संवाद

सप्रेम नमस्कार

गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा.

       हक्काचा कलामंच हा मंडळाचा उपक्रम आता चांगले बाळसे धरू लागला आहे. ह्या मालिकेतील तिसरे पुष्प – अभिवाचन 1मार्च रोजी सादर झाले. स न वि वि तर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. भारताच्या विविध भागातून स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुची कीर्ती चौफेर पसरली आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. लेखन स्पर्धेचा निकाल, ‘यात्रा’ या मुक्ता बाम लिखित दीर्घांकाचा प्रयोग आणि अभिवाचन असा भरगच्च कार्यक्रम १ मार्चच्या संध्याकाळी मंडळाच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाबद्दलचा अभिप्राय तुम्हाला ह्या अंकात वाचायला मिळेल. तसेच ह्या स्पर्धेतील पहिले  तीन विजेते लेख तुम्हाला ह्या अंकात वाचायला मिळतील .

       सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थापक दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने संध्याकाळी ५  वाजता श्री सत्यनारायणाची पूजा करणार आहोत. ह्या वर्षीच्या अभिमान पुरस्काराचे मानकरी आहेत, श्री. मिलिंद देशपांडे आणि  योगदान पुरस्काराचे मानकरी आहेत, श्री. अप्पण्णा सरदेशपांडे. हा कार्यक्रम २९ मार्च रोजी मंडळाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

८ मार्च, जागतिक महिला दिन; म्हणून मार्चचा हा अंक महिला विशेष आहे.  त्याच बरोबर पुस्तक परिचय, धांडोळा ही नेहमीची सदरे आहेत.

       मराठी भाषा गौरव दिन लेखन स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाचे लेख अंकात समाविष्ट आहेत. बाकीचे लेख मंडळाच्या वेबसाईटवर लवकरच पोस्ट करण्यात येणार आहेत. ह्या महिन्यापासून ‘यशोगाथा’ हे नवीन सदर सुरू करत आहोत. बेंगळूरुस्थित वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख ह्या सदरात करून देण्यात येणार आहे.

स न वि वि डिजिटल झाल्यामुळे त्याचा आवाका वाढला आहे. प्रत्येक महिन्याला उत्तम अंक देण्याचा संपादक मंडळाचा प्रयत्न असतो. आमच्या प्रयत्नाला तुमच्या सूचना, कल्पना यांची जोड आवश्यक आहे. तुमच्या मेलची वाट पाहात आहोत.  नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा

लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा

स्मिता बर्वे

स न वि वि

संपादक मंडळ.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *