आपल्या हिंदूधर्मात मातृपितृऋणानंतर महत्वाचे गुरूऋण आहे असे सांगितले आहे. ह्या महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूवंदना सादर करत आहे.
–रेवती कुलकर्णी–
तिमिरातुनी दावे ज्योत प्रकाशाची,
उजळे जो अंधारी वाट जीवनाची,
गुरूविण दुजा नसे ऐसा करूणामयी!
ज्ञानभांडार उघडती विविध विषयांचे,
असे ग्रंथराज असती गुरू अज्ञ जनांचे,
जणू आशिर्वाद माता सरस्वतीचे!
मान प्रथम गुरूचा, असे मातपित्याला,
पकडुनी अंगुली शिकवती जगी वावराया,
अन् शिकवती तोंडही द्याया अपयशाला!
जो जो भेटे प्रवासात ह्या आयुष्याच्या,
घ्यावे अनमोल देणे अनुभवांचे तयाच्या,
मानावे गुरू तयाला,वेचावे कण ज्ञानांचे !
मानव हा एकटा येई एकटाच जाई,
टक्केटोणपे खाता खाता दुनियेचे,
अनुभव हाच गुरू महान हे कळुनी येई!
