सनविवि माहितीपूर्ण लेख पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध

पालक आणि पाल्य संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध

वर्षा सबनीस

दुपारची वेळ होती . सगळे आपापल्या कामाकरता घराबाहेर पडले होते . स्वयंपाक घरातील आवरासावर आटोपून आई जरा आडवी झाली होती. तेव्हढ्यात दादा घरात आला . चेहऱ्यावरून काळजीत दिसत होता . सरळ त्याच्या खोलीत गेला आणि दार लावून घेतले . आई त्याला हाका मारत होती पण त्याने काहीच उत्तर दिले नाही . जरा वेळ वाट बघून आई उठली . दार वाजवले आणि जरबेच्या स्वरात म्हणाली , “ बेटा, लगेच दार उघड “ …आईचा कडक आदेश दादा डावलू शकला नाही . त्याने हळूच दार उघडले.

       आई अगदी शांतपणे त्याच्या जवळ बसली . प्रेमाने पाठीवरून हात फिरवून म्हणाली , “जे असेल ते मोकळे पणाने सांग.” असे म्हणता क्षणी दादाचा बांध फुटला . परीक्षेत शेजारच्या मुलाने एका प्रश्नाचे उत्तर विचारले तर दादाने त्याची उत्तरपत्रिका अशी सरकवून ठेवली, की त्या मुलाला उत्तर दिसेल . चाणाक्ष शिक्षिकेच्या नजरेतून हे सुटले नाही . दादाला आणि त्या मुलाला दोघांना परीक्षा हॉल मधून बाहेर काढले . एरवी चांगल्या मार्कांनी पास होणाऱ्या हुशार दादा कडून शिक्षकांना ही अपेक्षा नव्हती. आई आवाक झाली . तिला काही सुचेना. तिलाही हा मोठ्ठा धक्काच होता . काही क्षण शांततेत गेले पण आई लगेच सावरली . दादाला जवळ घेऊन तिने त्याची समजूत काढली . शाळेत जाऊन शिक्षकांची माफी मागितली . प्रकरण निवळले .

        ही गोष्ट आजपासून ५० वर्षापूर्वीची . आपण केलेली चूक कबूल करायलाही धाडस लागते .त्याहून जास्त होता , आईवडिलां वर असलेला विश्वास .झालेल्या प्रकरणातून आपले आईवडीलच आपल्याला बाहेर काढू शकतील हा विश्वास होता . केलेल्या चुकीची कबुली देणे ही लहान सहान गोष्ट नाही . दादाची चूक नक्कीच होती . पण प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी काहीतरी चूक होतेच . प्रश्न असतो त्या चुकी करता त्याला शिक्षा करायची की माफ करायचे . दादा त्याची चूक कबूल करू शकला, कारण प्रामाणिकपणा हा घरातल्या शिस्तीचा भाग होता . आई जवळ मन मोकळे करू शकला, कारण आईशी त्याचे नाते मैत्रीचे होते .शाळेत घडणाऱ्या गमतीजमती सांगायला , मन मोकळे करायला आईच सदैव असायची .

           आता शिस्त म्हणजे काय ? पालकांबद्दल वाटणारी भीती की स्वतःला घालून घेतलेले नियम?  सकाळी लवकर उठणे हा शिरस्ता पालकांनी घालून ठेवलेला असला, तरी सर्वांना सकाळच्या साखर झोपेतून उठणे जीवावरच येते. पण जेव्हा आपण लवकर नाही उठलो तर बाबा रागावतील, अशी जेव्हा पाल्याच्या मनात भीती असते ती म्हणजे शिस्त . लहानपणापासून शिस्तीत वाढलेल्या पाल्यांमध्ये ही शिस्त आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत डोकावते . अगदी घरात शिरताना पादत्राणे काढून जागेवर ठेवणे , किल्ल्या जागेवर ठेवणे , हातपाय धुवून मग इतर कामांना सुरुवात करणे इथ पासून ते नंतरच्या व्यावसायिक आयुष्यातही, नेमून दिलेली कामे नियमित करणे, कामातील नीटनेटकेपणा , सुसंबद्धता ,सुसूत्रता इत्यादीत शिस्त दिसून येते . अशी शिस्त पाल्यांमध्ये रुजवण्याकरता पालकांनी पाल्यांशी थोडे कडक शिस्तीचे वर्तन ठेवायलाच हवे, पण त्याबरोबरच त्या नात्यात प्रेम आणि विश्वासही हवाच . घरातील नियम बंधने चांगल्या करताच आहेत हे पाल्यांना पटवून देण्याची जबाबदारी पालकांची असते.

           पालक आणि पाल्याचे नाते , मुलांच्या लहानपणी शिस्तपूर्ण असायला हवे . तेंव्हा मातीला तुम्ही जसा आकार द्याल , तसा तयार होतो . चांगल्या सवयी लावणे, चांगले संस्कार देणे ह्याकरता शिस्त ही हवीच . तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना हेच नाते मैत्रीचे असायला हवे . तेंव्हा मुलांचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, भावनांना धुमारे फुटतात .तारुण्याची सळसळ पाल्यांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते आणि तेव्हा शिस्त, बंधने, नियम धाब्यावर बसवले जातात .अशावेळी जर पालक मुलांचे चांगले मित्र बनू शकले तर त्या मुलांचे रूपांतर  सुजाण नागरिकात होऊ शकते . अन्यथा हीच बंधने झुगारून मूले वायाही जाऊ शकतात . मुलांना आवश्यक तेवढी सूट देऊन त्यांच्यावर प्रेमाने आणि विश्वासाने संस्कार केले पाहिजे. अती कडक शिस्त सुद्धा काही उपयोगाची नाही .तरुण मुलामुलींनी व्यवस्थित, अंगभर कपडे घालून कॉलेज मध्ये जावे अशी  शिस्त असली तरी आधुनिक फॅशनेबल कपडे घालून मॉडर्न दिसावे अशी पाल्यांची इच्छा असते . मग काय करायचे ? यातून सुवर्णमध्य गाठणे अवघड होते .कडक शिस्त असलेल्या घरात, मुले चोरुन पालकांच्या नकळत भडक उत्तान कपडे घालतात आणि नको ते प्रसंग ओढवून घेतात .तारुण्यसुलभ भावनांना योग्य दिशा देण्याकरता , पालक जर त्यांचे मित्र झाले तर मुले आपले मन मोकळे करू शकतात . मोकळेपणाने आपले मत मांडू शकतात आणि असे नाते सशक्त होते .

               दहा बारा वर्षांची मुले , त्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या घटना , मोठ्ठ्या चे वागणे इत्यादी फार बारकाईने बघत असतात आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करतात . आमच्या परिचयात एक असे कुटुंब होते . त्यांच्याकडे पार्ट्या, मित्रांचे गेट टुगेदर असे समारंभ सतत सुरू असायचे . आजकाल पार्ट्या म्हटले की नाचगाणे , मदिरापान ओघाने आलेच .लहानपणापासून असे कार्यक्रम बघून मुलांना त्यात काहीच वावगे वाटत नाही . पण ह्या कुटुंबातील मोठ्ठ्या माणसांनी हे फार चांगल्या पद्धतीने हाताळले आहे . मित्रत्वाच्या नात्याने मुलांना जबाबदारीने कसे वागायचे हे नीट समजावून सांगितले . त्यांची मुलं कर्तबगार आणि हुशार निघाली . हे शक्य झाले ते पालकांचे मुलांशी असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या संवादामुळे .

               पालक पाल्यांच्या नात्यात शिस्त तर अविभाज्य घटक असतो पण त्याच बरोबर प्रेम, विश्वास आणि मैत्री हे ही अनिवार्य घटक असायला हवे. आजच्या युगात तर ह्या नात्याची जबाबदारी फार मोठी आहे. बदलत्या युगात, मुलांना बाहेरच्या जगात सैरभैर करणारी अनेक प्रलोभने आहेत . त्या आकर्षणापासून दूर ठेवणे केवळ अशक्य आहे. मग अश्या परिस्थितीत  पालकांनी काय करावे ? मुलांना सतत घरात डांबून ठेवणे, त्यांना सामाजिक माध्यामांपासून लांब ठेवणे किंवा सतत त्यांच्या मागावर राहणे हे अगदीच अशक्य आहे ,चुकीचे आहे . मुलांशी सतत संवाद साधणे ही आजच्या काळाची गरज आहे . इंटरनेटच्या  माध्यमामुळे संपूर्ण जग तुमच्या बोटांमध्ये सामावले आहे .त्यात काय चांगले आणि काय वाईट हे ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण करायला हवी . जर आईवडील आणि मुलांमध्ये जर मैत्रीचे नाते असेल, तरच हे शक्य होऊ शकेल .कुठलीही गोष्ट का करायची नाही हे समजावून सांगायला पाहिजे . सतत मोबाईल वापरण्या मुळे होणारे तोटे आपण सगळेच जाणून आहोत . मुलांना ते नीट सांगून त्यांच्या पचनी पाडणे गरजेचे आहे .याउलट त्यांचा मोबाईल काढून घेणे म्हणजे त्यांच्यात विद्रोह निर्माण करण्यासारखे आहे .

          पालक पाल्यांचे असे नाते, खूप नाजूक पण घट्ट मैत्रीचे ही असावे . शिस्तप्रिय पालक आणि मुलांचे मित्र, ह्या दोन्ही भूमिकेतून  सहजगत्या संचार करता यायला हवा.  

          शिस्त ,विश्वास आणि मैत्रीची ही गुंफण असेल तर सुजाण,जबाबदार आणि सुसंस्कृत पिढी तयार होणार हे निर्विवाद सत्य आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *