---रसिका राजीव हिंगे---
हे..., नीले गगन के तले, धरती का प्यार पले ऐसे ही जग में, आती हैं सुबहें ऐसे ही शाम ढले ... सनविविचे जुलै 2022 चे मुखपृष्ठ पाहिल्याबरोबर हे गाणे ओठावर आले. हिरवाईचा कुंचला असा बेमालूम फिरवला आहे की निसर्ग देवतेच्या पुढे आपोआप नतमस्तक झाले. सौंदर्याची परिसीमा जणू. आयुष्यात कितीतरी प्रसंग येतात, घडतात पण एखादाच अविस्मरणीय ठरतो. जुलै 2022 च्या अंकात असेच एकसे बढकर एक प्रसंग चितारले आहेत. झिरो पॉईंट प्रवासाचा थरार, मैत्रिणीचा हृदय हेलवणारा प्रसंग, बेळगांवच्या गोकाक धबधब्याचे सौंदर्य, जीवाची मुंबई करतांना मनाला चुटपुट लावत आलेले अनुभव हे सगळेच लेख वाचतांना प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य खरेच खूपच छान वाटले. खिळवून ठेवणारे. एखादे रुजलेले रोपटे काढून दुसऱ्या ठिकाणी रुजवणे कठीणच. मग ज्यांचे आयुष्य ज्या ठिकाणी गेले तिथून दुसरीकडे जाणे किती कठीण. मनापासून केलेले प्रयत्न यश देतातच. सावनदुर्ग येथील मधमाश्यांचा जीवघेणा प्रकार वाचून तर अक्षरशः अंगावर काटे आले, जणू मधमाशांचेच की काय. सोपे आणि साधे शब्द सुद्धा वाचतांना आनंद देत रहातात, तर मग अचानकपणे लेकीचे ऑनलाईन कौतुक पाहून आभाळ ठेंगणे वाटले. पुढे काय पुढे काय असं वाचतांना वाटणे म्हणजेच वाचक खिळवून ठेवणारे शब्द. हत्तीचा वेढा कसा सुटेल याचा विचार म्हणजे तर काय घालमेल झाली असेल. गायन स्पर्धेचा अनुभव, परिश्रमांती होणारे चंद्रदर्शन, बालपणीच्या हृद्य आठवणीची साठवण, किती वर्णन करावे,अन काय सांगावे. विनोदी लेखन करतांना मग ते एप्रिल फुलचा रिऍलिटी शो असो की माकडांशी केलेले युद्धपातळीवरचे प्रयत्न असो किंवा वधुवर संशोधन करायचे असो, अप्रतिम शैली लिहिण्याची. विनोदी लेखन प्रत्येकालाच जमेल असे नाही बरे! या स्पर्धेच्या निमित्ताने किती ज्ञानात भर पडते आहे, साहित्याची लयलूट पहावयास मिळते आहे. विषय सारखे असले तरीही प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगळी, बाज वेगळा, त्यामुळे सगळंच आनंददायक, आल्हादक वाटतं वाचायला. असेच सगळे लिहिते रहावे, नवनवीन विचारधारा प्रवाहित होत राहाव्यात यासाठी सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! सनविविने एक उत्तम व्यासपीठ आपल्यासाठी निर्मिले आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेत आपण सगळेच समृद्ध होत आहोत ही खूपच सुखावणारी गोष्ट आहे. असेच वेगवेगळे प्रयोग सनविविने करावे आणि पेपरलेस साहित्यजत्रा भरवावी आणि आमच्यासह सगळ्यांना पर्यावरण सांभाळण्यास हातभार लावता यावा हीच आशा आणि सदिच्छा.