सनविवि माहितीपूर्ण लेख,साहित्योन्मेष  ‘कुतूहल’पक्षी जगताचे…..

 ‘कुतूहल’पक्षी जगताचे…..

  –उज्वला तायडे–

   आमच्याकडे बाराही महिने पहाट ही पक्ष्यांच्या किलकीलाटानेच होते,पहाटेची वेळ म्हणजे पक्ष्यांची चाहूल लागण्याची वेळ. चिवचिव, कूजन, कुजबूज किंवा कोकीळेची कुहु कुहु कानावर पडले म्हणजे पहाट झाली, असे नक्की. मग कोंबड्याचे आरवणे हेही त्यात आलेच. हे नसेल तर ती पहाट तरी कसली ?

  भरपूर पक्षी अंगणात असलेल्या  तुतीच्या (mulberry) झाडावर येतात. पक्ष्यांसाठी माझ्या शाश्वत ने  खास बर्ड फीडर  झाडाला लटकवून ठेवले. त्यामध्ये पक्ष्यांच्या आवडीचे ज्वारी, बाजरी, तांदूळ, बार्ली  दाणे टाकतो आम्ही नियमितपणे. शिवाय भाजलेल्या मातीचे भांडसुद्धा थंड पाणी पिण्यासाठी ठेवले आहे.

नियमितपणे येणाऱ्या पक्ष्यांच्या सवयीचे निरीक्षण करून शाश्वत  पक्ष्यांसाठी भुईमुगाच्या शेंगा फोलपटास  कट भिजवून दोऱ्याने खिडकीबाहेर, आणि झाडावर टांगतो त्या खाण्यासही पक्षी येतात.शिवाय दाणे जर आजूबाजूला विखरून ठेवले की खारुताई कायमस्वरूपी  मुक्कामाला असते झाडावर.

दाणे टिपणाऱ्या राखडी चिमण्या, गाणे गाणारा बुलबुल,  टोपी घातल्या सारखा वाटणारा लांब शेपटी असलेला बुलबुल,काळा कुट्ट कावळा, कोकीळ पक्ष्यांचे जोडपे(मादी कोकीळ  राखाडी ठिपके असलेली, नर कोकीळ काळा गाणे गाणारा) , हमिंग बर्ड, लालसर तपकिरी भारद्वाज यांसारखी रंगांची रेलचेल  असलेले पक्षी दररोज हजेरी लावतात, नुसते क्वचितच दिसणारा पोपट, यांचे रंग बघत राहिले तरी डोळे दिपून जातात. असे रंग इतर प्राण्यात क्वचितच पाहायला मिळतात.

  उडणारे पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे पक्षी. पिसे असणारा पक्षी हा एकमेव प्राणी आहे.मात्र उडणारे कीटक हे पक्षी नव्हेत. पंख आणि शरीरावरील कडक पिसांपासून ते शरीराचे तापमान उबदार ठेवणाऱ्या मऊ पिसांपर्यंत अनेक प्रकारची पिसे त्यांच्या शरीरावर असतात. पिसांमुळे पक्ष्यांच्या नाजूक त्वचेचे रक्षण होऊन शरीर उबदार व कोरडे राहण्यास मदत होते.काहींच्या तर सुरेख रंगीबेरंगी तुरे व शेपट्याही असतात.

सर्वच पक्ष्यांना पंख असतात,अगदी शहामृग, पेंग्विनआणि इतर उडू न शकणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा पंख असतात. पंखांचा उपयोग निश्चितच हवेत उडण्यासाठी होतो. पक्ष्यांच्या शरीरातील बहुतांशी हाडे संपूर्णपनणे पोकळ असतात. त्यामुळे हलकेपणा येतो.

 सर्व पक्षी अंडी घालतात आणि बहुतेक पक्षी त्यांची अंडी उबवितात किंवा शरीराच्या उबेने त्यांचे तापमान राखतात .काही बोजड असल्याने फारसे उडू शकत नाहीत. काही प्रचंड वेगाने उडतात, खूप उंच जाऊ शकतात, कित्येक मैलांचा सलग टप्पा गाठतात, तर काही पाण्याखाली खूप खोल मुसंडी मारून पुन्हा सहज वर येतात. अल्बॅट्राॅसचे विशाल म्हणजे तेरा फुटी पंख, शहामृगांचे प्रचंड आकार व शंभर किलोच्या आसपासचे वजन, स्वान वा राजहंसांची सात आठ किलोमीटरची उंची गाठून उडण्याची क्षमता, तर ‘पेंग्विन’ची पाण्याखाली सात आठशे फूट खोल मुसंडी मारण्याची क्षमता माणसाला अवाक् करून सोडते. कबुतरांचा वापर तर संदेशवहनासाठी मानवाने कल्पकतेने करून घेतलाच आहे. कुठूनही सोडले, तरी कबुतर मूळ जागीच परतते, हा संदेशवहनातील गाभा आहे.आहे की नाही कुतूहल पक्षी जगताचे.

पक्ष्यांना अभक्ष्य असे  काहीच नाही. मासे आवडीने खाल्ले जातात, त्यासाठी तासन् तास पाण्यात बकध्यान धरण्याची सोय उंच पाय देऊन निसर्गानेच केली आहे. गरुड व घारी पायात पाहिजे ते भक्ष्य अलगद उचलून घेतात व धारदार चोचीने त्याचा फडशा पाडतात. मग एखादा लहानसा प्राणीही त्यांना त्यासाठी चालतो. गिधाडे मृत जनावरांवर ताव मारतात. अनेक पक्षी छोटे किडे, व पानांचे तुरे, फळे, पाने यांवर पोट भरतात. फक्त धान्य खाऊन राहणारे पक्षी जसे आहेत, तसे फक्त फळांच्या बिया फोडून त्यांतील घर खाणारे क्रॉसबीलसारखे पक्षीही आहेत. उडणारे भक्ष्य गट्टम करणारेही काही नेमबाज आहेत, तर आपल्या लांबचलांब चोचीने चिखल व माती उकरून भक्ष्य धुंडाळणारेही आहेत. प्रत्येक पक्ष्याची चोच ही त्याच्या खाण्याच्या सवयीप्रमाणे सोयीची बनली आहे. डोळ्यांची क्षमता व नजरेची फेक त्याच्या सवयीप्रमाणे वाढली आहे. घारीची वा गरुडाची नजर चक्क हजार मीटर उंचीवरून पुस्तकातील मजकूर वाचण्याएवढी तीक्ष्ण असू शकते. याचाच उपयोग त्यांना भक्ष्य शोधण्यासाठी होतो.

 पक्ष्यांची शरीररचना उडण्याच्या दृष्टीनेच झालेली आहे. पुरातन काळातील सरपटणाऱ्या प्राण्यांपासून यांची उत्क्रांती होत गेली. मूळचे गरम रक्ताचे हे सजीव. पंखांची रचना, फुप्फुसांची ताकद व हवेच्या झोतावर आरूढ होण्याची उपजत युक्ती यांचा एकत्रित वापर पक्षीजमात करत असते. स्थिर राहणे, घिरट्या घालणे, झपाट्याने पंखांची हालचाल करत वा अजिबात हालचाल न करता तरंगणे, अचानक उलटी सुरकांडी मारणे ही निरनिराळी वैशिष्टय़े विविध जाती दाखवतात. पक्ष्यांच्या पिसांना खूप ऊब असते. . पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक रचना पंखांमध्ये असतेच. 

अंटार्टिकावर फक्त पेंग्विन आढळतात; पण अन्यत्र मात्र सर्व पक्षी आहेतच. हवामानानुसार, भक्षाच्या व खाद्याच्या उपलब्धतेनुसार त्यांना भ्रमण करावेच लागते. या  मायग्रेशनची अंतरे अनेकदा काही हजार किलोमीटरमध्ये भरतात. सैबेरियातील क्रौंच पंधरा हजार किलोमीटरवर भारतात येतात, तर समुद्रपक्षी पंचवीस हजार कि.मीपर्यंत भराऱ्या मारत पुन्हा मूळ जागी परततात.

बहुतेक पक्ष्यांचे डोळे चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला असतात. दोन्ही डोळ्यांनी स्वतंत्रपणे पाहू शकत असल्याने त्यांना एकाच वेळेस दोन वेगळ्या प्रतिमा दिसतात. घुबडासारख्या काही पक्ष्यांचे डोळे चेहऱ्याच्या पुढील भागात असतात.

काही पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी सुंदर स्वर लावन्यात पटाईत आहेत उदा. कोकीळ(नर) पक्षी पंचम स्वर लावण्यात पटाईत आहे.काही जण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्या बांधवांना माहिती देण्यासाठी आवाज करतात.

पक्ष्यांची दृष्टी व आवाज संवेदना खूप तीव्र असतात,परंतु त्यांचे वासाचे ज्ञान मात्र फारसे विकसित झालेले नसते. बहुतेक पक्ष्यांचे डोळे त्यांच्या शरीराच्या मनाने मोठे असतात. त्यामुळे ते जवळच्या आणि दूरवरच्या वस्तूंवर नजर स्थिरावू शकतात. पक्षी आपल्या तीक्ष्ण नजरेचा अन्न मिळवण्यासाठी आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग करतात.

संत जनाबाईंनी काही ओळी पण लिहिल्या आहेत ह्या पक्ष्यांवर,

पक्षी जाय दिगंतरा |बाळकांसी आणि चारा|

घार हिंडते आकाशी|झाप घाली पिलांपासी|

माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी|

आमच्याकडे  माझा शाश्वत लहान असताना बुलबुल पक्षाने झाडांच्या पानांमध्ये त्याचं घरट केलं होतं, सारखी ती पक्षीण बाहेर जायची आणि पिल्लांसाठी काहीतरी खायला आणून चोचीत भरवायची. खूप रडवेला व्हायचा शाश्वत तेव्हा त्यांना बघून, म्हणायचा तू तरी गाडीवर जाते कामावर, आणि माझेकडे आजी असते.ह्यांना तर कुणीच नाही ग,असा प्रश्न करायचा.

त्याला कसं सांगायचं तेव्हा माझीही अवस्था काही त्या पक्षिणीपेक्षा वेगळी नव्हती.

काही पक्षी तर स्वर्गीय नर्तकच असतात.

मोर प्रजननासाठी लांडोरीला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून बसतो. पिसाऱ्याच्या आकारावरून स्वतःची प्रजनन क्षमता सिध्द करतो.

स्वर्गीय नर्तक जंगलात आढळणारा पक्षी आहे. या पक्ष्याच्या नराला लांब शेपूट येते त्यामुळे तो अतिशय सुरेख दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो . नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. 

पक्ष्यांचे कान म्हणजे पिसांखाली असलेली दोन लहान भोके!हे कान डोक्याच्या दोन्ही बाजूस डोळ्यांच्याखाली मागील बाजूस असून, ते बहुदा दिसू शकत नाहीत.

पक्ष्यांना दातही नसतात, परंतु सर्व पक्ष्यांना चोच असते. प्रत्येक पक्षी तो काय अन्न खातो यावर यावर त्याच्या चोचीचा आकार अवलंबून असतो.पक्ष्यांचे पाय विशेषतः पायांची बोटे पक्षी कुठे राहतो त्याचा आकार, यावर असतो. उदा. पोहणाऱ्या पक्ष्याचे पाय झाडावर चढणाऱ्या किंवा जमिनीवर धावणाऱ्या पक्ष्यांपेशा वेगळे असतात.

 वटवाघळे हे पक्षी नव्हेत, तसेच पक्षी असूनही किवी हा ऑस्ट्रेलियन पक्षी उडू शकत नाही. एक गाणे देखील होते, पंख होते तो उड आती रे….

पक्ष्यांबद्दल वाटणारं प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा, सहज पडणाऱ्या पावसाप्रमाणे मनात असावा लागतो.

पक्ष्यासारखे उडण्याचे मानवाचे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे.

                  

                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *