— रेवती कुलकर्णी —
१) पावसाळ्यात सृष्टी बरोबर आपले मनही निवते, प्रसन्न वाटते. कधीकधी मनात नकोश्या विचारांचे मळभ दाटते. मनातले हे वादळ सद्विचाराच्या जलधारांनीच शांतावते.
पाऊस* (अष्टाक्षरी)
मनातला तो पाऊस,
रिमझिमे गं नादात,
जणू झंकारे सतार,
मनातल्या गाभाऱ्यात!
ओले चिंब होई मन,
पसरते हिरवाई,
पावसाच्या त्या पाण्यानं
माझ्या मनात गं बाई!
थेंब ते जलधारांचे,
जणू सरातले मोती ,
निसटून डोळ्यांतूनी,
गालांवर ओघळती!
नादखुळा तो पाऊस
मनी कोसळे बेभान,
मनातली ती किल्मिषे
बघा चालली वाहून!
यावा जोराचा पाऊस
मनामधे कोसळुनी
वैफल्याची जळमटे,
जावी त्यासंगे वाहुनी!
२.) अलिकडे पाऊस फार लहरी झाला आहे. कधी येतच नाही तर कधी कधी तुफान पडतो आणि सगळ्यांची दाणादाण उडवतो. त्यावर एक अष्टाक्षरी
लहरी पाऊस
असा कसा रे पावसा
तुझा फारच धिंगाणा,
कधी येशी कधी नाही
काय हा अल्लडपणा!
येत नाहीस तू जेंव्हा,
पळे की तोंडचे पाणी,
दैना रे बळीराजाची,
करपते पीकपाणी!
नद्यानाले ते कोरडे,
पाण्यासाठी गाव रडे,
वेली, फुले ती सुकती,
तुला घालती साकडे!
कधी तू प्रलयंकारी
रागावून कोसळशी
पूर येतसे नद्यांना
आम्हा जेरीस आणशी!
घरीदारी शिरे पाणी,
शेते ती जाती वाहुनी,
शेतकरी दीनवाणी,
नयनात येई पाणी!
फार झालास लहरी,
काय झालेय रे तुला,
आम्हावरी का रुसशी?
येई का मजा रे तुला?
कसा यायचास पूर्वी,
सुखावत धरा सारी ,
सृष्टी करीत संपन्न
भिजवत मने सारी !
होते राजस रुपडे
होती आनंदात सृष्टी,
दृष्ट लागे जणू तुला
होशी का रे हिरमुष्टी?
रिमझिम बरस तू,
नको चिडू,नको रूसू
नको दावू रूप रौद्र,
मुखावरी यावे हासू!
तृप्ती मिळो माणसांना,
तृप्ती मिळो धरणीला,
प्राणी आणि पाखरांना,
तृप्ती मिळावी सृष्टीला!!!

Very nice version! Hats off team!!