
लेखक महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामांकित पत्रकार आहेत .या पुस्तकातील लेख चार विभागात विभागले आहेत. पहिल्या विभागात लेखकाच्या दिल्लीतील वास्तव्यात अनेक मंत्री, नेते यांच्याशी स्नेहाचे नाते निर्माण झाले त्यातून त्यांनी विविध नेत्यांचे, त्यांच्या कार्यशैलीचे निरीक्षण केले. तसेच काही विशेष वास्तू, स्थळे ,स्मारक ,कलाकृती व सांस्कृतिक घडामोडी यावरील लेख आहेत . दुसऱ्या विभागात साहित्यिक क्षेत्रात त्यांच्या लेखणीनी कसा उत्स्फूर्त संचार केला आहे व राजकीय घडामोडींचा साहित्यिक घडामोडींवर कसा प्रभाव पडु शकतो याचे वर्णन आढळते.तिस-या विभागात दूरदर्शनवरील गेम शोज, मुलाखती घेण्याच्या पद्धती यावरही त्यांनी मार्मिक भाष्य केले आहे तर चौथ्या विभागात वाळवंटोत्सव व निसर्ग रम्यता यांचा संवेदनशील व कलासक्त मनाने केलेले वर्णन पर लेख आहेत.यातील मला आवडलेल्या लेखांविषयी थोडेसे…
शक्तीस्थळ –
राजधानी दिल्लीतील श्रीमती इंदिरा गांधींची ‘शक्ती स्थळ’ ही समाधी म्हणजे निसर्गातच उमलणारे निसर्गाचे सुंदर शिल्प आहे.हे स्मारक म्हणजे राखी तांबड्या रंगाचा उंच उंच उभा खडक !त्याच्या आजूबाजूला देशातील विविध विभागातील नानाविध खडकांचे एक संग्रहालय साकारले आहे.हे खडक ओबडधोबड नाहीत तर विविध आकारांचे विलक्षण देखणे आहेत .हे खडक निर्जीव वाटत नाहीत तर ते पाहताना आपोआप पाषाणाची स्पंदन कानात गुणगुणू लागतात. श्रीमती गांधींचं प्रतीक म्हणून उभारलेला हा खडक लोखंडाच्या खाणीत मिळालेला आहे .ग्रॅनाईट पेक्षा दहापटींनी तो टणक,कठीण आहे. देशाच्या प्रत्येक राज्यातून आणलेले एकूण साडेआठशे खडक जसे सापडले त्याच अवस्थेत शक्ती स्थळावर ठेवले आहे.श्रीमती गांधी भारताला शक्ती मानत, म्हणून या जागेला ” शक्तिस्थळ” असं नाव दिलं आहे.
संसदोपनिषद –
राज्यसभेत आर के नारायण, रविशंकर ,अमृता प्रीतम व एम एफ हुसेन हे चौघे कलावंत सभासद होते .त्यावेळी एम एफ हुसेन यांनी आपल्या कुंचल्यातून जी रेखाटने केली ती ” संसद उपनिषद” या नावाने प्रसिद्ध झाली. ही कृष्णधवल रेखाटने आहेत .हुसेन तसे मौनी खासदार ,आपल्या सहा वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी एकदाही भाषण केलं नाही परंतु मनाच्या कॅनवास वर माणसांच्या नोंदी होत गेल्या आणि हातातल्या स्केचपेनने झरझर रेखाटने आकार घेत गेली. हुसेन यांची ही चित्रे व्यंगचित्र नाहीत तर फुटत जाणाऱ्या उद्रेकाचे आवाज आणि भगभगत्या धरतीला तडे पडताना येणारे हुंदके यांचं हे चित्र आहे. संसदेतील, राज्यसभेतील काही दृश्य तसंच काही व्यक्तींची ही रेखाटने आहेत.ही चित्र नि:शब्द असली तरी त्यातील रेषा एवढ्या बोलक्या आहेत की त्या केव्हाही तांडव करू लागतील असं वाटतं. एका चित्रात वाजपेयी व अडवाणी यांचे पाण्यावर वाहणारे चेहरे आहेत व त्याखाली लिहिलं आहे ‘तरंगत्या पाकळ्या.’
हुसेन यांच्या मते संसदेत असताना शेकडो रेखाटन करताना आपल्या या देशाचे व त्यातील जनतेचे गहिरे ज्ञान त्यांना प्राप्त झालं हे त्यांचे भाग्य,पण आपल्या भारतीय संसदेच्या रोजच्या कामकाजात दुसऱ्या कोणत्याही भडक घटकापेक्षा अधिकाधिक सांस्कृतिक वृत्ती मिसळावी असं त्यांना वाटतं आणि सम्राट अशोक व अकबर यांच्या सुवर्ण युगाचं स्मरण करावं.
‘पाक साहित्य ‘
अन्नपूर्णा या खाद्यपदार्थाच्या पुस्तकाची ७५ वी आवृत्ती झळकली आणि लेखिकेला ३५ लाख रुपये मानधन मिळाल्याचं न भूतो न भविष्यती असं वृत्त झळकलं आणि सर्व लेखकांनी पाककलेवरील पुस्तके लिहिण्याचा निर्धार केला. गो .नी दांडेकर यांचे ” कुणा एकाची रसना गाथा” ,पु लं चं” हास्यागार”,वि. स्. खांडेकरांचे ” पोटाची हाक” तर दिलिप चित्रे यांचं ” पुन्हा पोटाराम” अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. प्रत्येकाच्या लिखाणाच्या शेली प्रमाणे त्यांनी पाक कृती विषयी जे लिखाण केले त्याचे अत्यंत खुसखुशीत वर्णन लेखकाने केले आहे.पुढे जाऊन लेखक म्हणतात या पुस्तकांचे प्रकाशन समारंभ न होता पंगत समारंभ होऊ लागले.सारं वांङ्मय विश्व ‘ सुजलाम,पाक साहित्य सुफलाम ‘ होऊन गेलं.
आलं ,आलं वाङ्मयीन युतीचं सरकार आलं!
महाराष्ट्रात शिवशाही आली , युतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा सारं कसं सुखात चाललं होतं. पण हळूहळू बाणात घुसला अहंकार आणि कमळात शिरला वारा! कुजबूज, कलकल ,कडकडाट अशा टप्प्याटप्प्याने कलहाचा कली शिरला .वर्गणीची खंडणी झाली आणि मायबोलीची आय- माय बोली झाली. तेव्हा लेखकांना एकाएकी जाग आली व आपण सुद्धा पुढारी बनायला लायक आहोत असा त्यांचा रास्त समज झाला व त्यांनी निवडणुकीत उतरायचे ठरवले. मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि साहित्य महामंडळ यांनी एकत्र येऊन “वांग्मय सेना” नावाचा पक्ष स्थापन केला तर कोकणातील संघ,लेखक मंच,परिषदा यांनी “कोमसाप”स्थापन केला व जागतिक मराठी परिषदेचा “जामप” हे ३ मुख्य पक्ष निवडणूकीत होते. त्यापैकी सेनेचे चिन्ह ‘शंख’, कोमसाप चे ‘शहाळं’तर जामप चं चिन्ह ‘शाल’ हे होते.
मतदानानंतर सेनेला ९० तर कोमसापला ४० जागा मिळाल्या व युतीचे सरकार स्थापन झालं .आळंदीला ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीपुढे सबंध मंत्री मंडळाचा शपथविधी पार पडला व गंगाधर गाडगीळ मुख्यमंत्री झाले! खाद्य मंत्री सुरेश भट, सांस्कृतिक रवींद्र पिंगे, काव्य नियोजन नारायण सुर्वे इत्यादी इत्यादी.नव्या सरकारने राज्याचं बोधवाक्य ” साहित्यमेव जयते” असं केलं.लेखक तिथे स्मारक , प्रत्येक घराच्या दारात बांबुचे झाड,,दुर्बोध शब्दावली तयार करणे, दरडोई २ अत्तराच्या कुपीचे वाटप,मोफत श्रीखंड पुरी योजना अशा एकुण ९० हजार कोटींच्या योजना मंजूर झाल्या.पण नंतर काहीच दिवसात वांग्मय सेनेत फूट पडली काही कोमसाप मध्ये तर काही जामपमध्ये सामील झाले. कोणत्याही गटाचं बहुमत होईना, वाद, भांडण उफाळून आली , गटबाजी ,हेवे दावे पराकोटीला पोहोचले. जनता कंटाळून गेली, चक्रावली. या साहित्यिक राजकारण्यांपेक्षा खरेखुरे राजकारणीच परवडले म्हणून त्यांनी पुढील निवडणुकीत रिमोट शाहीत आणण्याचा निर्धार केला व महाराष्ट्रातील पहिलेच वांग्मयीन सरकार आपल्याच पावलांनी पराभवाची वाटचाल करू लागलं!
माध्यमांवर प्रकाश टाकताना,”कौन बनेगा करोडपती” या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाची किर्ती थेट स्वर्गलोकापर्यंत पोहोचल्याने चेंज म्हणुन देव मंडळींमध्ये कोण कोण HOT SEAT वर विराजमान झाले त्यांची प्रश्नोत्तरे वाचताना खूप मजा येते.हॅलो सखी ,फोन इन कार्यक्रमात जर वैमानिक, कुंभार असे कोणी फोन केले की निवेदिका आणि फोन करणा-यातील संवाद मोठे गमतीदार असतात .” मिक्स बाई मिक्स” मधे मिक्सिंग आणि रिमिक्स चा जाहिरातदार, राजकारण,चित्रपट, नाटकं, दुकानदार कसाही वापर करु लागले आहेत हे उदाहरणांतुन सांगितले आहे.पत्रकारितेच्या भाषेत सांगायचे झाले तर माध्यमांचा समाचार घेतला आहे.
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश म्हणजे “वृक्षरत्नजडीत” वैभवाचा अपार खजिनाच आहे. निसर्ग त्याच्या अस्सल विराट स्वरूपात रूप संपन्न दिमाखात विखुरलेला आहे. इथल्या हवेत एक रासवट रान धुंदी आहे आणि नद्यांच्या खळखळाटात बेभान करून टाकणारी शाश्वत लय आहे. सबंध प्रदेशात जंगलाची जणू प्रचंड गुहाच आहे.गूढ वलयात लपेटलेल्या या निसर्गरम्य ठेव्याबरोबरच नाना प्रकारच्या परंपरा, संस्कृती याचही अद्भुत भांडार आहे .या पर्वत विभागात २६ प्रकारच्या मुख्य आदिवासी जमातींचे वास्तव्य असून त्यांचे पोशाख, सण ,उत्सव ,चालीरीती थक्क करून टाकणाऱ्या आहेत. येथील बहुतेक आदिवासी सूर्य व चंद्राला देव मानतात सूर्याला ‘दोनी’ व चंद्राला ‘पोलो ‘ म्हणतात ,तेव्हा दोनी- पोलोचं स्तवन ,पूजा येथील सण -उत्सवात पाहायला मिळते. ‘मिथुन’ हा गाय बैलासारखाच प्राणी पण त्याची शिंग अत्यंत प्रमाणबद्ध ,वळणदार असतात .याला आदिवासींमध्ये विशेष स्थान आहे तो पवित्र मानला जातो. संपत्तीचा मानदंड ही हा मिथुनच. आपापसातील तंटे सोडवण्याची प्रचलित असलेली ‘ केबांग’ ही पद्धत शहरवासीयांनी अनुकरण करावी अशी. ‘केबांग’ मधील निर्णय एकमताने घेतले जातात व न्याय देण्याचे काम ही ‘केबांगच’ करते .यामध्ये गावातले कुटुंब प्रमुख सदस्य असतात. लेखकाच्या मते अरुणाचलमध्ये भटकताना जणू रानभूलच चढली, डोंगरावरचे रस्ते रेघोट्यांसारखे दिसत होते नि आसपासचे जंगल ,त्यातला शुद्ध रानवारा वेगळीच झिंग आणत होता.
जैसलमेरचा वाळवंटोत्सव
जैसलमेरच्या सोनेरी किल्ल्याच्या शिरेबंदीला काव्याचे धुमारे फुटतात, संगीताची कारंजी उसळतात आणि मोहक चांदरात गात्रागात्रांना अनोख्या जादूनं भारावून टाकते ती वाळवंटी उत्सवात!
जैसलमेर चा दगड पिवळट आहे सूर्याची किरणं त्यावर पडताच तो सोन्यासारखा झगमगू लागतो म्हणूनच तर त्याचं नाव सोनेरी किल्ला पडलं .हा किल्ला ओसाड नाही तर त्यात मूळ जैसलमेर गाव वसलेलं आहे .त्यात माड्या, सदन, घर, दुकान सारं काही आहे. वाळवंटोत्सवात हा किल्ला हे खरं मुख्य पात्र आहे .नाटकातील पडद्याप्रमाणे या किल्ल्याचा वापर होतो. त्याचं विशाल रूप आणि त्यात दडलेला इतिहास उत्सवाला गूढ रम्यतेच्या पातळीवर नेतात. दरवर्षी हा उत्सव होतो.तेथील रेताड जमिनीतून उमलणारी ही संगीत नृत्याची -पालवी आणि या सर्वांचा साक्षीदार ,काळाचा पहारेकरी तो सोनेरी किल्ला. गत वैभवाचे अलंकार अंगा खांद्यावर मिरवणाऱ्या जैसलमेरच्या हवेल्या, निर्मनुष्य तरीही काळाच्या गहिऱ्या गुहेत ओढून नेणारी खेडी आणि काळाच्या रेषांची वाळू वरची रांगोळी हे सारे आवर्जून पाहण्यासारखा आहे.
यातील सर्वच लेख वाचनीय तर आहेतच आणि लेखांतुन अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळते.काही प्रदेश, वास्तू, स्मारके यांना अवश्य भेट द्यायलाच हवी ,वालुकोत्सव अनुभवायला हवा हे जाणवलं !!अत्तराच्या थेंबाचा सुवास अनेक दिवस मनात रेंगाळत राहिल हे नक्की.
महाराष्ट्र मंडळ वाचनालय पुस्तक क्रमांक -५३२५.
वर्ग – विविध
वैशाली तोरवी
