प्रतिभा बिलगी
गुरुदत्त हे हिंदी सिनेमातील एक अत्यंत प्रभावशाली आणि संवेदनशील अभिनेते मानले जातात. त्यांच्या सिनेमात त्यांनी सत्य आणि वास्तवतेचा उपयोग करून एक नवा सिद्धांत मांडला. यामुळे त्यांच्या कामाचा प्रभाव बराच काळ टिकला. बहुतेक यामुळेच गुरूदत्तचे अनेक चित्रपट व्यावसायिकरित्या अपयशी ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे निव्वळ मनोरंजनासाठी सिनेमा पाहणाऱ्या बहुतांश भारतीय सिने प्रेक्षकांची मानसिकता आणि त्यांच्या समजुती या त्या काळी एवढ्या प्रगल्भ नव्हत्या.
गुरुदत्त हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता होते. १९५० आणि १९६० च्या दशकात त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, चौदवी का चांद, सुहागन, भरोसा, काला बाजार, मिस्टर अँड मिसेस ५५, वी आर वन, बाजी, जल इ. विविध विषयांवर त्यांनी चित्रपट बनवले. २०१० मध्ये गुरु दत्तचे नाव CNN च्या “सर्वोत्कृष्ट” २५ आशियाई अभिनेत्यांच्या यादीत होते. १९५० च्या दशकातील लोकप्रिय सिनेमांच्या संदर्भात जर बोलायचे झाले तर काव्यात्मक आणि कलात्मक चित्रपटांची निर्मिती आणि विकास अशी गुरुदत्त यांची ख्याती आहे. त्यांच्या चित्रपटांचे आजही जर्मनी, फ्रान्स आणि जपान सारख्या देशांमध्ये कौतुक केले जाते.
गुरूदत्त यांना एक चित्रपट निर्माता म्हणून त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांची पूर्णपणे जाणीव होती. गुरुदत्त हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे असे पहिले चित्रपट निर्माते होते, ज्यांनी आपल्या चित्रपटांतून हे दाखविण्याचा प्रयत्न केला की स्वातंत्र्यापूर्वी ज्या प्रकारच्या सामाजिक न्यायाची चर्चा केली जात होती आणि ज्या प्रकारचा सामाजिक न्याय लोकांना स्वातंत्र्यापूर्वी मिळाला नाही, तो भारतीय जनतेला स्वातंत्र्यानंतरही मिळाला नाही. या कारणास्तव, त्यांच्या बहुतेक चित्रपटांचा नायक शोकांतिकेचा बळी ठरल्याचे दिसून येते.
गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये त्यांची साहित्यिक आवड आणि संगीताची जाण सर्वार्थाने दिसून येते. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक नवीन तांत्रिक प्रयोग केले. त्यांना नेहमीच काहीतरी वेगळे करायचे होते. परंपरेच्या चौकटीतून बाहेर पडून आणि सर्व बंधने मोडून, गुरुदत्त यांनी नेहमीच त्यांच्या पात्रांना विस्तृत भूमिका दिल्या.
गुरुदत्त यांनी त्यांच्या चित्रपटांची अनेक गाणी पाश्चिमात्य संगीताच्या आधारावर रचली. स्पॅनिश गाण्यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ‘आर-पार’ चित्रपटातील ‘सुन-सुन-सुन जालिमा’ या गाण्यावर ‘बिंग क्रॉस बी’ मधील ‘सिंग-सिंग-सिंग अ सॉन्ग विथ मी’ या गाण्याचा प्रभाव दिसून येतो, तर ‘बाबूजी धीरे चलना’ मध्ये ‘क्वाजस क्वाजस क्वाज’चे भारतीयीकरण आपणास पहावयास मिळते.
गुरूदत्त यांना नेहमी त्यांच्या चित्रपटांची गाणी वास्तविक स्थळांवर चित्रित करायची होती, म्हणून त्यांनी भाषा व अन्य गोष्टींबरोबरच लोकेशनलाही महत्त्व दिले. चित्रपटात ज्या वातावरणात त्यांची पात्रे जगायची, बहुतेक करून तश्याच वातावरणात त्यांनी आपल्या गाण्यांचे चित्रीकरण केले . उदाहरणार्थ, ‘सुन सुन जालिमा’ हे गाणे गॅरेजमध्ये चित्रित करण्यात आले होते. कधी-कधी गुरुदत्त वास्तवतेच्या ऐवजी कल्पनारम्य जगाची निर्मिती करताना गाण्याचे संगीत लांबवत असत.
प्यासा’ हा १९५७ साली गुरूदत्तद्वारे दिग्दर्शित, निर्मित आणि अभिनीत असा हिंदी चित्रपट आहे, जो विजय नावाच्या संघर्षशील कवीची कथा मांडतो. या चित्रपटाचा नायक स्वतंत्र भारतात आपले कार्य प्रकाशित करू इच्छितो. या चित्रपटात गुरुदत्त यांनी एका उत्कट, आदर्शवादी व भांडवलशाही विरोधी कवीची भूमिका साकारली होती. अन्याय, ढोंगीपणा आणि शोषण या विरोधात त्यांनी या चित्रपटातून आवाज उठवला होता. या नायकाला जीवनमूल्यांची जाण असते. तो आपल्या संधीसाधू आणि भांडवलदार मैत्रिणीला सोडून एका वेश्येच्या प्रेमात पडतो. प्यासा मध्ये गुरुदत्त हे केवळ नायक नव्हते, तर त्या काळातील कोट्यावधी भारतीयांच्या भावनाही व्यक्त करत होते आणि आजही करत आहेत.
गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे केले होते. हिंदी चित्रपटसृष्टीने नेहमीच प्रेक्षकांना वास्तव दाखवून दिले असे मानले जाते. यात गुरूदत्त यांचा वाटा खूप मोठा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी खोटी चमक-धमक त्यांनी दूर केली. ते नेहमी वेळेच्या आधी आणि पुढचा विचार करत असत.
गुरुदत्तचा ‘चौधवी का चांद’ हा एक उत्तम संगीतमय आणि साहित्यिक चित्रपट ठरला. मैत्रीसाठी माणूस आपली सर्वात प्रिय गोष्ट, आपली प्रेयसी आणि बायको जिला तो आपल्या आयुष्याचे सर्वस्व मानतो, तिला त्याग करण्याचा निर्णय कसा घेतो हे हा चित्रपट आपल्याला दाखवून देतो. यासाठी तो पत्नीच्या मनात स्वतःविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण पत्नीचे त्याच्यावरचे प्रेम कमी होत नाही, कारण आपल्या पतीवरचे खरे प्रेम तिला हे करू देत नाही.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ हा आज जगातील १२ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. ‘हा चित्रपट काळाच्या पुढे आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना या चित्रपटाचे महत्त्व नंतरच समजेल’, असा अंदाज राज कपूर यांनी व्यक्त केला होता. हा चित्रपट गुरुदत्त यांच्या खऱ्या आयुष्याशी जोडला गेला होता.
गुरु दत्त यांनी ‘मिस्टर आणि मिसेस ५५’ मध्ये प्रथमच त्यांच्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत सामाजिक विषयावर काम केले. यामध्ये पाश्चिमात्य सभ्यतेचा भारतीय मूल्यांवर, विशेषत: शहरांतील श्रीमंतांवर होणाऱ्या प्रभावाचा विरोध केला आहे आणि भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात स्त्रीमुक्तीचा संघर्ष अगदी माफक पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, त्यामुळे हा चित्रपट कमकुवत ठरला. या चित्रपटात स्त्रीला महिलांच्या हक्कांसाठी लढणारी गंभीर स्त्री म्हणून नाही, तर एका खलनायिकेच्या रूपात दाखवण्यात आले होते.
बंगाली कादंबरीकार ‘बिमल मित्रा’ यांच्या ‘साहिब बीबी और गुलाम’ या कादंबरीवर गुरु दत्त यांनी प्रसिद्ध चित्रपट बनवला. मोडकळीस आलेली सरंजामशाही या चित्रपटात दाखवण्यात आली होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश राजवटीत बंगालमधील जमीनदारी आणि सरंजामशाहीच्या दुःखद ऱ्हासाची झलक या चित्रपटातून पाहावयास मिळते. या चित्रपटाचा मुख्य उद्देश, जहागीरदारांच्या भ्रष्टतेचे दुष्परिणाम दाखवणे हा होता.
गुरुदत्त यांच्या अकाली निधनानंतर ‘बिमल मित्रा’ यांनी एक कादंबरी लिहिली, ज्याचा हिंदी अनुवाद वाणी प्रकाशनाने ‘बिछुडे सब बारी-बारी’ नावाने प्रकाशित केला आहे. ही कादंबरी गुरुदत्त आणि त्यांची पत्नी गीता दत्त यांच्या जीवनातील तणाव आणि वहिदा रहमान यांच्याशी त्यांच्या वाढत्या जवळीकीचे सत्य सांगते.
हिंदी चित्रपटांनी केवळ मनोरंजनावर भर दिला नाही, तर गुरुदत्त यांच्यासारख्या चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता बनून समाजाला वास्तव दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, हे यावरून दिसून येते. गुरुदत्त यांचे हे महान कार्य आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांनी समाजाला नव्या जगाची ओळख करून दिली. अनेक नवीन तांत्रिक प्रयोग त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रथमच वापरले गेले, ज्याचा उपयोग नंतरच्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना झाला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
गुरूदत्त यांना नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि कल्पक करायचं होतं, त्यामुळे त्यांना अनेकदा निराशेचा सामना करावा लागला. अस्वस्थ आणि संवेदनशील, शांत आणि अंतर्मुख, असे गुरुदत्त नेहमी आपल्या कामात असमाधानी असायचे. असे असतानाही गुरूदत्त यांनी आपल्या चित्रपटांद्वारे आपले नाव अमर केले आणि एक अद्भुत इतिहास रचला. खरे तर गुरुदत्तचे चित्रपट हे मानवता आणि समाजवादाच्या उत्स्फूर्ततेच्या आणि नैसर्गिकतेच्या जडणघडणीवर बनवले गेले होते, त्यामुळे त्यांचे महत्त्व आजही कायम आहे.
गुरूदत्त यांनी दैनंदिन जीवनात आपल्याला भेटणाऱ्या जिवंत, थेट आणि खऱ्या अर्थाने संवेदनशील अश्या पात्रांशी ओळख करून दिली आणि वास्तवतेच्या अगदी जवळ असलेल्या गोड आणि आंबट कथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करून भारतीय जनतेला मंत्रमुग्ध केले. अश्या या महान कलाकाराला ज्याने एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांची निर्मिती केली आणि जगासमोर आपलं स्वतंत्र असं खास व्यक्तिमत्त्व निर्माण केलं, त्याला मनापासून अभिवादन !