शब्दक्षरी : प्राथमिक फेरी ते अंतिम फेरी : एक प्रवास
सुरुवातीला जेव्हा शब्दक्षरी स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा, निव्वळ मराठी भाषेवरच्या प्रेमासाठी, स्पर्धेत नाव दिलं. शालेय शिक्षण मराठी माध्यमात झालेलं. त्यावेळी शिकलेलं आणि अजूनही सहजगत्या वापरात असलेलं, मराठी व्याकरण–म्हणी–वाक्प्रचार–विरामचिन्हे–शब्द प्रकार इत्यादी, वाचलेलं साहित्य, अनेक लेखकांची पुस्तके, जुने मराठी सिनेमा–नाटके– गाणी, यापैकी किती आठवतंय ते तरी पाहूया, एवढाच विचार होता.
महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात अशा प्रकारच्या स्पर्धा वर्षानुवर्षे घेतल्या गेल्या होत्या. त्यात माझा सहभाग असायचा, पण अंजली अशा प्रकारच्या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार होती. त्यामुळे तिला जरा टेन्शन होते. कशा प्रकारच्या फेऱ्या असू शकतील हे माझ्या अनुभवावरून तिला सांगितल्यावर तिची भीती जरा कमी झाली; आणि स्पर्धेत भाग घ्यायचा, खेळून तर पाहू, असं म्हणून स्पर्धेत उतरलो.
आयोजकांनी बंगलोरमधील १६ संघांचे तीन गट केले होते. एका रविवारी दोन गटांची स्पर्धा होईल, आणि तिसऱ्या गटाची स्पर्धा (ज्यात आमची जोडी होती) १५ दिवसानंतर होईल असे कळवले. जेव्हा पहिल्या दोन गटांची स्पर्धा झाली, तेव्हा त्यात भाग घेतलेल्या मैत्रिणींकडून स्पर्धेची साधारण कल्पना आली. कोणत्या फेऱ्या असू शकतील याचे काही अंदाज बांधता आले. अगदी तश्शाच/त्याच फेऱ्या नाही तरी, तत्सम फेऱ्यांमध्ये, काय वेगळं असू शकेल याची थोडीशी तयारी करता आली. स्पर्धेच्या वेळी, फेरीतील तिसऱ्या गटाच्या पाच संघांना महाराष्ट्रातील नद्यांची नावे दिली होती. आम्हाला पंचगंगा हे नाव मिळाले.
या प्राथमिक फेरीत, पुस्तकांच्या चित्रांवरून लेखक ओळखणे, म्हणी/वाक्प्रचार गाळलेल्या जागा भरून ओळखणे, अनुस्वारंभ, शब्दजाल ( दिलेल्या विषयासंबंधीचे शब्द ओळखणे ), जोडशब्द, कानसेन ( सुरुवातीच्या धून वरून गाणे ओळखणे ) असे एकूण ६ प्रकारचे निरनिराळे प्रश्न प्रत्येक उपफेरीत विचारले होते. या फेऱ्यांमध्ये, आमचे काही अंदाज बरोबर आल्याने हुरूप वाढला. गुणांनुसार निवड होऊन उपांत्य फेरीत दाखल झालो. बंगलोरच्या तीनही प्राथमिक फेऱ्यांमधून एकूण ७ संघ उपांत्य फेरीसाठी निवडले गेले. या ७ संघांना सुरांची नावे देण्यात आली होती. आमचा ‘षड्ज‘ संघ होता.
उपांत्य फेरीत विचारलेल्या प्रश्नांमध्ये वैविध्य खूप होते. अबोल गाणी ( mute केलेली ) व तो सिनेमा ओळखणे, एक शब्दाला अनेक समानार्थी प्रतिशब्द, वाचून दाखवलेला उतारा कोणत्या लेखकाचा आहे ते ओळखणे, शब्दजाल ( दिलेल्या शब्दांमधील दुवा ओळखणे ), बाराखडी वरून शब्द लिहिणे, बोला घडाघडा अशा एकूण सात वेगवेगळ्या उपफेऱ्या होत्या. यापैकी ‘बोला घडाघडा’ ही विशेष लक्षात राहिलेली रंजक फेरी होती. एक मिनिट न थांबता, कुठलाही इंग्रजी शब्द न वापरता, दिलेल्या विषयाला धरून बोलायचे होते. काही फेऱ्या tricky होत्या. मराठी व्याकरण कितीही माहित असले तरी वेळेवर आठवणे हे एक आव्हानच असते. काही प्रश्न तर दिलेल्या वेळेत सोडवणे/लिहिणे ही एक प्रकारची परीक्षाच होती. अशावेळी लक्ष केंद्रित करून पटापट उत्तरे शोधणे हे एकमेकींच्या सहकार्यानेच फक्त होऊ शकले. आमचं दोघींचं ट्युनिंग चांगलं जमलं होतं. त्यामुळे उपांत्य फेरीही दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झालो.
आता अंतिम फेरीची वेळ आली, आणि मग मात्र जरासं टेन्शन आलं. पण कसाही निकाल लागला तरी अंतिम फेरी गाठू शकलो, हे समाधान होतं. काय प्रश्न असू शकतील, वेगळं काय असेल, याचे आडाखे बांधू लागलो. अंतिम फेरीत काठिण्य नक्कीच वाढणार, हे लक्षात घेऊन, त्या दृष्टीने तशी थोडी तयारी केली.
बंगलोर मधील तीन आणि बाहेरगावचे तीन असे एकूण सहा संघ अंतिम फेरीत होते. आपल्या संघाचे नाव आपणच ठरवायचे होते. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आमच्या संघाचे नाव आम्ही ‘मायमराठी’ असे ठरवले.
‘र’ चा टेकू फेरी, खुणाच खुणा ( विरामचिन्हांचा दिलेल्या शब्दांमध्ये – वाक्यांमध्ये वापर ), clue वरून आणि फोटो पाहून साहित्यिक ओळखा, मूकगीते, शब्दचित्रे ( चित्र काढून शब्द ओळखणे ), सरमिसळ, प्रश्नांचा जलद मारा, गुंफण गीतांची, आणि सरते शेवटी भक्तीसंगीत अशा तब्बल आठ नावीन्यपूर्ण उपफेऱ्यांचा सामना केला.
कोणतीही स्पर्धा तशी परीक्षाच असते, पण परीक्षेत अभ्यासक्रम माहीत असतो. पण या परीक्षेत अभ्यासक्रम म्हणजे ‘मराठी भाषा’ एवढेच सांगण्यात आले होते. खूप मोठे आव्हान होते. अंजलीने तर शाळेत असतानाही चाळली नसतील एवढी मराठी व्याकरणाची पाने या स्पर्धेच्या निमित्ताने चाळली.
सर्व स्पर्धकांच्या जोड्या चांगल्याच चुरशीने खेळत होत्या. त्यामुळे स्पर्धा अधिकच रोचक होत गेली. पूर्ण प्रवासात, काही फेऱ्या सोप्या, तर काही खूप challenging, कठीण होत्या. काही मनोरंजक तर काही जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या होत्या. फेरी ‘सोपी’ आणि ‘कठीण’ असणे या जशा स्पर्धेच्या नाण्याच्या दोन बाजू होत्या, तशी ‘नशिबाची साथ’ ही त्या नाण्याची ‘कड’ होती. हाही नाण्याचा अविभाज्य घटकच असतो. याची जाणीव फेऱ्या खेळताना प्रत्येक वेळी होत होती. जोडीदाराचा समन्वय, थोडी पूर्वतयारी आणि खेळाडू वृत्ती या तीनही घटकामुळे ३१ संघांमधून तिसऱ्या क्रमांकावर जिंकलेली ही स्पर्धा कायम स्मरणात राहील.
ज्योती साठे, अंजली संगवई
