पुण्य…

–देवश्री अंभईकर धरणगांवकर–

                                    

                                        कोणे एके काळी आटपाटनगरातील लोकांचा चमत्कार, पाप-पुण्य, व्रत-वैकल्ये, अनुष्ठाने इत्यादींवर विश्वास होता; ही त्या काळातील गोष्ट आहे…

                                              काहीशा विमनस्क अवस्थेत गुणाजी नदीच्या घाटावर आला. पाण्याचा थंड स्पर्श पायांना झाल्यावर त्याला जरा बरे वाटले पण क्षणभरच. तो पुन्हा त्याच्या दिवंगत पत्नीच्या आठवणींत गढून गेला. इतक्या वर्षांचे सहजीवन अचानक संपले. सहचारिणी भरल्या संसारातून उठून गेली आणि त्याच्या आयुष्यात न भरणारी एक पोकळी निर्माण झाली. धनार्जनात आकंठ बुडालेला गुणाजी तिच्या जाण्याने भानावर आला. उदकशांती झाली आणि काल रात्री ती त्याला स्वप्नात दिसली. “अहो, ऐका ना एकदा टेकडीवरच्या देवळात दर्शन घ्या!” पत्नीचा आर्जवी स्वर कानांत स्पष्ट ऐकू येताच त्याला एकदम जाग आली. बाजूची तिची जागा रिकामी होती. काही वेळ तो तसाच जागा होता नंतर कधीतरी डोळा लागला. 

                                                  दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तयार झाला पण आज तो पेढीवर गेला नाही. गाडीवानाला घोडागाडी देवळाकडे घ्यायला लावली. बऱ्याच काळानंतर तो इकडे फिरकला होता. गावाबाहेरच्या जरा दूर असलेल्या त्या देवळाची सगळ्या पंचक्रोशीत ‘जागृत’ म्हणून ख्याती होती. टेकडीच्या पायथ्याशी नदी वाहायची. उन्हाळ्यात तिचे पात्र रोडावत असे. छोटासा घाट होता. लोक तिथे थांबून हात-पाय धुवून टेकडी चढत. साधारण शंभर-सव्वाशे पायऱ्या होत्या. वरती नगरदेवतेचे पुरातन मंदिर होते. गुणाजीची पत्नी फार धार्मिक होती. या देवतेवर तिची नितांत श्रद्धा होती.    

                                                  दुपार झाली. घाटावरून उठून तो दगडी पायऱ्यांजवळ एका झाडाखाली बसला. गर्दी नसली तरी राबता सुरूच होता. घोळक्याने चाललेल्या काही स्त्रियांना पाहून त्याला पुन्हा पत्नीची तीव्र आठवण आली… अलीकडे काही वर्षांत आपण किती गुरफटलो व्यापारात आणि ती मात्र शांतपणे भक्तिमार्गाला लागली. अनेकदा ती इथे यायची. सतत कसले ना कसले उपवास करून कृश झाली होती. गेल्या दोन महिन्यांत तर देवळात तिच्या फेऱ्या वाढल्या होत्या. आपण विचारले तर म्हणायची, “अहो, पुण्य असावं गाठीशी. संकटात पुण्यच आडवं येऊन वाचवतं!” मग ती म्हणायची, “तुम्ही चला ना एकदा देवळात, किती वर्षांत जोडीने दर्शनाला गेलो नाही.” आपण “बघू!” म्हणायचो पण पुन्हा व्यापारात व्यस्त. तिला वेळही देता येत नव्हता. आता तीच नाही. त्याचे डोळे अचानक भरून आले… 

                                              …नगरातील आपण एक धनाढ्य व्यापारी. नगरश्रेष्ठी म्हणून मान मिळतो. तिन्ही मुले हाताशी आल्यावर तर चार पेढ्या सुरू केल्या. या सर्वांत तिची गृहिणी म्हणून भक्कम साथ मिळाली. मुलांनीही व्यापारात यावे म्हणून तिनेच लहानपणापासून त्यांच्या मनावर तसे बिंबवले. आपण जेव्हा घरोघरी जाऊन लोकांच्या दागिन्यांना झळाळी द्यायचो तेव्हाही, नंतर कर्ज काढून छोटीशी पेढी उघडली तेव्हाही आणि हळूहळू एक चांगले सराफा व्यापारी म्हणून यशस्वी झालो तेव्हाही ती सोबत होती. जुन्या प्रथेप्रमाणे आपले मिसरूड फुटताच लग्न झाले. तीसुद्धा चौदा-पंधरा वर्षांची होती. हळूहळू संसार फुलला. तीची सोबत मिळाली आणि जणू भाग्योदय झाला… समोरच्या झुळझुळत्या पाण्याकडे पाहत गुणाजीचे मन भूतकाळात काही काळ रमले. 

                                      अर्ध्या पायऱ्या चढल्यावर गुणाजीला दमल्यासारखे झाले. कित्येक वर्षांत शारीरिक श्रमाचे काहीच काम केले नव्हते. त्याला वाटले, आपली पत्नी कशी एवढी चढउतार करत असेल. बाजुच्या झाडाखाली सावलीत तो टेकला. ओले कापड गुंडाळलेल्या फिरकीच्या तांब्यातून तो थंड पाणी गटागटा प्यायला. त्याला आठवले पत्नीने सांगितले होते की टेकडीवर अन्न-पाण्याची काही नीट व्यवस्था नाही. तो सर्व पायऱ्या सावकाश चढून वर आला. तिथून एकीकडे नदी, ग्रामस्थांची शेती, डोंगररांगा व दुसरीकडे नगर असे विहंगम दृश्य दिसत होते. टेकडीचा माथा बऱ्यापैकी सपाट होता. काळ्या पाषाणातील हेमाडपंती शैलीचे मुख्य मंदिर व काही छोटी देवळे होती. मागे पुजाऱ्याची व काही गुरवांची कच्ची-पक्की घरे दाटीवाटीने होती. एका बाजूला एक जुनाट पुष्करणी होती पण उन्हाळ्याने पाणी तळाला गेले होते. एक आड होता त्यालाही जेमतेम पाणी होते. बाकी सर्व जागा मोकळी. उपरण्याने कपाळावरील घाम टिपत तो मंदिराजवळ आला. ओवरीत कोणी साधू चिलीम ओढत बसला होता. कडेने दोन तीन वड-पिंपळ होते त्याखाली काही लोक भजन करीत होती. टाळ-मृदुंगाच्या आवाजाने त्याला जरा बरे वाटले. वहाणा काढून ठेऊन तो मंदिरात आला. 

                                         आत दोन मंडप व त्यामागे किंचित काळोखा गाभारा होता. फुले, चंदन, धुप व कापूराच्या संमिश्र सुवासाने त्याला एकदम पावित्र्याची अनुभुती झाली. त्याने देवतेचे दर्शन घेतले. दोन्ही बाजूंनी असलेल्या पुरुषभर उंचीच्या समयांच्या ज्योतींचा मंद प्रकाश मूर्तीवर पडला होता. देवतेच्या मुखावर एक गुढ हास्य विलसत असल्याचा गुणाजीला भास झाला. नकळत त्याने हात जोडले. एकच क्षण मन शांत झाल्यासारखे वाटले पण लगेच त्याला जाणवले… हिची किती श्रद्धा होती. ही असताना जोडीने आलो असतो तर काय बिघडले असते. आपण किती गृहीत धरले हिला… त्याच्या मनात विचार सुरूच होते.   

                                          त्याच्या चाहुलीने पुजारी गाभाऱ्याबाजूच्या खोलीतून बाहेर आला. पुजाऱ्याने म्हटले, “गुणाजीशेठ!” 

“हो! पण तुम्ही कसे ओळखले?”- तो. 

“अहो, तुम्हाला कोण नाही ओळखत? बाईसाहेब- तुमच्या पत्नी यायच्या तेव्हा नेहमी तुमच्यासाठीच प्रार्थना, दानधर्म करायच्या. म्हणायच्या, ‘पुण्य असावं गाठीशी, संकटात पुण्यच आडवं येऊन वाचवतं!’ खरोखरच फार पुण्यवान होत्या. देवालाही त्यांचं लगेच ऐकावं लागलं.” 

“काय ऐकलं तिचं देवानं?” मनात चमकून गुणाजीने विचारले. 

पुजाऱ्याने एक दीर्घ श्वास घेऊन सांगितले, “तुम्ही दोन महिन्यांपूर्वी आजारी पडला होता तेव्हा बाईसाहेब तुमची जन्मकुंडली घेऊन देवळात आल्या होत्या. म्हणाल्या, ‘आठ दिवस झाले औषधोपचार थकले पण यांचा ज्वर ओसरत नाही.’ मीच कुंडली अभ्यासून सांगितले की तुमच्यावर मृत्यूचे सावट आहे. अनुष्ठान केलं तर कदाचित गंडांतर टळेल. बाईसाहेब लगेचच त्या कठीण अनुष्ठानास बसल्या. दोन दिवस इथेच पूजा, होम-हवन झालं. तुम्ही बेशुध्दच होता. त्या दिवशी मी आतल्या खोलीत होतो. बाईसाहेब भर दुपारी आल्या आणि त्यांनी नगरदेवतेला भरल्या गळ्याने साकडे घातले… म्हणाल्या, ‘ह्यांच्यावर सगळं कुटुंब आणि अनेक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. अजून मुलांचे विवाह व्हायचे आहेत. हे गेले तर सगळं विस्कटून जाईल. ह्यांच्याऐवजी मला ने पण ह्यांना वाचव. ह्यांना दीर्घायुष्य दे. मला अहेवपणी मरण आलं तर माझं सोनं होईल. ह्यांना वाचव. माझ्याकडे काही पुण्य असेलच तर आज माझं ऐक…’ पुजारी पुढे म्हणाला, “नंतरचे तुम्ही जाणता… नियतीची इच्छा!”  ते ऐकून गुणाजी सुन्न होऊन मटकन खालीच बसला. 

                                             त्याला आठवले …त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दरदरून घाम येऊन ज्वर उतरला व शुद्ध आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर किती सात्विक आनंद होता. नंतर आपली प्रकृती सुधारली पण ती अचानक खंगत गेली आणि एक दिवस झोपेतच गेली. आपल्यासाठी गेली… एवढं प्रेम होतं तिचं की पतीसाठी नियतीशी स्वतःच्या प्राणांचा सौदा केला. स्वतःचं पुण्य पणाला लावलं!!!

                                            पत्नीसाठी काहीतरी करावे असे त्याला तीव्रपणे वाटू लागले. विचारांच्या तंद्रीत गुणाजी मंदिराबाहेर पडला. भोवताल पाहताच अचानक त्याला सुचले की तिच्यासाठी इथे काय करता येईल. कदाचित म्हणूनच ती त्याला इथे येण्याचा सतत आग्रह करायची. 

वर मंदिरात घंटानाद होत होता. तो झपाझप पायऱ्या उतरत होता… 

                                             गुणाजीशेठने नंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या. पाणपोया व अन्नछत्र सुरु केले. पायथ्याच्या गावांतील लोकांसाठी शाळा, रुग्णालये, खानावळी, रस्ते बांधणे इत्यादी कामे केली. दानधर्म करीत राहिले. त्या सर्वांच्या कोनशिलेवर ‘स्मरणार्थ’ म्हणून गुणाजीच्या पत्नीचे – गुणवंतीचे नाव होते. गुणाजीशेठ वयाची शंभर वर्षे जगले. कोणी या समाजकार्याबद्दल विचारले तर म्हणायचे, “पुण्य असावं गाठीशी. संकटात पुण्यच आडवं येऊन वाचवतं…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *