मराठी भाषा गौरव दिन…..
दिनांक २६|०२|२०२३, रविवार ह्या दिवशी महाराष्ट्र मंडळात मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा झाला. विविध वाङमय पुरस्कार प्राप्त आणि ‘विपुलश्री’ या मासिकाच्या संपादक मा. माधुरीताई वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र मंडळाच्या सनविवि ह्या मासिकातर्फे- १२ महिने १२ लेख अशी स्पर्धा ‘साहित्योन्मेष’ ह्या मथळ्याखाली, जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ ह्या काळात घेण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी बेंगळूरु किंवा कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील मराठी प्रेमींनीही उन्मेषाने भाग घेतला. त्या स्पर्धेत दर महिन्यात लेख, कथा, विनोदी लेख, पत्रलेखन, भयकथा असे विविध क्षेत्र हाताळण्याचे दिलेले आव्हान स्वीकारत सर्वच म्हणजे जवळपास पंचवीस स्पर्धकांनी छान प्रतिसाद दिला. मा. माधुरीताई वैद्य यांनी दर महिन्यात अथकपणे ह्या स्पर्धेतील लेखांचे परीक्षण केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ह्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला व विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र मंडळाच्या १०३ वर्षांच्या आयुष्यात मंडळाला विविध प्रकारे मदत करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांचा प्रेरणा पुरस्कार देऊन मानाने गौरव करण्यात आला.
ग्रंथालयाचे शाखाधिकारी व वाचनालय स्वयंसेवक यांचाही मनोभावे सन्मान करण्यात आला.
मंडळाच्या ‘सनविवि’ ह्या मासिकात सातत्याने ‘वनौषधी’ ह्या सदरात लेख दिल्याबद्दल मला पुढे ही लिखाण करण्यास प्रोत्साहीत केले.
मा. माधुरीताई वैद्य यांनी केलेले विश्लेषणात्मक भाषण सुश्राव्य तर होतेच पण प्रेरकही होते. खास मराठमोळ्या जेवणाने ह्या सुनियोजित, सुसंबद्ध, सुसंचालीत, सुरेख व सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
सौ. स्मिता बर्वे, सौ. राधिका मराठे व सौ. रेवती कुलकर्णी ह्या सनविविच्या संपादक चमूचे मनःपूर्वक अभिनंदन.
सौ. विद्या चिडले.
________________________________________________________________________
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
गेले वर्षभर साहित्यप्रेमींसाठी मंडळाने चालवलेला ‘साहित्योन्मेष’ हा स्तुत्य उपक्रम; त्याची सांगता रविवारी-
मराठी गौरव दिनाला साजरी केली हे अगदी भावलं!
त्या दिवशी मंडळाच्या वाचनालयासाठी मनःपूर्वक झटणाऱ्यांचा सन्मान केला, मंडळाला आपलं समजून सर्व कामांना पुढे सरसावणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना ‘प्रेरणा पुरस्कार’ दिले हे ही यथार्थ वाटलं.
त्या एकाच दिवशी एकात एक असे तीन कार्यक्रम गुंफले होते, तरी रांगोळीपासून भेटवस्तू-अगदी जेवणापर्यन्त अनेकविध गोष्टी मोठ्या कल्पकतेने आखल्या होत्या, निगुतीने काटेकोरपणे अंमलात आणल्या होत्या हे वाखाणण्याजोगे वाटलं.
कार्यक्रम असेच नेटके सादर होत राहिले, तर आपलं मंडळ सहजी आणखी विस्तारेल, लोकप्रिय होईल हे निश्चित!
लोभ आहे तो वाढावा.
आपली,
अनुराधा चौगुले
________________________________________________________________________
नमस्कार,
प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम खरोखरच स्तुत्य होता. कार्यक्रम अतिशय हृद्य, सुविहित,अन् नेटका झाला.
सनविविच्या रोपट्याचा राधिका मराठे, रेवती कुलकर्णी,स्मिता बर्वे, यांनी अल्पावधीतच डेरेदार वृक्ष करून महाराष्ट्रदूर पसरविला. कौतुक करावे तितके कमीच आहे. आता यानंतर बृहन्महाराष्ट्रातील मंडळांच्या सभासदांसाठी एखादी स्पर्धा आयोजित करायला हरकत नाही. अमेरिकेत तेथील मराठी मंडळांचे ” एकता” नावाने एक असेच मासिक आहे. सनविवि भारतातील मंडळाचे होवो.
धन्यवाद
धनंजय चौगुले
________________________________________________________________________
प्रेरणा पुरस्कार अभिप्राय
शीला चंद्रशेखर चाफेकर
प्रेरणा पुरस्कार समारंभ छान झाला. प्रेरणा पुरस्कार हे नाव खूप छान सुचलं. माणिक ताईंना मनापासून धन्यवाद.
प्रेरणा पुरस्काराचे मानपत्र विशेष लक्षात राहील असे झाले आहे. मानपत्राचे सुलेखन खूपच छान केले आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!
सभागृहाचे डेकोरेशन, रांगोळी आवडले. माधुरी वैद्य यांचे भाषण छान झाले. सनविवि अंक चांगला झाला आहे. संपादक मंडळाने छान काम केले आहे. सगळा समारंभ खूपच छान झाला, फोटो आवडले. तुम्हा सर्व कमिटीचे मनापासून आभार!!
शीला चंद्रशेखर चाफेकर.
________________________________________________________________________
प्रेरणा पुरस्कार अभिप्राय
जयश्री अमृते
प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात मी सहभागी होऊ शकले नाही. परंतु फोटो पाहिल्यावर समाधान वाटले. समारंभ छान झाला असणार असे दिसून येत आहे. मी कार्यक्रम मिस केला. इतर मैत्रिणींकडून सर्व वर्णन ऐकले. कमिटीला धन्यवाद!!
