दारची फुले

करून-सवरून

अहो, तुम्हाला सांगतो, आज काल सर्वच वेब सिरीजमध्ये ना तसले … कळलं का ?.. तसले सीन असतात. सांगून ठेवतो, पालकांनी नेहमी सावध राहायलाच हवे. अहो, वेळ काय सांगून येते का?

म्हणजे झालं असं बघा .. आम्ही एक आपली साधी मराठी वेब सिरीज बघत होतो .. आम्ही दोघे .. आमच्या अर्धवट कळत्या वयातील मुलीबरोबर निर्धास्तपाणे पाहत होतो. अर्धवट कळतं वय यासाठी की .. चारचौघात आमच्या मनात कायम एक धाकधूक असते की मुलीकडून काय प्रश्न विचारला जाईल. उदा: मुलं लग्नानंतरच का होतात, सुहाग-रात हा सण आहे का, त्याला मराठीत काय म्हणतात ई. ई. 

असो .. तर छान सुरु होतं .. आपल्या साध्या मराठी सिरीजमध्ये .. मध्यमवर्गीय कुटुंब .. “चहा कर”, “अहो जेवण वाढलंय”, “उद्या वन्सं परत येणार आहेत, परवाच तर आल्या होत्या!”  इत्यादी व तत्सम प्रकार सुरु होते. 

आम्ही गाफील होतो. प्रिकॉशन नव्हती घेतली………… आणि अचानक, ते मराठी नवरा-बायको उघड उघड .. तसलं काही करू लागले ! 

म्हणजे असं नाही की काही पार्श्वभूमी नव्हती. झालं असं होतं की गावी गेलेला नवरा अचानक घरी येतो. मुलगा झोपलेला असतो. ठीक आहे पण आधीच्या एपिसोडसच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार आणि पुन्हा “आपली साधी मराठी वेब सिरीज हो” लक्षात घेता, वाटलं होत की ती गृहिणी थोडी अधोन्मुख होईल किंवा “ए, राहुल उठेल ना” असं काही तरी म्हणेल किंवा ते कार्ट स्वतःच उठेल किंवा दूधवाला अथवा शेजारच्या काकू येतील किंवा अगदीच कथेची गरज म्हणून झालंच तर गॅसवर दूध ओतू गेलंय किंवा दोन फुलं एकमेकांजवळ येतील, अशा काहीश्या लेव्हलची आमची तयारी होती. 

म्हणून .. आम्ही गाफील राहिलो. तसे आम्ही नेहमी अलर्ट असतो. वादळापूर्वीची ती शांतता आम्हाला लग्गेच कळते. इतकं की मुलीला कळतच नाही अचानक तिला होमवर्क का करायला सांगितला किंवा अचानक फक्त टीव्हीचीच लाईट का जाते!  

पण आज मात्र ..  पण आज मात्र .. आपण मैदानाच्या मध्यभागी असताना अचानक पाऊस सुरु झाल्यावर कसं होतं.. तसं  झालं होतं  ..  अहो, एव्हढा गाफील तर शाहिस्तेखानपण नसेल हो!

आणि कायचा काय तो सीन .. एखाद्या हॉलिवूड मुव्हीमधील सीनलाही लाजवेल असं काही चाललं होतं .. 

अरे रिमोट कुठाय, तुझ्या जवळ होतं ना, अरे मेन स्विच ऑफ कर ना ई. ई. व्यर्थ सोपस्कार सुरु असताना शेवटी मुलगीच आमची दया येऊन म्हणाली “इटस ओके, मी डोळे बंद केलेत. डोन्ट वरी”. त्या गडबडीत तीस-चाळीस सेकंद गेले अन सीन संपला. 

लागोपाठ दोन वादळं येत नाही म्हणतात. तसं पुढच्या सीनमध्ये त्यांचा मुलगा उठला होता. तिघेही छान साप-शिडी खेळत होते. 

पहिल्यांदाच गाफील राहिल्यानं चिडलेली आमची ही म्हणाली, “जळला तो खेळ. सारं करून-सवरून झाल्यावर खेळ सुचताहेत.” .. लग्गेच प्रश्न “आई .. करून-सवरून म्हणजे काय ?”      

⁠⁠ओंकार संगोराम

अनुक्रमणिका

2 thoughts on “दारची फुले”

  1. हाः हाः हाः हाः हाः . लेखकाच्या नेहमीच्या खुमासदार विनोदी शैलीतले लेखन ! मजा आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *