गजाननाय विद्महे नवग्रहाय धीमही

देवळांच्या नी घरांच्या प्रवेशद्वारावर अथवा मुख्य दरवाजावर विघ्नहर्त्या गणपतीची प्रतिमा पहाणं आपल्या अंगवळणी पडलेलं असतं. पण मध्यप्रदेशातल्या काही भागांत आपल्याला त्या जागी वसतीला आलेले दिसतात नवग्रह!
सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू ,शुक्र नी शनि हे सात आकाशस्थ ग्रह ओळीने उभे. नी राहू व केतु दोघे एकावर एक चढलेले असे ह्याच ओळीत सर्वात शेवटी उभे राहिलेले सापडतात. ते तसे का ह्याची गोष्ट …
समुद्र मंथनाची गोष्ट तर सगळ्यांना माहीतीच आहे. असं म्हणतात की समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या अमृत वाटपाची जागा होती, महाकाल उजैन!! विष्णूने मोहीनीचं रूप घेतलं नी अमृत वाटायला सुरूवात केली. आधी ते देवांना मिळणार होतं नी नंतर राक्षसांना. तेव्हा एक राक्षस क्लुप्ती लढवून देवांच्या रांगेत येऊन उभा राहीला. सूर्य नी चंद्राने ते पाहिलं आणि मोहीनी रूपातल्या विष्णूच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. मोहिनीने ताबडतोब सुदर्शन चक्र सोडून राक्षसाचे दोन तुकडे केले. पण तोवर अमृत राक्षसाने प्यायलेलं होतं. आणि त्याला अमरत्वही मिळालेलं होतं. त्यामुळे शीर नी धड दोन्ही स्वतंत्रपणे जिवंत राहीलं. शीर राहू झाला नी धड केतू झाला.
पण ग्रहांच्या पूजेत ह्यांना मान कसा? आणि साताच्या ऐवजी हे नवग्रह कसे झाले? तर त्याची गोष्ट
चंद्र सूर्यानी मोहीनीला सांगून दानवांची म्हणजेच त्या राक्षसाची चोरी उघडकीस आणली होती. त्यामुळे राहू केतू रागावले आणि दोघेही सूर्य आणि चंद्राचे वैरी बनले. लोकांच्या कामात अडथळे आणणे, विलंब लावणे, मनशांती घालवणे प्रकारांना त्यांनी सुरूवात केली. त्यांचा कोप होऊ द्यायचा नसेल तर त्यांना प्रसन्न करणे गरजेचं झालं. चंद्रसूर्य व इतर ग्रहांबरोबर ह्या दोघांची पूजा केली गेली तर त्यांचा उपद्रव कमी होईल ह्या उद्देशाने त्यांनाही पूजेत मान मिळू लागला.
आता दुसर्या गोष्टीचा उलगडा…
अथर्वशीर्षात गणपतीस म्हंटल्याप्रमाणे, सूर्यस्त्वं, चंद्रस्त्वं म्हणजे तू सूर्य आहेस, तू चंद्र आहेस. जनांना उत्साह हवं देणार्या मंगळाला उर्जा देणारा तूच आहेस. बुध ग्रहाच्या वरदानाने प्राप्त होणार्या बुद्धीची तू देवता आहेस नी गुरुमुळे प्राप्त होणाऱ्या विवेकाची देवता तूच आहेस. धन, पुत्र, ऐश्वर्य देणाऱ्या शुक्राला शक्ति देणाराही गणपतीच आहे. गणपती हा शनि प्रमाणेच न्याय करणाराही आहे. हत्तीचं मुख नी मानवाचं शरीर ह्याचा मिलाप राहू नी केतू प्रमाणे त्याच्यात झालेला आहे. थोडक्यात काय तर नवग्रहांचे गुण गणपतीत एकवटले आहेत.
म्हणजे कोणतीही पूजा करताना आरंभी गणपतीचे स्मरण करा किंवा नवग्रहांचे स्मरण करा. प्रवेशद्वारावरही गणपती असावा किंवा नवग्रह असावेत.
प्रत्येक ग्रहाचा स्वतंत्र मंत्र आहे. राहू केतूंना प्रसन्न करण्यासाठी म्हटलं आहे…
ओम छायादेवाय विद्महे, अर्कादेवाय धीमही,
तन्नो राहुः प्रचोदयात्।
ओम वाक्देवाय विद्महे, धृवादेवाय धीमही,
तन्नो केतुः प्रचोदयात्।
नेहा भदे