प्रिय गिरिराज

।।श्री।।

इंदौर

१६–५–२२

              प्रिय गिरिराज,

                           माझ्यासाठी गिरिराजच. मी पाहिलेला सर्वात मोठ्ठा डोंगर, माझ्या इतक्या जवळ व जवळचा. आयुष्याच्या प्रवाहाबरोबर खूप दूर आले तुझ्यापासून. पण मी भाग्यवान, आयुष्यातील तीन-चार वर्षे तुझ्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात गेली. तुझ्या पठारावर कोयना-प्रकल्पाचे काम सुरू झाले, वडिलांच्या नोकरीमुळे ‘पोफळी ‘ गांवात आम्ही रहायला आलो.मी तेव्हा सात-आठ वर्षांची असेन. तुझ्या उतारावर बांधलेल्या सरकारी वसाहतीत आम्ही रहात होतो. कोयनानगरहून येणारा रस्ता तुझ्या गर्द झाडाझुडुपांतून वळणावळणाने उतरत गांवात पोचत होता. तुझ्या अंगाखांद्यावर खेळत, चढत, उतरत ती वर्ष संपली. झाडाझुडुपांतून,करवंदाच्या जाळ्यांतून,मैत्रिणींबरोबर हिंडले, नवनविन वाटा शोधल्या, लपंडाव रंगला, पाय दुखले, काटे टोचले, ओरखडे उठले, खरचटलं, पण आमचे खेळ कधी थांबले नाहीत. करवंद,उंबरं,भोकरं,कच्च्याकैऱ्या,कुडाची फुलं कितीतरी गोष्टी पानांचे द्रोण करून त्यात भरून घेत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा सर्व पोरासोरांचे हेच खेळ.

                                                                         भर उन्हात झाडाखाली थांबून आमच्या रानमेव्याची वाटणी करून आस्वाद घेत असू तेवढ्यात अचानक आभाळात ढगांची गर्दी होई,सगळीकडे सावली पसरे,तुलाही थंडावा मिळे,वारा तर आनंदाने वेडावून चारी दिशांनी सुसाट धांवत सुटे,झाडपानांतून शीळ घालत घोंघावत फिरे पालापाचोळा धुळीसकट सगळीकडे उधळून देई.सर्वत्र अंधारून येई,धूळ डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरत,कसेबसे आम्ही घराकडे पळत असू,तेवढ्यात फटाफट सरसरत पावसाचे थेंब चारी बाजूने टपटपू लागत.अचानक भेट देणारा हा वळवाचा पाऊस… आsहाsहाsय याची मजा कांही औरच.टपोऱ्या थेंबांबरोबर टपाटप जमिनीवर आपटणाऱ्या,पडून इकडे तिकडे उडणाऱ्या गारा. आम्ही घरी जायचं विसरायचो,जमिनीवरून उडून गिरक्या घेत वरवर जाऊ पाहणाऱ्या पाल्यापाचोळ्या सारखे आम्ही पण ‘ गाऱ्या,गाऱ्या,भिंगोऱ्या ‘म्हणत गोल-गोल गिरक्या घ्यायचो.वाऱ्याने थरथरत, पावसाचा मारा चुकवत गारा वेचायचो,गारठलेल्या हाताने हावऱ्यासारख्या फ्रॉकच्या सोग्यातच भरून घ्यायचो. तोंडात विरघळणाऱ्या गारांचा शुद्ध गारवा म्हणजे…. सगळी आइस्क्रीम, बर्फाचा गोळा तुच्छ त्यापुढे. हा पाऊस लगेच निघूनही जातो….. काळ्या कातळावर, तांबड्या मातीवर,धुरकट वाळक्या पानांवर चांदणं शिंपडावं तसा गारा पसरवून जातो. तुझ्यासारखा तप्त समंधसुध्दा या गारव्याने सुखावतो, पोटांत दडलेल्या म्रुद्-गंधाची कुपी वाऱ्याबरोबर उधळून टाकतो. हलकीशी शिरशिरी आणणारा गारवा, मनभरून घेतलेला ओल्या मातीचा मादक गंध,तरुणांना वेड लावणारा व कविमनाला फुलवणारा हा अनुभव आम्ही नकळत्या शाळकरी वयांत अगदी समरसून घेतला व अजूनही उराशी जपला आहे.

                                                                                 आजकाल इथे उकाड्याने जीव अगदी हैराण झाला आहे आणि पाऊस अकारणच लांबला आहे. पाऊस इथे नेहमीच वाट पहायला लावतो रे,चातक पक्ष्यासारखी अवस्था होते, तसे इथे ढग खूप येतात, सूर्याशी लपंडाव खेळतात आणि वाऱ्याचा हात धरून पळून जातात, मग मला तुझी आठवण येणारच ना.तुझ्यापुढे काय बिशाद ढगांची पळून जायची,तुझ्यासारखा तगडा पहारेदार कोतवालासारखा वाट अडवून उभा… चोरांनी मुकाट्याने माल टाकावा तशी समुद्रावरून आणलेली लूट ओतत तुझ्यापुढे. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट आगमनाची वर्दी देत आहेत तोवर पावसाच्या धारा येतच.आणि तिथे एकदा पाऊस सुरु झाला की उसंतच नाही… अगदी मुसळधार पाऊस. तिथे बसून मनसोक्त पाऊस पाहिला घराच्या ओसरीवर बसलो असलो तर अंगणाभोवतीचं कुंपणसुध्दा दिसत नसे असा धारांचा दाट पडदा तयार होई.कुंपणापलिकडचा परिसर तर ढगांतच लपून जायचा. फिक्कट राखाडी रंगाचे मेघ अंगणातून जातांना दिसायचे, वरवर चढून जायचे. पूर्ण आसमंताला चिंब भिजवून टाकायचा हा पाऊस. आषाढ संपेपर्यंत तर पावसाला उसंत मिळून उघडीप व्हायची शक्यता कमीच. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळालेलीच असे.तुझ्या उजव्या डाव्या बाजूस तुला लगटून तुझे दोन मित्र उभे होते. तेही यांत तुला सर्वतोपरी साथ देत. समोरचा डोंगर थोडा दूर होता, लहानही वाटे.पायथ्याशी गांवात व सर्व डोंगर उतारांवर भातशेती चाले.

                                                                            श्रावणांत ऊन-पावसाचा लपंडाव रंगत असे व निसर्गाचे मनोहारी रूप पाह्यला मिळे.काळ्या कातळाचा कभिन्नपणा अभिमानाने मिरवत सारे डोंगर सचैल स्नान करून ओलेते निथळत उभे. सर्व बाजूंनी ओघळणारे असंख्य पाणलोट, लहानमोठे झरे गांवातल्या चिमुकल्या वासिष्ठी नदीला सम्रुध्द करत,ती गर्वाने खळाळत उड्या मारत धावू लागे.डोंगरावरील झाडांचा गहिरा हिरवा रंग, जमिनीवर अंथरलेला फिक्कट तजेलदार हिरवळीचा मखमली गालिचापछोट्या झुडुपांवर पसरलेल्या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा त्यावर चमचमणारे पाण्याचे थेंब व क्वचित् डोकावणारी पिवळसर सोनेरी, निळी, जांभळी लाल चिमुकली फुलं आणि उतारांवर व सर्वत्र पसरलेली पोपटी रंगाची पाण्यावर डोकावणारी लवलवणारी भाताची रोपं. नजर पोचेपर्यंत हेच हिरव्या रंगछटांचे लोभावणारे सौंदर्य! नजर अडेल तिथे धूसर निळा रंग हलकेच आकाशांतल्या राखाडी रंगात मिसळत गेलेला. मोर नव्हते आसपास पण सारी स्रुष्टीच असा मोरपिसारा उलगडून बसलेली. आणि त्यात सुखावणारी पिवळसर सोनेरी उन्हाची तिरीप!

                                                                  निसर्गाबरोबर सर्वांची मनेही त्रुप्त,प्रसन्न व मोहरलेली असत.पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येई,कधी आकाशात पक्षी उडतांना दिसत.रात्री बाहेर वेगळाच खजिना नजरेस पडे,आकाशात चांदण्या तुरळकच दिसत पण खाली सर्वत्र काजव्यांनी लखलखून चमचमणारी झाडेझुडपे त्याची कसर भरुन काढत.

                                                                   खरंच,इतके पावसाळे पाहिले आयुष्यात पण तुझ्या या वैभवाची सर कशालाच नाही. तुझ्या आठवणी मर्मबंधातील ठेव आहेत. नेहमी वाटतं यावे एकदा तुला भेटायला, निदान स्वप्नात तरी. पत्र खूपच लांबलं,शब्द थांबतच नाहीत रे.पण आता निरोप घेते.

                                                        दोन वेण्या, फ्रॉक घालून तुझ्या कडेखांद्यावर हुंदडणारी,

                                                                                                                                                 एक चिमुकली

                                                                                                                                                           मी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *