—भूषण लवाटे—
गंधर्व कलेचे गारुड
शतकाहून अधिक परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्र मंडळात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावत असतात. या कार्यक्रमातून मनोरंजन तर होतेच पण ज्ञान प्रबोधन ही होत असते. अशाच एका मनोज्ञ संगीत कार्यक्रमाच्या वेध घेण्याचा हा एक छोटेखानी प्रयत्न!
गतवारातील एका प्रसन्न सायंकाळी मंडळाच्या सभागृहात दर्दी श्रोतृवृंदाच्या साक्षीने सूरमणी सानियाजी पाटणकर यांनी ‘सूर निनाद ‘ हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम पेश केला.
त्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या आहेत आणि जयपूर घराण्याच्या गायकीचा वारसा चालवतात.
भक्ती संगीतातील अत्यंत लोकप्रिय अशा ‘श्री रामचंद्र कृपालु’ या गोस्वामी तुलसीदासांच्या राम स्तुतीने या अविस्मरणीय सूर संध्येची सुरुवात झाली. यमन रागातील या प्रस्तुती नंतर विरह, प्रीती इत्यादी पैलू सानियाजींनी हळुवारपणे उलगडले. अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी चित्रपट आणि भावगीत यांचे सुरेल सादरीकरण सानियाजींनी केले. त्यांच्याच म्हणण्यानुसार गायकाला ताकदीचे दोन हात असावे लागतात; ते म्हणजे तबला आणि पेटी!
आपल्याच बेंगळूरु शहरातील श्रीयुत अश्विन वालावलकर आणि पुण्याचे श्रीयुत सचिन पावगी तथा सुगंधा उपासनी यांनी क्रमशः पेटी, तबला व तानपुर्यावर सानियाजींची उत्तम साथ दिली.
विशेषतः तराणा या शब्दहीन भावदर्शक गान प्रकारात तथा अभिषेकी बुवांच्या ‘हे सुरानो चंद्र व्हा’ या गाण्यात पावगी आणि वालावलकर यांच्या हातखंड्याचा वारंवार प्रत्यय आला.
‘सूर निनाद’ संध्येची आणखी एक विशेषता अशी की हा केवळ शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम न राहता यामध्ये सानियाजींनी भारतातील अनेक लोक संगीत प्रकार जसे टप्पा, ठुमरी, झुला, बारामासी इत्यादीचेही दर्शन घडवले.
आषाढी वारी निमित्त गायलेला ‘अबीर गुलाल’ हा अभंग तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस गायलेले पंडित भीमसेन जोशी यांचे अजरामर कन्नड भजन ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ केवळ अप्रतिम होते.
सरतेशेवटी लतादीदी आणि पंडित भीमसेन जोशी यांचे ‘बाजे मुरलिया’ चे सादरीकरण आणि त्यातील बारकावे असे होते की ही सूरसंध्या संपूच नये असे वाटत राहिले.
या छोटेखानी संगीत मैफीलीत सानियाजींनी अत्यंत सुंदर अशी गाणी तर सादर केलीच शिवाय श्रोत्यांना अनेक गान प्रकार, भावसंगीत तथा चित्रपट गीतांमध्ये असलेला शास्त्रीय संगीताचा प्रभाव अत्यंत चपखलपणे दाखवून दिला. तसे पाहता गद्याने गाण्याची स्तुती वर्णने याहून अधिक काय ती करावी? हा तो अनुभवाचा विषयु…!
बहुत काय लिहिणे! अगत्य असो द्यावे!