एक मार्चला दुपारी चार वाजता महाराष्ट्र मंडळाने “यात्रा”, नावाचा दीर्घांक आयोजित केला होता. दीड तास प्रेक्षकांना खेळवून टाकणारा हा प्रयोग होता.
अप्रतिम दिग्दर्शन, अभिनय, साजेस आणि अचूक वेळ पाळणारे संगीत याला तोड नाही. यात्राचे वैशिष्ट्य म्हणजे ( कमीत कमी) नेपथ्याच्या माध्यमातून लेखकाने आणि दिग्दर्शकाने त्यांची संकल्पना, संदेश आणि आणि दीर्घांकाचा गाभा मांडला. अप्रतिम दिग्दर्शन आणि अभिनय. महाराष्ट्र मंडळ मंडळाने इतका सुंदर इतकी सुंदर कलाकृती आमच्या सर्वांपर्यंत आणली . त्यासाठी महाराष्ट्र मंडळाचे मनापासून आभार
सौ. मंजिरी मसलेकर
*****************************
‘हक्काचा कलामंच’ या कार्यक्रमात मला माझी ‘विचारधारा’ ही स्वरचित कविता सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
सर्वांचे सादरीकरण छान झाले. तुम्हा आयोजकांनीही ‘जरा विसावू या विरामावर’ सादर करून विरामचिन्हांचे महत्त्व योग्यरित्या अधोरेखित केले. ‘बुकमार्क’ सोबतच महाराष्ट्र मंडळाचे प्रमाणपत्र मिळायला हवे होते, अशी बाहेर चर्चा होती.
बाकी, व्यासपीठावर मोडी ते आताची मुळाक्षरे चपखल होती. एकूणच, रंगसंगतीसुद्धा लोभस होती.
राकेश शेटे
**********************************************
महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु मराठी भाषक सामाजिक संस्था बेंगळूरु येथे गेल्या १०५ वर्षांपासून कार्यरत आहे.
एक मार्च २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु आयोजित प्रसिद्ध लेखिका मुक्ता बाम लिखित आणि दिग्दर्शित *यात्रा* या नावाजलेल्या दीर्घाकांचे सादरीकरण अप्रतिम झाले.
हा कार्यक्रम अतिशय कलात्मक आणि वैविध्यपूर्ण होता. अशा दर्जेदार कार्यक्रमाचा बेंगळूरु येथे आस्वाद घेता आला. त्यानंतर स न वि वि विशेष लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले . स्पर्धेत दिलेले लेखन विषय अतिशय सुंदर होते.
तिसऱ्या सत्रात हक्काचा कलामंच या कार्यक्रमात सर्व स्थानिक कलाकारांनी आपपले स्वलिखित व स्वरचित लेख, कथा, कविता, गझल, भारूड याचे अभिवाचन सादर केले. काहीनी सुप्रसिद्ध लेखक व कवी यांच्या लेखनाचे आणि कवितेचे अभिवाचन सादर केले. कार्यक्रम अत्यंत नीटनेटका भरपूर माहितीने परिपूर्ण असा झाला .
साहित्य विषयाची व्याप्ती प्रचंड असूनही तीन तासात सुनियोजित पद्धतीने सर्व कलाकारांना अभिवाचन करण्याची संधी देण्यात आली, त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु यांचे मी आभार मानते.
स्मिताताई व राधिकाताई यांचे विशेष आभार त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे आभार मानते. महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु त्यांचे सभासद आणि इतर स्थानिक कलाकारांचा या कार्यक्रमात सहभाग होता. प्रत्येक क्षणी वेगवेगळे अभिवाचन सादर होत होते आणि ऐकण्यासाठी उत्कंठा वाढत होती. सर्व आयोजक महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचे मी आभार मानते. सर्व रसिक श्रोते प्रेक्षक, सर्व कलाकार, सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद . मंचावरील तीनही सत्रातील सजावट अतिशय सुंदर होती. या सजावटीमुळे एका वेगळ्याच विश्वात असल्याचे भासत होते. साहित्य विषयाची व्याप्ती किती विशाल आहे याची ही जाणीव सजावट करून देत होती. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, नीटनेटका आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.
विभावरी मण्णूर
सभासद महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु
**********************************************
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरु आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट झाला. मी गेल्या दीड वर्षांपासून बेंगळूरुमध्ये राहत आहे. येथे मराठी भाषेत संवाद साधता आला, यामुळे मला खूप आनंद झाला. या निमित्ताने मंडळाबद्दल अधिक माहिती मिळाली. महाराष्ट्रात अनेक वर्षे राहूनसुद्धा इतका उत्कृष्ट कार्यक्रम पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती. कार्यक्रमाची सुरुवात ‘यात्रा’ या दीर्घांकांने झाली. विविध एकांकिका आणि स्पर्धा पाहण्याची व अनुभवण्याची संधी मिळाली. उत्कृष्ट लेखन आणि प्रभावी अभिनय यांची सुंदर सांगड घालणारा हा कार्यक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे नेपथ्यही अत्यंत सुंदर आणि आकर्षक होते. आम्हाला असा आनंददायी अनुभव दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे मनःपूर्वक आभार.
लेख स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही अत्यंत छान पार पडला. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अशा अनेक स्पर्धांची आम्ही भविष्यातही आतुरतेने वाट पाहत आहोत. या कार्यक्रमाच्या अभिवाचनाचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. राधिका मराठे आणि स्मिता बर्वे यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. व्यासपीठ, सभागृह आणि कलावंतांचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट होते.
माझ्यासाठी मात्र कार्यक्रमाचा खरा उच्चबिंदू म्हणजे ‘आजीसाठीचे भारूड’. मध्यंतरामध्ये मंडळातील सदस्यांना भेटल्यावर मला अगदी माझ्या माहेरी आल्यासारखे वाटले.
माहेर यासाठी की, खूपच उत्तम खाद्यपदार्थ घरच्या चवीने दरवळत होते — मिसळ, भेळ, ढोकळा, चकली… अहाहा! खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची व्यवस्था अतिशय उत्तम होती. स. न. वि. वि. चे अंक आमच्यासाठी उपलब्ध होते. महाराष्ट्राच्या लेकीला यापेक्षा अजून काय हवे?
महाराष्ट्र मंडळाने अशीच भरभराट करत १०५ वर्षे पूर्ण केली आहेत, ही मनापासून आनंदाची गोष्ट. हे मंडळ पुढेही असंच कार्यरत राहो. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत सांगायचं तर — १०,००० वर्षे हे कार्य असंच चालू राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
— अस्मिता बोरकर-पोखरकर
