेर राहिल्या असं दिसतं. आयोजक-परिक्षक यांचा ताळमेळ रुपरेषा ठरवण्यापासून व्हायला हवा असं वाटतं. पण स्पर्धक या भूमिकेतून याच्या खोलात शिरण्याची माझी भूमिका नाही. आयोकांनी विचारांना दिलेली चालना, वाचकांचे अभिप्राय आणि परिक्षकांचे मार्गदर्शन यांचा लाभ घेणे उचित ठरेल.  

 

मंडळ, आयोजन समिती, वाचक, स्पर्धक आणि परीक्षकांचे पुनश्च आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *