कविता

— रेवती कुलकर्णी —

हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!

सगळ्यांची पुढची सगळी वर्षे कोरोनामुक्त जावोत!!

चैत्र मास हा अतिशय उत्साहवर्धक महिना. सगळ्या चिंता, सगळी दु:खे, उदासी आपण नुकतीच होळीमध्ये दहन केलेलीच आहे. आता आपण वसंतोत्सव, रामजन्मोत्सव, हनुमंत जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया!!!

त्यानिमित्त माझ्या दोन रचना सादर करत आहे.

चैत्र

आला गं सख्यांनो आला चैत्राचा मास,

गुढी तोरणांनी करुया स्वागत झकास,

आसमंती दरवळलाय मोगऱ्याचा सुवास,

आम्रतरू मोहरला, पसरलाय मदभरा वास,

कोकिळ सांगतसे वसंताचे गुपित ते खास!

सजवूया ग चैत्रगौर मिळुनी साऱ्याजणी, 

घालून सडे अत्तराचे चैत्रांगण सजवू अंगणी,

सुगंधी गुलाबपाण्याने भरुया ही गुलाबदाणी,

वाटल्या डाळीला घालूया खमंग फोडणी, 

कैरीच्या थंडगार पन्ह्याने भरुया पेले झणी!

सजवून पाळणा, करुया सोहळा रामजन्माचा ,

सावळा, गोजिरा तान्हुला तो कौसल्यामातेचा,

चोखत अंगठा गोड हसे स्वामी त्रैलोक्याचा,

चैत्रीपुनवेला करुया जन्मोत्सव हनुमंताचा,

सयांनो लुटुया हर्षोल्हास,आलाय मास चैत्राचा!!!

श्रीराम.

कौसल्यानंदन *राम* तो रघुकुलभुषण,

बंधू शोभती भरत, शत्रुघ्न अन् लक्ष्मण,

जनकनंदिनी मैथिलीचा हा रमारमण!

एकवचनी असे ख्याती जयाची,

बुज राखुनी पित्याच्या वचनाची,

वाट धरे सुकुमार तो वनवासाची!

एकपत्नीव्रती असे हा दशरथकुमर,

पेलुनी शिवधनु, झाले सीतेशी स्वयंवर,

सीतेनेच व्यापले रघुरायाचे हृदयमंदिर!

एकाच बाणाने मारी जो शत्रूस,

एकबाणी म्हणती म्हणून तयास,

अमोघ बाणाने यमसदनी धाडले रावणास!

रामनामाचा महिमा असे अपरंपार,

वाल्याचा वाल्मिकी अन् कृतार्थ वाली वानर,

उद्धरली अहिल्या अन् शबरी,कन्या ती शाबर!

दोन अक्षरांचा अतिमधुर शब्द ‘*राम’,*

सामावे सारे जग तयात,अन् सारे धाम,

 हे एकच नाम रोमरोमी, रामराम रामराम !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *