दारची फुले

वाचू आनंदे

“पुस्तकाचे नाव – “वाळूत उमललेले फुल”

लेखक- डॉ.श्रीकांत मुंदरगी

सोमालियात जन्मलेल्या, रखरखीत वाळवंटात वाढलेल्या कृष्ण वर्णीय नायिका ‘वारिस डियरी’ ची ही कथा.झोपडपट्टीत वाढलेली कथा नायिका , तिच्या वाट्याला आलेल्या भीषण नरकयातना ,हाल अपेष्टा सोसुनही हार न मानत प्रतिकूल परिस्थितीत जगत राहिली,तिच्या संघर्षाची व यशाची ही कथा लेखकाने अगदी नेमक्या शब्दांत मांडली आहे.

‘वारीस’ एक वेगळंच नाव याचा अर्थ वाळवंटातील फुल हे अगदी शेवटी शेवटी कळते व छान वाटते. 

एके दिवशी पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्र छापून येतं आणि तिचं विश्व बदलतं. ती सुपर मॉडेल होते. तिला जाहिराती मिळू लागतात ,नामांकित फॅशन मॅगझिन्स मधून छायाचित्र छापून येतात व परिणामी न कळणाऱ्या व  मोजता न येणाऱ्या आकड्यांचे चेक मिळु लागतात. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहात न अडकता वारीस ‘फीमेल जेनायटल म्युटिलेशन’ सारख्या क्रूर प्रथेविरुद्ध चळवळ सुरू करते. याबाबत ओझरते ऐकले होते पण प्रत्यक्षात कोणाचातरी अनुभव प्रथमच वाचनात आला आणि ते करण्याची अघोरी पद्धत वाचून अंगावर काटा आला. थोडक्यात काय मुलगी जगली वाचली वेळ पडली तर विकली अशा सगळ्यातून जाऊन सुद्धा तिची जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता विचार करण्यासारखी आहे. सुडाचा विचार सुद्धा तिच्या मनात दूर दूर पर्यंत डोकावत नाही.परिस्थिती माणसाला सगळे शिकवते हेच खरे .अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचलेली वारीस डाऊन टू अर्थ असते. तिची जिद्द, आयुष्य जसे पुढे जाईल तसे जगत जाणे व ज्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागल्या त्यातून इतर मुली जाऊ नयेत म्हणून केलेले समाजकार्य खूप भावले.

लेखकाने अतिशय सुंदर व ओघवत्या भाषेत एक वेगळीच अकल्पनीय अनुभवांवर आधारित लिहिलेली ही सत्यकथा आपल्याला सुरवंटाचे फुलपाखरू होणे म्हणजे काय याचा अनुभव वाचताना पदोपदी देते एकूणच

“वाळूत उमललेल्या फुलाची” ही जीवन कहाणी प्रेरणादायी आहे हे नक्की!

— वैशाली तोरवी

-x-x-x-x-x-x-x-

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *