–सतीश बर्वे–
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू वेळोवेळी दर्जेदार कार्यक्रम श्रोत्यांना उपलब्ध करून देत असतात. असाच एक सुरमणी सानिया पाटणकर यांच्या संगीत मैफिलीचा बहारदार कार्यक्रम *सूर निनाद* हा मंडळाने 25 जून 22 रोजी मंडळाच्या सभागृहात आयोजित केला होता.
कार्यक्रमच्या सुरवातीलाच सानिया पाटणकर यांनी यमन रागातील एक बंदिश सादर केली आणि त्यानंतर त्याच रागावर आधारीत रंजिसे सही, आज जाने की जिद ना करो, सलोना सजन, सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात, भय इथले संपत नाही, देवाघरचे ज्ञात कुणाला , अभि ना जाओ छोडकर, जब दीप जले आना ही अप्रतिम गीते सादर करून कार्यक्रमात बहार आणली.
त्यानंतर अबीर गुलाल, माझे जीवन गाणे, झाले युवती मना, हे सुरानो चंद्र व्हा, याद पिया की आये, साजणा का धरिला परदेस, अशी अत्यंत लोकप्रिय गाणी, अभंग, नाट्यगीते सादर केली.
या व्यतिरिक्त विविध प्रांतातील लोक संगीत प्रकाराबद्दल माहिती देताना उत्तर भारतीय झुला आणि टप्पा अत्यंत परिणामकारक सादर केला. तसेच श्री.भीमसेन जोशी यांचे एक गाजलेले कानडी भजन भाग्यद लक्ष्मी बारम्मा सादर केले. कार्यक्रमाची सांगता करताना संगीतातील दोन दिग्गज भारतरत्न श्री. भीमसेन जोशी आणि श्रीमती लता मंगेशकर यांना आदरांजली वाहताना श्री. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले बाजे मुरलिया बाजे हे गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्तम साथ संगत. संवादिनीवर श्री.अश्विन वालावलकर, तबल्यावर श्री सचिन पावगी आणि मागे गायन साथीला सौ. सुगंधा उपासनी… यांनी अप्रतिम साथ करून कार्यक्रमाची रंगात वाढविली.
मंडळाने जाहिरातीत दिल्याप्रमाणे सानिया पाटणकर यांनी गायनाची विविध रूपे म्हणजे तराणा, टप्पा, अभंग, गझल, नाट्यगीत, भावगीत, लोकसंगीत असे सर्व प्रकार सादर करून एक अप्रतिम मेजवानी रसिक प्रेक्षकांना दिली.
हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूचे अत्यंत आभार.