#मजा
‘हा आता शेवटचा बॉक्स राहिला आहे. नक्की उघडू ना?’
‘म्हणजे काय? पक्कं ठरलंय ना आपलं, आपण गेले चार महिने या बद्दलच बोललो आहोत,आता परत काय तुझे?
‘परत माझे काय म्हणजे? तू तुझे निर्णय घेतोस पण त्याचा परिणाम आमच्या सगळ्यांवर पण होतोच ना! परत एकदा सांगत आहे, हा बॉक्स उघडून लावल्यावर किमान दोन वर्ष तरी मी परत पॅकिंग.. अनपॅकिंग करणार नाहीये. हे पण आपले बोलणे झाले होते याची फक्त तुला आठवण करून देते.’
‘आता बॉन्ड पेपरवर का लिहून देऊ तुला? तसेही ईमेल नाहीतर मेसेज मध्ये कुठेतरी तू प्रूफ ठेवले असशीलच. मी काय म्हणतो जाई, तू लॉ चे शिक्षण का नाही घेत, उत्तम वकील होण्याचे सगळे गुण आहेत तुझ्याकडे.’
‘हूं वकिली माझ्या रक्तात आहे म्हणून तर मी लॉ करत नाही. तिसऱ्या पिढीतली वकील झाले असते मी.खरेतर मला काळा रंग खूप आवडतो, काळ्या पांढऱ्या रंगाचे कपडे घालता येतील केवळ या कारणासाठी लॉ करावे असे वाटले मला पण मग सुखाचा जीव कशाला दुःखी करावा म्हणत मी बाबा, आजोबांना दुःखी केले. नशिबाने माझा चुलत भाऊ झाला वकील म्हणून ठीक,नाहीतर वडील मागे लागले होते एखादा वकील जावई शोधण्याच्या, पण काय माझ्या नशिबात तूच होतास त्यामुळे आता बसले आहे घरं लावत. चार वर्षातले हे तिसरे घर आहे. आता प्लीज दोन वर्ष तरी घर नाही बदलायचे असा वटहुकूम काढते मी..’
जाई हे असे ट्रॅक बदलत विषय कुठून कुठे नेते म्हणून तर मला खूप आवडली होती, आणि एकदम त्याची जाणीव होऊन मी पटकन तिला मिठीत घेतले ओठांवर ओठ टेकवत म्हणालो, ‘जशी तुमची आज्ञा मॅडम’
‘गप रे, उगा मस्का मारू नकोस, काळ वेळ तरी बघ जरा, महत्वाचे म्हणजे आधी पडदे लाव नाहीतर त्या समोरच्या विंगच्या लोकांची फुकट करमणूक होईल.’
‘बायको तू ना अगदी अरसिक आहेस!’
खरंतर या वाक्यानंतर ती येऊन गळ्यात पडते, पण आज ती आज आली नाही म्हणजे तापमान वाढले आहे हे लक्षात घेऊन मी मुकाट्याने पडदे लावायला सुरुवात केली. आज त्या उलट ती काहीतरी पुटपुटत होती. त्यातला वैताग तेव्हढा मला कळत होता. अगम्य भाषेतला चित्रपट बघताना त्यातले संवाद कळत नाहीत पण त्यांना काय म्हणायचे होते ते बरोबर कळते ना तसेच काहीसे त्या क्षणी आमच्या घरात सुरू होते. ती तोंडाने पुटपुटत, हात जोरजोरात चालवत, प्रत्येक हालचालीत शक्य होईल तेवढा जोरात आवाज करत होती.
नवरा नावाच्या व्यक्तीचे आयुष्य खरेच कठीण असते याची त्या क्षणी परत जाणीव होऊन मी कानात बोसचे इयरप्लग चढवले आणि पडदे लावायला सुरुवात केली. चार खोल्यांचे मिळून पाच पडदे, आजकाल ते स्टँडर्डझायशेन झाल्याने उन्नीस बीसच्या फरकाने सगळे पडदे लागले खरे, पण या घराला दोन बाल्कन्या असल्याने एक पडदा नवीन आणावा लागणार याचीही जाणीव झाली. मी हे सांगायला म्हणून इयर प्लग बंद करून मागे वळून बघितले तर जाई किचनमध्ये सामानाच्या मध्ये एकदम मटकन बसली होती.
तिच्या कपाळाला हात लावून मी विचारले, ‘काय ग काय झाले? बरे वाटत नाहीये का?’
‘मला कसेतरी होतंय’
या कसे तरी च्या ***** . मला कोणीही कसे तरी होतंय असे म्हणले की जाम सडकून काढावेसे वाटते, हे असते तरी काय नेमके कसे तरी, आणि ते होते म्हणजे नेमेके काय होते, सर्दी होते म्हणजे नाक गळते, चोंदते, शेंबूड येतो, खोकला होतो, इन्फेकशन होते, आणि ते दृश्य स्वरुपात दिसत राहते, आता हे कसेतरी म्हणजे नेमके कुठे आणि काय होते तेच मुळी कळत नाही. तरीही आवाजात शक्य तेवढे मार्दव ठेवत मी तिला विचारले, ‘तू दमली आहेस बहुदा, आणि भूकही लागली असेल तुला. दुपारचा एक वाजून गेला बघ.’
यावर तिने एकदम मुसमुसायला सुरुवात केली आणि मी चारी मुंड्या चीत झालो. ते आय हेट टियर्स आजोबांच्या हिरोने म्हणले असले ना तरी आजही लागू होते. आता खिशात रुमाल नव्हताच त्यामुळे पटकन दिसेल ते कापड मी तिला दिले तर जाई एकदम ओरडलीच,
‘मयांक अरे माझा सिल्कचा दुपट्टा आहे तो, नाक पुसायला काय देतोस?’
आजचा दिवस माझा नाहीच बहुदा, म्हणजे मी आज साधे पाणी जरी दिले ना ग्लास मध्ये तरी त्यात मुंगी तरी निघेलच, त्यामुळे मी आता शांतच बसायचे ठरवले. काही केले तरी ओरडा बसणार आहे, आणि नाही केले तरी त्यामुळे काही न केलेलेच बरे असे माझे मी ठरवले पण पुढच्या क्षणी वाटले नक्की जाईला भूक लागली असणार. चार वर्षात भूक लागली की ती हँग्री होते हे आता मला अनुभवाने कळले होते. आणि मग ती वेगळीच व्यक्ती होऊन जाते.
मी सॉरी असे पुटपुटत पटकन मोबाइल हातात घेतला आणि Zomato उघडले. एक वाजून गेला होताच, पटकन एखादी बिर्याणी ऑर्डर करावी म्हणाले तर नक्की कोणती बिर्याणी मागवावी हेच मला कळेना, बिर्याणी टाकले तर इतके ऑप्शन आले की मीच गोंधळून गेलो. आज नक्की खायचा वार आहे ना याची आधी खात्री केली पण तरीही मला काहीच ठरवता येईना. वैतागलेली बायको, अस्ताव्यस्त पसरलेले घर, नवीन घर, नवीन गाव, पोटातल्या भुकेची हळूहळू जाणीव करून देणारे कावळे या सगळ्यामुळे मला त्याक्षणी नक्की काय वाटते हेच सुचेना आणि मग मी चक्क जाईच्या शेजारी जाऊन बसलो आणि म्हणालो, ‘जाईड्या.. मला पण कसेतरी होतंय. बहुतेक आपल्या दोघांना भूक लागली आहे. आपण काहीतरी ऑर्डर करूया का?’
एकदम हसत ती म्हणाली, ‘आज सकाळपासून पहिल्यांदा काहीतरी शहाण्यासारखे बोलला आहेस. मग आता वाट कसली बघतोस कर की ऑर्डर.’
अक्षरशः त्याच वाक्याची वाट बघत असल्यासारखे मी तिच्यासमोर फोन धरला आणि म्हणालो, ‘यातली कोणती बिर्याणी मागवू? मी जरा गोंधळून गेलो होतो?’
आपण आपल्या कोर्टातला बॉल यशस्वीरीत्या परतवून लावला या आनंदात मी असताना ती एकदम म्हणाला, ‘ अरे मेघनाची बिर्याणी दिसतीये बघ इथे, तीच मागवून बघूया. मी इनस्टा वर त्याबद्दल खूप बघितले आहे.’
आपले खाणे लवकरच येणार या आनंदात आम्ही दोघे ठरवल्यासारखे आपआपल्या खोलीतले बॉक्सेस लावायला लागलो होतो. खरेतर मला सगळ्यात पहिले टी व्ही लावायचा होता, पण आधी बेड लावून घे, बाथरूम लावून घे या व्यावहारिक सूचनेकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस माझ्याकडे नव्हते.
त्यानंतर Zomato चा डिलिव्हरी माणूस नेहेमीसारखा चुकीच्या गल्लीत गेला, आणि मग फोनवर आम्ही त्याला तोडक्यामोडक्या हिंदीमध्ये आम्हाला जेवढ्या खुणा माहीत होत्या त्या सगळ्या वापरुन त्याला सांगत होतो तरीही त्याला समजेना तेव्हा जाईने तिचा खास आवाज वापरुन नंदिनी बूथ नंतरची ऑफ व्हाइट रंगाच्या बिल्डींगच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये तिसर्या मजल्यावर आणून द्यायला सांगियातले आणि आश्चर्य म्हणजे खरच तो दोन मिनिटात आला पण.
बिर्याणीचा भला मोठा डबा, सोबतचे दही, कांदा, सालन आणि इतकेच काय चिकन कबाब बघून भूक अजूनच खवळली. क्रोकरीच्या अर्ध्या लावलेल्या बॉक्स मधून जाईने मस्त दोन प्लेट्स काढल्या त्यात नजाकतीने बिर्याणी वाढली, कबाब ठेवले, रायते कांदा लिंबू ठेवले. ते मस्त सजवलेले ताट हातात धरून अर्धवट लावून झालेल्या किचनच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढला आणि तो Instagram वर पोस्ट केला. करताना first meal in our new home हे तर लिहिलेच पण तो आज नेहेमीचे hashtag टाकतानाच #मजामाडी असा नवीन hashtag पण टाकला तेव्हा मला गम्मत वाटली. चार महिन्यापूर्वी जा मी नाही येणार तुझ्यासोबत तिकडे असे म्हणणारी जाई खरी, की घर शोधताना चार जणांशी बोलणारी जाई खरी की विमानात सुध्दा नक्की जायचे का तिकडे विचारणारी जाई खरी की बेंगलोर मधल्या बागा बघून घराजवळचा तलाव बघून हे कसले मस्त आहे म्हणणारी जाई खरी मलाच ठरवता येईना.
आम्ही डेट करत असताना कधीतरी मी म्हणालो होतो मजा आहे, तर त्यावर ती पटकन म्हणाली होती, मला ही मजा आयुष्यभरासाठी हवी आहे! तेव्हाही मी लेट करंटच होतोच, पण त्या दिवसांनंतर तिच्या इनस्टा पोस्ट खाली #मजा दिसायला लागले आणि मग खूप दिवसांनी माझे मीच कोडे उलगडवले मयांकचा म आणि जाईचा जा!! नशीब तिने जाम-मजा असे नाही वापरले!!!
चिकन खाण्यात ब्रह्मानंदी तंद्री लागलेल्या तिच्याकडे बघत मी मनातल्या मनात म्हणालो हिला हे असे आनंदी बघणे ही खरी मजा आहे, आता ही मजा या गावात मला टिकवून ठेवता येते का हे तेवढे बघितले पाहिजे!!!!
–मानसी होळेहोन्नूर