देवश्री अंभईकर धरणगांवकर
पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध? हा एक म्हटले तर सोपा आणि म्हटले तर खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. या विषयासंदर्भात माझ्या अल्पमतीला जे वाटते ते इथे मांडण्याचा प्रयत्न करते. मला वाटते पालक-पाल्य संबंधात मैत्री व शिस्त दोन्हीही समान महत्त्वाच्या बाबी आहेत. मैत्री तर कोणत्याही संबंधाचा/नात्याचा पाया आहे. कुठल्याही नात्यात मैत्री हा सदैव असणारा घटक आहे (constant factor). मैत्रीशिवाय कोणताही नातेसंबंध दीर्घकाळ टिकुच शकत नाही. मैत्रीचे प्रमाण कमी-जास्त असू शकते पण ती असतेच. अगदी गुरु-शिष्य संबंधातही गुरु हा शिष्याचा आधी एक हितचिंतक मित्र असतो. इथे मैत्रीला एक सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक वर्तणूक या स्वरूपाची म्हणता येईल. पालक-पाल्य संबंधही याला अपवाद नाही. पालक-पाल्य संबंधही मैत्रीपूर्ण असतातच त्याशिवाय त्या नात्याला अतूट प्रेम, विश्वास, माया, ममता, जिव्हाळा, आधार, काळजी, हितचिंतन, आदर, धाक इत्यादी असंख्य दिसणारे न दिसणारे कंगोरे असतात.
पालक होणे/आईवडील होणे ही एक अत्युच्च आनंदाची बाब असते पण त्याचबरोबर एक मोठी व महत्त्वाची जबाबदारीही असते. आपल्या पाल्याला एक उत्तम व्यक्ती म्हणून घडवायचे काम सोपे नक्कीच नसते. लहान मुलांना मातीच्या गोळ्याची उपमा दिली जाते. जसे घडवू तसाच आकार येणार! जे पेरले तेच उगवणार! पाल्यावर उत्तम संस्कार करायचे व न डगमगता भक्कमपणे जगाला सामोरे जायला शिकवायचे आणि हे करताना कुठेही अतिकठोर वागायचे नाही किंवा अतिलाडसुद्धा करायचे नाहीत अशी तारेवरची कसरत पालकांना करावी लागते. या संदर्भातले एक संस्कृत सुवचन फार समर्पक आहे…
लालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ।।
अर्थात पाच वर्षांपर्यंत मुलाचे लाड करावेत. दहा वर्षांपर्यंत भल्यासाठी रागवावे; (प्रसंगी कठोरपणे समज द्यावी.) मात्र सोळावे वर्ष लागले की मुलाशी (किंवा मुलीशी/पाल्याशी) मित्राप्रमाणे वागावे. या संस्कृत सुभाषिताशी मला तरी सहमत व्हायला आवडेल. अतिशय नेमकेपणाने पालकांनी पाल्याशी टप्प्याटप्प्याने कसे वागायला हवे हे सांगितले आहे.
पालक-पाल्य संबंधात शिस्तबद्धता काही टप्प्यांवर अधिक ठळक होते असे मला वाटते. जसे की मूल पुरेसे मोठे झाल्यावर साधारण पहिला टप्पा वयोगट सात ते दहा वर्षे आणि दुसरा टप्पा वयोगट दहा ते चौदा-पंधरा वर्षे. त्यानंतर पुन्हा मैत्री जास्त व शिस्तीला किंचित ढील द्यावी. या सात ते पंधरा वर्षांदरम्यान पाल्याचे संगोपन करताना मैत्रीसोबत दैनंदिन आचरणातील शिस्तबद्धता व उत्तम संस्कार पाल्याच्या अंगी बाणवणे अत्यावश्यक असते. हेच वय का? तर हे मुलांचे अत्यंत संस्कारक्षम वय असते शिवाय मुले जिज्ञासू असतात. खरेतर मुलांना शिस्त लावायची/शिकवायची म्हणजे काय तर पालकांनीच तसे शिस्तबद्ध आचरण करायचे. पालकांचे अनुकरण करूनच मुले जास्त चांगली शिकतात. काही गोष्टी हाताला धरून शिकवणे क्रमप्राप्त असते तर काही गोष्टीच अशा असतात की त्या मुले केवळ अनुकरणातून अधिक उत्तमप्रकारे आत्मसात करतात. मैत्री असो की शिस्त, दोन्हीचा समतोल आधी पालकांच्या स्वतःच्या इतरांसोबतच्या वर्तनातही असावा लागतो. पालकांचे एकमेकांशी व समाजाशी कसे संबंध आहेत ते मुले निरीक्षण करीत असतात. पालक बेशिस्त असतील तर मुलेही तशीच वागू शकतात.
मुले मोठी झाल्यावर, तरुण झाल्यावर मात्र पालकांचे त्यांच्याशी संबंध मैत्रीपूर्ण असायला हवेत. मुलांच्या या वयात त्यांना रागावून-मारून-मुटकून सांगणे योग्य नसते. अशावेळी काही समज द्यायची असेल तर ती मैत्रीच्या मार्गानेच देणे जास्त परिणामकारक असते. तरुण पाल्यांना समजून घेण्यासाठी पालकांना त्यांचे मित्र होणेच अपेक्षित आहे अन्यथा मुलांच्या भावविश्वातल्या घडामोडी कळणार कशा?
थोडक्यात पालक-पाल्य संबंध हे सदैव मैत्रीपूर्ण असावेत तसेच मुलांच्या संस्कारक्षम वयात शिस्तबद्धतासुद्धा असावी. नात्यातील मैत्री आयुष्यभर असते/असावी पण वर म्हटल्याप्रमाणे शिस्तबद्धतेचे टप्पे असावेत. शिस्तबद्धता किमान दोनप्रकारची म्हणता येईल. पहिली आचरणातील शिस्त. उदाहरणार्थ वेळेवर उठणे-झोपणे, वस्तू जागच्या जागी ठेवणे, नीट जेवणे, पानात न टाकणे वगैरे. इथे शिस्त म्हणजे चांगल्या सवयी म्हणता येईल. दुसरी विचारांतील शिस्त उदाहरणार्थ वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान राखणे, आईवडीलांचे उपदेश ऐकणे, मोठ्यांच्यामध्ये विनाकारण न बोलणे, चारचौघात नीट बोलणे इत्यादी. विचारांची शिस्त म्हणजे आपण मर्यादेचे, आदराचे संस्कार म्हणू हवे तर. ह्या मुलांच्या मनात आपोआप रुजत जाणाऱ्या गोष्टी असतात. कधी कधी लहानपणी उर्मटपणे वागणारी मुले मोठेपणी कमालीची नम्र व संयमी झालेली दिसतात किंवा उलट होते. त्यांना आलेल्या अनुभवांवर त्यांचे वर्तन घडते. यातील शिस्तबद्ध आचरण शिकवण्याचे एक वय असते एकदा ते वय निघून गेल्यावर पुढे पालकांनी कितीही प्रयत्न केले तरी तरुण मोठ्या पाल्याला शिस्त लागेलच असे नाही. ते फार कठीण असते. या सुरुवातीच्या वर्षांत जी शिस्त व संस्कार मुलांना मिळतात, ज्या चांगल्या सवयी लागतात त्या आयुष्यभर कायम राहतात. उपयोगी पडतात. पालकांप्रती प्रेम, आदर आणि वाटणारा थोडासा धाक हा बालपणी अत्यावश्यक असतो. पालकांचे पाल्यावरचे आणि पाल्याचे पालकांवरचे प्रेम जसे एक सकारात्मक वातावरण तयार करते व मुलांना चांगल्या गोष्टी करायला व शिकायला उद्युक्त करते तसेच पालक-पाल्याचे शिस्तबद्ध संबंधही पाल्याला चांगल्या सवयी लावू शकतात. त्या धाकामुळे किंवा त्या शिस्तीमुळेच आयुष्यात पुढेही (पालकांच्या अनुपस्थितीतही) मुले चुकीच्या मार्गावर जायला सहसा धजावत नाहीत.
मुलांच्या सोळाव्या वर्षापुढे मैत्री फार महत्त्वाचे काम करते. मुलांचे भावविश्व विस्तारलेले असते. तारुण्यात पदार्पण झालेले असते. एकीकडे पालकांचीही वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल सुरू होते. अशा वेळी दोन पिढ्यांमधली वैचारिक दरी (generation gap) मैत्रीच भरून काढू शकते. शिस्तीचा कठोर बडगा उगारला तर तो झुगारून तरुण पाल्य बंडखोर वागण्याची शक्यता असते.
पालक-पाल्य संबंधात मैत्री व शिस्तबद्धता यांचा व्यवस्थित समतोल साधलेला असणे कधीही उत्तम! ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ या उक्तीनुसार दोन्हीचा अतिरेक बरा नसतो. अतिमैत्रीपूर्ण संबंधामध्ये मुलांना नको त्या वयात अतिस्वच्छंदपणा, अतिस्वातंत्र्य मिळाल्याने पालकांप्रती आदराचे किंवा मर्यादेचे भान जाऊ शकते. पालकांच्या वयाचा, अनुभवाचा, त्यांच्या पाल्याचे हित बघून वेळोवेळी चांगले सल्ले देण्याच्या स्वाभाविक वर्तनाचा पाल्याकडून मान राखल्या जाईलच याची शाश्वती नसू शकते. अतिमैत्रीपूर्ण वागल्यामुळे मुले शेफारून जाऊन प्रसंगी मुलांकडून वडीलधाऱ्यांचा उपमर्द होतानाचे चित्रही दिसते. मुलांना त्यांच्या लहान वयात चांगल्या-वाईटाची जाण असेलच असे नाही तेव्हा अशावेळी पालकांनी त्यांना शिस्त लावणे अपरिहार्य असते. तेच मुलांसाठी योग्य असते.
एकदा का मुले मोठी झाली की त्यांचेही एक स्वतंत्र विश्व निर्माण होते. समवयस्क मित्र-मैत्रिणींचे वर्तुळ विस्तारते. कधी चुकीची संगतही लागू शकते. मार्ग भरकटू शकतो तर कधी त्यांना त्यांची स्वतःची दिशाही गवसलेली असू शकते जी पालकांच्या मतांपेक्षा निराळी असू शकते. तरुण मन हळवे असते अशा वेळी पालकांनी मुलांशी कठोर न वागता हळुवारपणे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना पालकांशी कोणत्याही विषयावर बोलताना संकोच वाटणार नाही इतपत तरी मैत्रीपूर्ण वागायला हवे. ती चुकत असतील तर त्यांना योग्य शब्दांत नकारात्मक वाटू न देता भावी धोक्यांची जाणीव करून देऊन योग्य काय ते सांगायला हवे. एकंदरीत तरुण, वयात आलेल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध अत्यावश्यक ठरतात.
कोणत्या वेळी कडक शिस्त लावायची, कोणत्या वेळी प्रेमाने समजवायचे, कोणत्या वेळी दोन्हीचा मेळ घालून योग्य तो परिणाम साधायचा हे गणित जमणे हेच पालक-पाल्य यशस्वी संबंधाचे सूत्र आहे.