सनविवि कथा,साहित्योन्मेष अरे संसार संसार…

अरे संसार संसार…

–स्वप्नील विलास अमृतकर —

दुपारची वेळ होती. विठ्ठल मंदिरातील भजनाचा कार्यक्रम आटोपून अरुंधती नुकतीच घरी परतली होती. संध्या प्रहराची वेळ होत आली होती. अरुंधतीने स्वतःसाठी चहा बनवला आणि नेहमीप्रमाणे गरमा गरम वाफाळणाऱ्या चहाचा कप हातात घेऊन ती ओसरीत असलेल्या बंगळीवर येऊन बसली.बंगळीवर हळूहळू झूलत थंडगार हवेची झूळूक अंगावर घेत, चहाचे फुरके ओढत ती त्याचा आस्वाद घेत होती. ओसरीच्या बाहेरील अंगणात अरुंधतीने खूप सुंदर अशी बाग सजवली होती. त्या बागेत विविध फुलांसोबत बरीच फळांचीही झाडे तिने लावली होती.

अरुंधतीला झाडांची काळजी घ्यायला खूप आवडत असे व त्यात तिचे मनही रमत असे. त्या बागेकडे न्याहाळत असताना अरुंधतीचे लक्ष अचानक आंब्याच्या झाडाकडे गेले. त्या आंब्याच्या झाडावर एक चिमणा-चिमणी सुंदर असे घरटे बांधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते दोघेही मिळून एक -एक करुन गवताच्या वाळलेल्या काड्या, पालापाचोळा जमवत होते. हळू हळू त्यांची आरास करत होते. घरटे बांधण्यासाठी ते जीवाची पराकाष्ठा करत होते. त्या पक्ष्यांची हालचाल पाहणे हा अरुंधतीचा नेम झाला होता.

बघता- बघता अवघ्या ४-५ दिवसात त्या पक्ष्यांनी खूप मेहनतीने एक सुंदर असे घरटे बांधले. ते घरटे बांधत असतांनाची त्या चिमणा-चिमणीची होत असलेली धडपड अरुंधती खूप जवळून पाहत होती. बहुतेक त्या घरट्यात चिमणीने तिची अंडी घातली असावीत, असा अंदाज अरुंधतीने बांधला. रोज तो चिमणा थोड्या-थोड्या वेळाने घरट्या बाहेर पडून मिळेल ते चोचेत टिपून घरट्याकडे परत येऊन चिमणीला देत होता. चिमणी आपली घरट्यात बसून बहुतेक घातलेल्या अंड्यांची काळजी घेत होती. ह्या सगळ्या गोष्टी अरुंधती खूप उत्सुकतेने बघत होती.

एके दिवशी रोजच्याप्रमाणे अरुंधती चहा घेत ओसरीतील बंगळीवर बसली होती. अचानक तिच्या कानावर कसला तरी मंजुळ आवाज पडला. त्या आवाजाच्या दिशेने तिने कानोसा घेतला असता, तो आवाज त्या आंब्याच्या झाडाकडून येत असल्याचे तिला जाणवले. तिने जो अंदाज बांधला होता तो खरा ठरला होता. त्या घरट्यात चिमणीच्या पिलांचा जन्म झाला होता आणि तो आवाज चिवचिव करणाऱ्या त्या पिलांचाच होता.

दिवसा मागून दिवस जात होते. सकाळ-संध्याकाळ अरुंधती त्या घरट्याकडे टक लावून बसलेली असायची. ते चिमणा-चिमणी आपल्या पिलांसाठी दाणे वेचून आणत आणि प्रेमाने त्यांना भरवत असे. चिमणा जणू एखाद्या पहारेकऱ्यासारखा त्या घरट्यावर नजर ठेवत होता. आपल्या पिलांचे रक्षण करत होता. अरुंधती रोज न चुकता त्यांच्यासाठी ओसरीतील व्हरांड्यात दाणे टाकायची. आपल्याला इथे सहजपणे दाणे मिळतात म्हणून ते चिमणा-चिमणीही न चुकता तिथून दाणे टिपून घेत व आपल्या पिलांना प्रेमाने भरवत असत. त्यानंतर चिमणा-चिमणीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असे समाधान येत असे. ते पाहून अरुंधतीही मनोमन सुखावत असे. काही दिवसानंतर त्या घरट्यातील चिमणी आपल्या पिलांना बाहेर काढू लागली, हळूहळू घरट्याच्या कडेवर आणू लागली होती. जणू ती तिच्या पिलांना उडण्यासाठी आत्मविश्वास संपादन करत होती, त्यांना उडण्याचे बळ देत होती. हळूहळू ती पिलेही पंखाची फडफड करत, चिवचिव करत उडण्याचा प्रयत्न करत होती, धडपड करत पुन्हा त्या घरट्यात पडत होती.

एक दिवस अचानक त्या घरट्याकडे पाहून अरुंधती जरा दचकली. त्या घरट्यातील चिमणी जरा विचित्र वागत असल्याचे तिला दिसले. त्या चिमणीने जणू आज मनाशी चंग बांधला होता की, आज पिलांनी आकाशात उडायला हवे, त्यांच्या मनातील उडण्याची भीती ही जायला हवी यासाठी ती चिमणी तिच्या पिलांना चोचीने टोचे मारत घरट्यातून बाहेर ढकलत होती. त्यामुळे घरट्यातून बाहेर पडत असतानाच पिलांनी पंख जोरात फडकवले आणि आकाशात झेप घेतली. त्यांच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळाली आणि स्वछंद आकाश विहार ते करू लागले. परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाल्यावर विद्यार्थ्याला जसा आनंद होतो तोच आनंद त्या पिलांनाही झाला होता. जणू आज तेही परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले होते. पिले थोड्या वेळाने चिवचिव करत पुन्हा घरट्यात परतले. जोरात येऊन चिमणीला बिलगले. चिमणीही खूप खुश वाटत होती. काही दिवसानंतर ती पिले मोठी झाली आणि आकाशात उंच उडू लागली. उडता-उडता ती कधी त्या घरट्यापासून दूर गेली हे कळलेच नाही. ते चिमणा-चिमणी मात्र तिथेच त्या पिलांना शोधत राहिली. कधीतरी आपली पिले वाट चुकून घरी परत येतील या आशेवर ते तिथेच थांबले.

अरुंधतीला हा सर्व प्रकार लक्षात आला. तिच्या डोळ्यासमोर सतत ती कासावीस झालेली चिमणी येत होती. खूप एकटी पडली होती ती. का कुणास ठाऊक पण आज त्या चिमणीची अवस्था पाहून अरुंधतीला खूप अस्वस्थ आणि बेचैन वाटत होते. तिचे लक्ष कशातच लागत नव्हते. ओसरीतील बंगळीवर अशीच ती निचपत पडून होती. कुठल्यातरी विचारांच्या तंद्रित ती गुरफटली होती. नकळत ती त्या विचारात स्वतःला त्या चिमणीच्या रूपात पाहत होती. एकेकाळी अगदी त्या चिमणा-चिमणी प्रमाणे अरुंधतीचाही संसार होता. भरलेलं घर होत. त्या चिमणा-चिमणी प्रमाणे अरुंधती आणि तिचे पती सुरेशरावांनीही त्यांचा संसार फुलवण्यासाठी खूप जीवाची पराकाष्ठा केली होती.

सुरेशराव हे टॅक्सी चालवण्याचं काम करत होते. खूप कष्टाने त्यांनीही त्यांचे घर बांधले होते त्या झाडावरील घरट्याप्रमाणे. अरुंधतीनेही अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली होती. घरातील कामांबरोबर ती शिवणकाम करुन घराला हातभार लावत होती. रात्रंदिवस दोघेही मेहनत करुन, काबाडकष्ट करुन घर चालवत होते. अरुंधतीला दोन मुले होती. एक मुलगा राज आणि एक मुलगी अवनी. अरुंधती आणि सुरेशरावांनी खूप मेहनत करून आपल्या मुलांना शिकविले. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून ते रात्रंदिवस झटत होते. सुरेशराव मिळेल ती वर्दी घेत असत. कधीही त्यांनी रात्र – दिवस याचा विचार केला नाही. भूक, तहान विसरून त्यांनी मुलांसाठी जीवाचे रान केले होते. बऱ्याचवेळा ते उपाशीही राहिले होते. अरुंधतीनेही रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करुन डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांची काळजी घेतली होती. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून दोघांनी स्वतःच्या आवडी- निवडी बाजूला ठेवून त्यांना उत्तम शिक्षण दिले होते.

उत्तम शिक्षणाच्या जोरावर आज अवनी बँकेत तर राज एका मोठया कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. योग्यवेळी अरुंधती आणि सुरेशरावांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्न लावून दिली होती. खूप मोठया जबाबदारीतून आता आपण मुक्त झालो आहोत. आता आपण एकमेकांना वेळ देऊ शकू या विचाराने अरुंधती आणि सुरेशराव खूप खुश होते. परंतु देवाला त्यांची ही खुशी फार दिवस सहन नाही झाली. वर्षभराच्या आत एका अपघातात सुरेशरावांचा मृत्यू झाला. या नकळत आलेल्या संकटामुळे आणि सुरेशरावांच्या अचानक जाण्याने अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती त्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकत नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर राजने अरुंधतीला आपल्या जवळ राहायला नेले. वर्षभरात राजला मुलगा झाला. नातूबरोबर खेळण्यात, त्याची काळजी घेण्यात अरुंधतीला आपल्या दुःखाचा विसर पडू लागला होता. राज आणि त्याची बायको दोन्ही नोकरी करत होते. इकडे अरुंधती घराची व बाळाची काळजी घेत होती. बघता – बघता बाळ वर्षाचे झाले होते. अरुंधतीच्या सुनेला आता अरुंधतीचे त्यांच्यासोबत राहणे खटकायला लागले होते. मुद्दाम ती अरुंधतीला त्रास देऊ लागली, टाकून बोलू लागली, भांडू लागली होती. राजने अरुंधतीची काळजी केलेलीही तिला आवडत नसे. राजमागे तगादा लावून तिने अरुंधतीला गावी पाठवून दिले. सुरेशरावांच्या जाण्याच्या दुःखातून आता कुठे बाहेर पडत असतानाच सुनेच्या अश्या वागण्याने अरुंधती पुन्हा खूप दुःखी झाली होती. अगदी एकटी पडली होती ती. जीवापाड एकमेकांवर प्रेम करणाऱ्या माय लेकराला तिच्या सुनेने दूर केले होते. राजने आपल्या बायकोपुढे हात टेकले होते. त्याचा नाईलाज झाला होता. तोही आतून तिळतिळ तुटत होता. अरुंधती बरोबर त्याचे बोलनेही होत नव्हते जवळजवळ त्यांच्यातील संपर्कच तुटला होता. अधून मधून अवनी अरुंधतीला भेटून जात होती. अरुंधतीने या सर्व गोष्टी खूप मोठ्या मनाने स्वीकारल्या होत्या आणि स्वतःच्या एकाकीपणाला तिने आपला सोबती केला होता.

आज पुन्हा एकदा ह्या सर्व गोष्टी अरुंधतीच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. एकाकीपणाच्या जाणीवेने नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. जशी त्या चिमणीची पिले तिच्या घरट्यातून उडाली होती तशीच अरुंधतीची पिले तिच्या घरट्यातून दूर गेली. ती देखील वेड्या आशेवर जगत होती की एक दिवस तिची मुले परत घरी येतील अगदी त्या चिमणीप्रमाणे.. ह्या विचारांच्या गर्दीत असताना पुन्हा एकदा अरुंधतीच्या कानावर चिवचिव आवाज पडला. त्या आवाजाने ती एकदम भानावर आली. बघते तर काय.. समोर तीच चिमणी चिवचिव करत होती जणू ती चिमणी अरुंधतीला सांगत होती की, तुझे आणि माझे दुःख सारखेच आहे. आपण दोघी मिळून यातून बाहेर पडूयात. चिमणीचे बोलणे जणू अरुंधतीला समजले आणि ती चटकन आत गेली त्या चिमणीसाठी दाणे आणायला.. अरुंधती चिमणीला पुटपुटली ‘ अरे संसार संसार..’ मग तो तुझा असो की माझा सारखाच..ह्याच विचारात असतांना तिने त्या चिमणीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघितले आणि एक नवीन उमेद तिच्या मनात जागृत झाली. असच दुःख करत न बसता आयुष्य नव्याने आपण जगू शकतो.

अरुंधतीच्या मनात विचारांचे चक्र सुरु झाले, आज माझ्यासारख्या अनेक स्रिया अनेक कुटुंबात पाहायला मिळतात. एक तर त्या एकट्या असतात आपल्याच घरात किंवा असतात वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात. बऱ्याच स्रिया तर भरल्या कुटुंबातील असूनही परिस्थितीने हतबल होऊन नाईलाजाने त्यांना फुटपाथवर रहावे लागते, दारोदारी, रस्त्यावर भीक मागावी लागते. बरेच मुले आपल्या आई वडिलांना घरातून हाकलून देताना दिसतात. एक सुन आपल्या सासूबरोबर इतकी दुष्ट कशी वागू शकते? इतका अन्याय, अत्याचार कशी करू शकते? एक मुलगा आपल्या आई वडिलांना त्यांच्याच घरातून कसा घालवू शकतो? या सर्व गोष्टी काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. आजकाल या गोष्टी सर्रास होतांना दिसतात. त्यामुळे वृद्धाश्रमांची, अनाथाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत जात आहे. बदलत्या काळानुसार आणि विज्ञानाने केलेल्या प्रगतीने माणूस इतका बदलला की त्याच्यातील संवेदनशीलता, माणुसकी जणू नष्ट होत चालली आहे. किती सहजपणे आजची तरुण पिढी आपल्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या कष्टांना विसरतात. गळतीला आलेल्या पानासारखी अवस्था असलेल्या आई वडिलांना जीवापाड जपण्याऐवजी जिवंतपणी मरण यातना देतांना दिसतात. फार काही आवाजवी अपेक्षा नसतात त्यांच्या.. फक्त दोन शब्द प्रेमाचे हवे असतात त्यांना त्यांचे उरलेले दिवस घालवायला. पिकलेल्या पानासारखी अवस्था असते त्यांची. पान जसं ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करून जीर्ण झालेलं असत, कधी गळून पडेल याची शास्वती नसते. तसंच वृद्ध आई वडिलही खूप थकलेले असतात, मनाने खूप हळवे झालेले असतात. कधी काय होईल याची शाश्वती नसते. अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे अवस्था असते त्यांची. आपल्या लहानपणी आपल्याला सांभाळणारे आज त्या अवस्थेत असतांना त्यांना सांभाळायचे, जपायचे की त्यांना दूर लोटायचे याचा विचार आजची तरुण पिढी अजिबात करत नाही. कारण शेवटी.. अरे संसार संसार… या संसाराचे चक्र गोलाकार आहे. त्यामुळे ही अवस्था त्यांचीही होऊ शकते हे त्यांनी विसरता कामा नये. 

अरुंधती या विचारातून भानावर आली. एक विश्वास आणि उमेद तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिने मनोमन ठरवले की उरलेले आयुष्य असच दुःख करत न बसता माझ्या सारख्या इतर लोकांचा आधार व्हावं. त्यासाठी तिने आपल्या कष्टाने उभारलेल्या घरात तिच्या काही सखींना सोबत घेऊन एक छोटेसे “माय-सदन” नावाने वृद्धाश्रम सुरु केले. 

आजही अरुंधती आणि ती चिमणी ओसरीत मनमोकळ्या गप्पा करत असतात. त्या चिमणी कडून अरुंधतीला जीवनाचा एक नवा मार्ग गवसला.

1 thought on “अरे संसार संसार…”

  1. This concept of Sahityonmesh is really commendable ! So many Participants have posted various Articles and Stories -unforgettable ! A Million Thanks for the organizers of this exemplary effort to enhance the Value of Marathi Literature !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *