–वंदना नाडगौडा–
25 जूनला पुण्याच्या सुरमणी सानिया पाटणकर यांच्या श्रवणरम्य गायनाची सुरेल संध्याकाळ महाराष्ट्र मंडळाने सादर केली.
त्यांच्या गायनात खूपच वैविध्यता होती. अभंग,भजन, शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत गझल, लोकसंगीत अशा विविध गायन प्रकारांची लयलूट त्यांनी केली. त्यांना तानपुऱ्यावर साथ द्यायला बेंगळूरुच्याच त्यांच्या शिष्या सुगंधा उपासनी होत्या व पेटीवर साथ द्यायला वालावलकर हे ही बेंगळुरुचेच होते.
तबल्यावर साथ द्यायला सचिन पावगी हे पुण्याहून आले होते. ह्या सर्व कलाकारांनी त्यांना खूप सुंदर साथ दिली. मंडळाच्या आयोजकांनी स्टेज छान सजवला होता.
जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाचा सानियाजींच्या गायनावर प्रभाव जाणवला.
आवाजात जयपूरच्या अत्रौली घराण्याचे खणखणीतपण व सुरेलतेचे कौशल्य होते. त्यांची तान घेण्याची विशिष्ट स्टाईल मला फार भावली. एकापाठोपाठ एक त्यांनी वरील सर्व प्रकार सुरेखपणे न दमता सादर केले. त्यामुळे कार्यक्रम सुटसुटीत झाला.
मला स्वतःला त्यांनी सादर केलेली खाली लिहिलेली गाणी फार आवडली.
पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे,’झाले युवती मना दारुण रुचिरा प्रेम असे,’
भीमसेन जोशींचे कन्नडा भक्ती गीत, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा,’
जितेंद्र अभिषेक यांचे ‘माझे जीवन गाणे,’
बकुळ पंडितांचे ‘उगवला चंद्र पुनवेचा,’
आशा भोसलेंचे, आज जाने की जिद ना करो’
उत्तर प्रदेशातील ठेक्यात गायलेले लोकसंगीत
सर्वच गाणी एकाहून एक वरचढ होती.
श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले, भीमसेन जोशी आणि लतादीदींनी गायलेल्या गाण्याने शेवट
झाला, तेव्हा प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट दीर्घकाळ चालू होता. सगळेच खूप भारावले होते
अशी नितांत सुंदर गायनाची, आल्हाददायक संध्याकाळ महाराष्ट्र मंडळाने प्रेक्षकांना सादर केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंट माणिकताई पटवर्धन यांचे,सर्व आयोजकांचे व महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप खूप आभार.
विशेष म्हणजे वर्षा धरमदासानी यांच्या भेळपुरीच्या व चहाच्या स्टॉलमुळे संध्याकाळ ताजीतवानी व लज्जतदारही झाली.