— अंजली संगवई —
प्रिय हवा,
सप्रेम नमस्कार,
तू कशी आहेस, या औपचारिकतेत मी पडणारच नाही. मला तू नेहमीच आनंदी आणि तुला हवे तसे वावरणारी वाटते, हे असे वाटणे मी माझ्यासाठी तरी तसेच कायम ठेवील आणि तू कायम तशीच राहा.
आज तुला पत्र लिहिण्याचे कारण असे झाले , रात्री झोप येत नव्हती म्हणून सहज बाल्कनीत आले. सर्वत्र हवीहवीशी नीरव शांतता होती. पाऊस अगदी हळुवार पडत होता, कुणाची झोप मोड होऊ नये हा उद्देश असेल त्याचा बहुधा. त्याच्या संगतीने तू देखील हळुवार पहुडत होतीस. तेव्हा तुझ्याशी गाठ पडली, नेहमीप्रमाणे तू स्वच्छंदपणे विहार करीत होतीस. ना कुठली चिंता ना कुठले बंधन अगदी मुक्तपणे.
तुझ्या सोबतच मंद सरींचे तुषार कण अनुभवतांना नेहीप्रमाणेच आनंद झाला. मग तुझ्याशी संवाद साधत सहजच हरकून गेले आणि त्यातून मिळालेल्या आनंदाने अगदी सुखावून गेले.
तुला ना तशी अनेक नावे आहेत पण मी नेहमी तीनच लक्षात ठेवते. म्हणजे बघ, ती हवा, तो वारा, ते वादळ ही सगळी तुझीच रूपे पण नाव आणि स्वरूपाप्रमाणे त्याचे ती, तो, ते पण बदलले.
माझ्या तूझ्या बद्दलच्या काही आठवणी आहेत त्या आता आठवल्या की हसायला येत. लहानपणी मला वाटायचे की तू फक्त फुलपाखर, पक्षी आणि पतंग उडविण्या साठीचं आहे. तुझे काम तेवढेच. त्यांना छान उचं उंच आकाशात भरारी घेण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठीच तुझे अस्तित्व आहे. किती छान काम आहे तुझे! मला तेव्हा तुझ्यासारखे व्हावे असे खूप वाटायचे. किती निरागस असत ना बालपण आणि तेव्हाचे विचार देखील.
तसे तुझे प्रत्येक स्वरूप मी मानवी अवस्थे प्रमाणे बघते. मानवी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होणारे बदल मी तुझ्यात पण बघीतले, म्हणजे तसे मी त्याच्याशी जोडले. थोडक्यात काय तर मी माझ्यासाठी त्याची व्याख्या ठरवली आहे. तुला एकतर हसायला येईल नाहीतर काहीतरी वेगळेच वाटेल पण मी बघते तसे. तशी माझ्या वयाच्या बदलत्या विचारसरणी प्रमाणे तूझी व्याख्या बदलत गेली तरी बहुतेक वेळी तुझ्यासारखे व्हावे असे वाटायचे. तसे सगळ्यांनाच वाटत असावे बहुधा, नाही का!
अल्लड वयातील मुलीसारखी तू पण मला अल्लड भासली. कधी सांगू,
श्रावणात जेव्हा अवखळ सरी येतात ना त्यावेळी तू देखील त्या सरीना अल्लडपणे साथ देतेस त्यावेळी तुझे झुळझुळ सर्वत्र पहुडने तुला त्या सरीन बरोबर एकरूप करते. त्या सरींना आपल्या बरोबर हवे तेव्हा, हवे तिथे घेऊन जाणे. कुठल्या तरी आठवणीत रमत बेधुंद वाहात राहाणे. एखादा सुगंध घेऊन सर्वत्र मिरवणे, मधेच शांत राहाणे मधेच घोंगावणे. जशी वयात आल्यावर एखाद्या गोंधळलेल्या तरुणीची अवस्था असते अगदी तशी…
…थोडी मोठी झाल्यावर एक समंजस मुलीगी कशी भासते तशी कधी-कधी वाटली. जशी ती लग्नाच्या वयात येते तसे तिचे वागणे बोलणे बदलत तसे तुझे रूप बदलले बघीतले. शांतपणा, जवाबदारपणा पण तुझ्यात अनुभवला. हवे तिथेच, गरज असेल तेव्हाच आपले अस्तित्व सिद्ध करणे वैगरे वैगरे !!! ( हे सारे माझ्या मनातले समज)
तरुणाईचे अजून एक रूप असत, महत्वकांक्षा. ही अवस्था मला कधी-कधी तुझ्यात देखील दिसते. सतत चढाओढ करीत दूर असलेले ध्येय गाठणारी. तिथे पोहचातांना अनेक अडथळे पार पाडत स्वतःला सिद्ध करणारी. काय बरोबर काय चूक याचा विचार न करता पुढे पुढे जाणारी. त्यात कधी तरी नकळतपणे कुणी तरी दुखावले जात हे जाणते अजणाते पणे दुर्लक्षित करणारी! सामान्यपणे तरुणाईत बहुतांश वेळा सर्वांचे असेच असते. शांतपणे विचार न करता आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे. असले बरेच साम्य तुझ्यात जाणवत. तसे तूझ्या प्रत्येक व्यक्त होण्यात काही तरी वाजवी कारण असत. तुझ्यात आणि मानवी स्वभावात हा मोठा फरक मात्र निश्चितच आहे.
सामान्य मानवी मन कधी राग आला की किंवा कुठे अन्याय झाला की चिडून किंवा पेटून उठते तसे तू देखील पेटून उठते, तू वादळाचे रूप धारण करून आपला राग व्यक्त करतेस. त्याला कारणही तसेच असत आमच्या कडून पर्यावरणावर होणारे घाव जेव्हा असह्य होतात तेव्हा तेव्हा तू अश्याप्रकारे व्यक्त होतेस. तेव्हा मलाच काय सगळ्यांनाच तूझी भीती वाटते….
अजून एक निरीक्षण, आयुष्याचा माध्यान उलटल्यावर वयाची परिपक्वता येते. ती परिपक्वता मी तुझ्यात देखील अनुभवते. पूर्वी कितीही चढउतार, वादळ येऊन गेले तरी शांतपणे विचार करून व्यक्त होणे किंवा वावरणे जसे सामान्य मानवी स्वभावात येत, मला ना ही अवस्था तुझ्यात देखील कधी-कधी दिसते! केव्हा सांगू, समुद्र किनारी जेव्हा तू स्वतः त्या संथ वाहणाऱ्या लाटांन बरोबर एकरूप होऊन वाहातेस ना तेव्हां. तेव्हा तो समुद्र देखील शांतपणे लयबध्द होऊन लाटांच्या द्वारे व्यक्त होत असतो आणि तू देखील त्यात स्वतः शांतपणे व्यक्त होत असते, जणू काही एक प्रकारची ध्यानधारणा करतेस. तेंव्हा तुझ्यातील प्रौढत्व जाणवत, अनुभव गाठीशी असल्या सारखे.
हे सगळे माझ्या मनाचे विचार आहे. तशी तू मनुष्य प्राण्यांपेक्षा निश्चितच वेगळी आहेस, तू नेहमी देणे जाणते. देतांना कुठलाही स्वार्थ नसतो. दुजा भाव नसतो, साऱ्यांनसाठी समसमान.
तुम्हा साऱ्या निसर्ग बहीण-भावंडांचा मला नेहमीच आदर वाटतो. मानवाने पर्यावरणाची कीतीही नासधूस केली तरी तूम्ही तुमचा देण्याचा गुणधर्म नाही सोडत. वेळ पडल्यास रागवता पण देणे अविरत सूरू ठेवता. (हल्ली हे तुमचे रागवणे वारंवार होतंय पण त्याला कारणही तसेच आहे)
आता डोळे जडावले आहे, तुझी भेट आणि संवाद मला थोडा विचार करायला लावून गेला. तुझ्याशी मनाच्या संवादाने खूप गोष्टींची आठवण आणि जाणीव करून दिली. पत्राचा शेवट विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींनी करते.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे|
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत|
तुम्हां बहीण भावंडांना किती समर्पक आहेत ना या ओळी!!
असे हे देण्याच्या वृत्तीचे दान आमच्या समस्त मानव जातीने तुझ्याकडून घ्यावे ही प्रामाणिक इच्छा!
तुझ्या सदैव प्रेमात असलेली……
मी
