—सौ.अनुराधा भागवत—
संपादक, सनविवि,
सप्रेम नमस्कार.
अंक वाचला. आपल्या मंडळाच्या उपक्रमांचे अहवाल वाचून खरंच तुम्हा सर्वांच्या उत्साहाचे कौतुकच वाटते. इन्शुलिन प्लॅन्टची माहिती नवीन होती, हे रोप नक्कीच फायदेशीर आहे. आजपर्यंत समजत होते इन्शुलिन प्राण्यांच्या स्वादुपिंडापासूनच बनते.
अविस्मरणीय प्रसंग… यावर लेख जास्त आहेत. अशा प्रकारच्या लेखांत लेखकाची संवेदनशीलता व भावुकता जास्त प्रगट होते. प्रसंगातील अनुभूतीची तीव्रता प्रसंगाला अविस्मरणीय बनवते आणि लेखांत या अनुभवांचे प्रकटीकरण आहे. बहुतेक लेखांत, आश्चर्य, भिती, दुःख या भावना व्यक्त केल्या आहेत आणि घटना अकस्मात घडल्या आहेत. एकच लेख या चाकोरीबाहेरचा वाटतो, आपल्या वृद्ध किंचित हट्टी वडिलांना त्यांच्या मनाविरुद्ध आपल्या बदलीच्या गांवी घेऊन जाण्याचा. प्रसंग साधाच आहे पण आपल्या वडिलांना फसवून आपण हे करतो आहे याचा ताण लेखकाच्या मनावर आहे आणि मनात त्याची बोचही आहे. प्रसंग म्हणून त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. सगळ्यात हटके वाटला तो ‘विनोदी अविस्मरणीय ‘प्रसंग.. छान हलका फुलका लेख आहे.
इतक्या दिवसांत आता अंकात नियमित लिहणारे सर्व ओळखीचे, जवळचे वाटू लागले आहेत म्हणून अभिप्राय लिहण्यात थोडा मोकळेपणा आला आहे. तरी कोणी रागावणार नाही अशी आशा करते.
गणेशोत्सव स्पर्धांचे लेख व कथा आम्हांला वाचायला मिळतील ना?
